तुष्टीकरणाच्या मार्गावर मोदी सरकार; या धोरणाने ‘यांनी’ गमावले पद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह विरोधकांनी भाजपची ही निवडणुकीसाठी खेळी असल्याचा आरोप केला आहे. तसेच काही पक्षांनी मोदी सरकार तुष्टीकरणाच्या मार्गावर जात असल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये सवर्णांच्या नाराजीमुळे भाजपला मोठा फटका बसला. लोकसभेच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मोदी सरकारने तुष्टीकरणाचे धोरण अवलंबल्याची चर्चा आहे. सवर्णांना आकर्षित करण्यासह मोदी सरकारने गेल्यावर्षी एससी, एसटी कायद्यात सुधारणा करून अनुसूचित जाती आणि जमातींच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न केला होता. आतापर्यंतच्या राजकारणावर नजर टाकली असता तुष्टीकरणाच्या या धोरणामुळे जनतेचा रोष ओढवल्याने तीन पंतप्रधानांना पद सोडावे लागले होते. त्यामुळे भाजपचे अवलंबलेल्या या धोरणाचे आगामी निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या आधीही देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक पक्षांनी तुष्टीकरणाच्या धोरणाचा अवलंब केला आहे. त्याचा काही पक्षांना फायदा झाला. तर काहींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. राजीव गांधी, व्ही. पी. सिंग आणि नरसिंह राव या माजी पंतप्रधानांना या धोरणामुळे जनतेचा रोष सहन करावा लागला होता.

1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या हत्येमुळे सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसने 401 जागा जिंकल्या होत्या. 23 एप्रिल 1985 मध्ये शहाबानो प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. तलाक झालेल्या मुस्लीम महिलांना नवऱ्याकडून निर्वाहभत्ता मिळण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. हा निर्णय शरीयत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत मुस्लिमांनी त्याला विरोध केला. त्यावेळी राजीव गांधी यांनी तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारत 1986 मध्ये संसदेत कायदा करून न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला. तसेच हिंदुच्या तुष्टीकरणासाठी 1987 मध्ये बाबरी मशीदीचे टाळे उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या दोन्ही निर्णयांचा फटका त्यांना 1989 च्या निवडणुकीत बसला आणि त्यांना 207 जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे काँग्रेसच्या हातून सत्ता गेल्याने राजीव गांधी यांना पद सोडावे लागले होते.

काँग्रेसच्या पराभवामुळे व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्याने नॅशनल फ्रंटचे सरकार स्थापन झाले. 1990 मध्ये ओबीसी समजाला आकर्षित करण्यासाठी सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारला पाठिंबा देणाऱ्या भाजपने याचा कडाडून विरोध केला. मंडल आयोगाविरोधात लालकृष्ण आडवाणी यांनी रामरथ यात्रा सुरू केली. ही यात्रा बिहारमध्ये पोहचताच तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आडवाणींना अटक केली. त्यामुळे भाजपने व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढला. सरकार पडल्यामुळे त्यामुळे सिंग यांना पद सोडावे लागले.

1991 मध्ये मंडल विरुद्ध कमंडल अशा वादात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यावेळी 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी पाडण्यात आली. देशभरात हिंसाचार उफाळला. त्यावेळी राव यांनी सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका स्वीकारत राम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणला. 7 जानेवारी 1993 ला राष्ट्रपतींनीही त्यावर स्वाक्षरी केली. अध्यादेशानुसार सरकार 60.70 एकर जमीन अधिग्रहीत करून त्यावर राममंदिर, मशीद, म्युझियम आणि ग्रंथालय उभारणार होते. त्याला भाजपने आणि मुस्लीम समाजाने विरोध केला. या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली. तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राव यांना मुस्लीमांचे तुष्टीकरण करता आले नाही आणि हिंदूचाही रोष त्यांनी ओढवून घेतला.त्यामुळे 1996 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि राव यांना पद सोडावे लागले.

तुष्टीकरणाच्या धोरणामुळे विशिष्ट समाज किंवा गट खुश होतो. मात्र इतरांचा रोष सरकारला सहन करावा लागतो. आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप तुष्टीकरणाचा डाव खेळत आहे. याचा त्यांना फायदा होतो की जनतेचा रोष सहन करावा लागतो हे लवकरच समजणार आहे.