दोन वर्षांत 260 कोटी नागरिकांचा पर्सनल डेटा लीक झाला, अॅपलचा धक्कादायक अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकिकडे तंत्रज्ञानाच्या वाढत्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम जगाला भेडसावत असताना आता त्या भीतीत भर पडण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीपफेक, हॅकिंग आणि माहिती संरक्षण अशा विविध पैलूंवर चर्चा झडत असतानाच अॅपल या कंपनीने एका अहवालाचा खुलासा करून धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत जगभरातील 260 कोटी नागरिकांची खासगी माहिती लीक झाली आहे.

मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट मॅडनिक यांनी हे संशोधन करून अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2013पासून ते 2022पर्यंतच्या दशकात माहिती संरक्षण नियमांचं उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हॅकिंग आणि डेटा चोरीची प्रकरणं तीन पटींनी वाढली असून दिवसागणिक एखाद्या महामारीप्रमाणे हे लोण पसरत चाललं आहे आणि यातून कुणीही सुटणार नाही, अशी भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

सध्याच्या जगात क्लाउड स्टोरेज ही पद्धत डेटा साठवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी वापरली जाते. पण, आता भविष्यात आपल्याला अधिक सुरक्षित पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. एन्ड टू एन्ड एन्स्क्रिप्शनसारख्या फिचर्समध्ये वाढ करणं गरजेचं आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.