पुरातत्त्व विभागाने शोधला ऐतिहासिक राजमहल, नागवंशाचे रहस्य उलगडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमधील गुमला जिल्ह्यात पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक नवरत्नगडाचे उत्खनन केले. या उत्खननात ऐतिहासिक राजमहल संशोधकांना सापडला आहे. या उत्खननावेळी राजमहलाच्या परिसरात नागवंशातील अनेक ऐतिहासिक दस्तावेज सापडणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली आहे.

ऐतिहासिक भूमिगत राजमहल आणि सापडलेल्या दस्तावेजाविषयी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक अभियंता शिवकुमार भगत यांनी सांगितले की, झारखंड येथील नवरत्नगड येथे पुरातत्त्व विभागाने सुरू केलेले उत्खनन 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. या परिसरात नागवंशातील 45वा राजा दुर्जन शाल याने बरीच वर्षे राज्य केले. त्याने 1571 साली येथे डोईसागड हा 9 मजली किल्ला बांधला होता. म्हणून या जागेला नवरत्ननगर असे म्हटले जाते. हे ठिकाण पर्यटक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांसाठी कुतूहलाचे केंद्र आहे. कारण या किल्ल्याच्या परिसरात अनके ऐतिहासिक दस्तावेज सापडण्याची शक्यता त्यांना वाटते. नवरतनगर बांधणारा राजा दुर्जन शाल इतिहासात हिऱ्यांचा जाणकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या बाबतीत अनेक कथा सांगितल्या जातात. यातील एक कथा अशी आहे की, ग्वाल्हेरचा तत्कालीन शासक इब्राहिम खान याने भाडे न दिल्याने दुर्जन शाल राजाला कैद करण्यात आले होते, परंतु दुर्जन शाल राजाला हिऱ्यांची उत्तम जाण असल्याने त्याची 12 वर्षांनी सुटका करण्यात आली होती.

संशोधकांनी सांगितलेले ऐतिहासिक राजमहालाचे वैशिष्ट्य असे की, नवरत्नगड किल्ल्याच्या परिसरातील जमिनीच्या खाली हा भव्य आणि अनोखे राजमहाल दुर्जन शाल राजाने बांधले होते. उत्खननादरम्यान तो इतिहास संशोधकांना  सापडला. मोघलांच्या आक्रमणापासून संरक्षण होण्याकरिता या राजमहालाची बांधणी भूमिगत केली असून येथे बोगद्यासारखा गुप्त मार्गही सापडला आहे. या गुप्त मार्गाचेही सध्या उत्खनन सुरू आहे, अशी माहिती अभियंता शिवकुमार भगत यांनी सांगितले. या भूमिगत गुप्त मार्गाचेही उत्खनन सुरू आहे. भूगर्भातील राजमहालाच्या रचनेवरून येथे हिरे, दागदागिन्यांचा खजिना ठेवण्यासाठी ही गुप्त जागा बांधण्यात आली असावी, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला असून याबाबत अभ्यास सुरू ठेवणार असल्याची माहितीही दिली.

सापडलेल्या दस्तावेजांचा अभ्यास करणार

2009 साली नवरत्ननगर हे पुरातत्त्व वारसा असलेले शहर म्हणून घोषित करण्यात आले होते. येथे राणी महाल, कमल सरोवर, जगन्नाथ मठ, सुभद्रा बलभद्र मंदिर, राज दरबार, तहखाना संत्री पोस्ट, नवरत्नगडाच्या मागे असलेल्या डोंगरावरील जलेश्वर नाथ शिवलिंग, नवरत्न गडाबाहेरील सिंहद्वार, कपिलनाथ मंदिर, भैरवनाथ मंदिर, कृष्ण मंदिर, धोबी मठ, राजगुरू समाधी स्थळ, बौली मठ, वकील मठ, मौसी बाडी, जोडा नाग मंदिर या सर्व परिसरांचे उत्खनन करण्यात येणार असून येथे सापडलेल्या दस्तावेजांही अभ्यास करणार असल्याचे मत शिवकुमार भगत यांनी व्यक्त केले आहे.