
सातारा नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय प्रशासकीय सभेत शहर विकासाच्या 325 कोटी 51 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. यामध्ये नगरपालिकेत नव्याने समावेश झालेल्या भागाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेत सभा झाली. सर्वप्रथम आरोग्य, पाणीपुरवठा, आस्थापना, जन्म-मृत्यू व शहर विकास विभागाच्या आर्थिक वर्षाच्या मागण्यांचा बापट यांनी आढावा घेतला. मुख्य लेखापाल आरती नांगरे यांनी प्रशासकीय सभेत पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अंदाजपत्रकीय सभेमध्ये प्रशासक अभिजित बापट यांनी बीजभाषण केले. नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी भरघोस निधी येणार असल्याची घोषणा बापट यांनी यावेळी केली.
नगरपालिका प्रशासकीय इमारत 10 कोटी, आरोग्य सुविधांसाठी 4 कोटी 55 लाख, पाणीपुरवठा 2 कोटी 15 लाख, निवृत्तिवेतन 14 कोटी 75 लाख, कर्मचारी वेतन व भत्ते 28 कोटी 73 लाख, शासकीय फेड 67 लाख, अजिंक्यतारा सुशोभीकरण 20 लाख, पर्यावरण संतुलन 20 लाख, महादरे तलाव सुशोभीकरण 50 लाख, हद्दवाढीच्या क्षेत्राच्या विकासासाठी 15 कोटी, चारभिंती सुशोभीकरण 20 लाख, दिव्यांग कल्याणकारी योजना 40 लाख व मागासवर्गीय व महिला बालकल्याण निधीसाठी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुदानावरच सातारा शहराच्या विकासाची भिस्त असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
यावेळी मुख्य लेखापाल आरती नांगरे, सहायक लेखापाल हिंमत पाटील, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, कल्याणी भाटकर व एकनाथ गवारी, लेखा विभाग लिपिक भालचंद्र डोंबे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.





























































