15 मिनिटांत अहवाल, तातडीने उपचार वेगवान ‘अँटिजन’ चाचणी कोरोना रोखणार

638

कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पालिकेने 15 मिनिटांत चाचणी अहवाल देणारी ‘अँटिजन’ टेस्ट सुरू केली आहे. उत्तर मुंबईत अंधेरी ते दहिसर विभागात वाढणारा प्रसार रोखण्यासाठी याचा वापर सुरू केला असून दोन दिवसांत 800 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या टेस्टमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. यामुळे कोरोना रोखण्यास मदत होणार आहे.

कोरोनाची लक्षणे आढळल्यास सध्या घशातील स्वॅब घेऊन ‘आरटीपीसीआर’ ही टेस्ट केली जात आहे. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी किमान 24 तासांचा वेळ लागत आहे. या पद्धतीनुसार मुंबईत प्रतिदिन सुमारे चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांची ही संख्या वाढवण्यासाठी 15 ते 30 मिनिटांत अहवाल देणारी अँटिजन चाचणी सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने याला मान्यताही दिली आहे. यानुसार सध्या कोरोना वाढणार्‍या आर  दक्षिण – कांदिवली, आर उत्तर – दहिसर, आर मध्य – बोरिवली, पी उत्तर – मालाड आणि के पूर्व-पश्चिम विलेपार्ले, जोगेश्वरी, अंधेरीसाठी ही चाचणी करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या सध्या वेगवान अँटिजन पद्धतीसह घरोघरी जाऊन केली जाणारी तपासणी, चाचण्यांची वाढलेली संख्या, मोबाईल व्हॅन, हेल्थ पॅम्पच्या माध्यमातून होणारी तपासणी यामुळे काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल. मात्र मोठय़ा प्रमाणात रुग्ण शोधून उपचार आणि प्रभावी क्वारंटाईन केले जात असल्याने कोरोना रोखता येईल असा विश्वासही काकाणी यांनी व्यक्त केला.

 

असे होतेय काम

पालिका रुग्णालये, प्रतिबंधित क्षेत्रातील हेल्थ पॅम्प, हाय रिस्क कॉण्टॅक्ट आणि क्वारंटाईनमधील संशयितांची चाचणी करण्यासाठी अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. संशयितांच्या नाकातील स्वॅब घेऊन चाचणी केली जात आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची विभागणी गंभीर, अतिगंभीर आणि मध्यम अशी करून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत.

यामध्ये संशयित पॉझिटिव्ह ठरल्यास त्याच्यावर तातडीने आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात येत आहेत, तर लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्यात येत आहे. याशिवाय क्वारंटाईनमधील ‘रिपीट’ टेस्टही या प्रकारे करण्यात येत आहे.

अँटिजन टेस्ट हाय रिस्क कॉण्टॅक्टमधील लक्षणे नसलेले, मधुमेह, मूत्रपिंड विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, गरोदर माता यांची टेस्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कोरोना हॉट स्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रांत याचा वापर परिणामकारक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या