ग्रंथयात्रा – बालकवींची कविता

>> अर्चना मिरजकर

आनंदी आनंद गडे! इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे;

नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला,

मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे!

या ओळी ऐकल्यावर नकळतच आपलं मनही आनंदाने भरून जातं. आपल्यालासुद्धा कधी ना कधी असा भरभरून आनंद झालेला असतो, पण एखादाच कवी त्या आनंदाचं इतक्या नादमधुर शब्दांत वर्णन करू शकतो.

ही कविता आहे ‘बालकवी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची.

1907 साली जळगावला भरलेल्या कविसंमेलनात प्रतिष्ठित कवींच्या समोर लहान वयाच्या त्र्यंबक ठोमरे यांनी ऐन वेळी रचलेल्या कविता म्हणून दाखवल्या आणि सर्वांची मने जिंकून घेतली. तिथेच त्यांना ’बालकवी’ ही पदवी मिळाली.

बालकवींची कविता निसर्गाच्या सान्निध्यात जन्माला आली. निसर्गात त्यांना दिव्य सौंदर्य आणि आनंद दिसला आणि त्याचं आपल्या कवितांमधून त्यांनी मुक्त कंठाने वर्णन केलं. ‘अरुण’ नावाच्या कवितेत पहाटेच्या निसर्गाचं वर्णन करताना एकामागून एक रम्य चित्र ते रेखाटतात. निसर्गातील घटकांमध्ये त्यांना मानवी मनाच्या भावनांचा प्रत्यय येतो. ‘संध्यारजनी’ या कवितेत सूर्य आणि संध्याकाळ या प्रेमनिर्भर व्यक्ती होतात.

अस्तगिरीच्या अभिनव कुंजी निजला निजनाथ,

बघता बघता त्यास रंगले वारुणीचे चित्त

हळूच पाहते, मधुर हासते, जाते लाजून,

म्हणे मनाशी “जीव टाकू का, हा ओवाळून!”

बालकवींची लेखणी कधी एखादी हळुवारपणे उमलत जाणारी परिकथाच लिहिते. ‘फुलराणी’ कवितेत एका कळीला बघून त्यांची कल्पनाशक्ती एक बहारदार कथा गुंफते…

‘हिरवे हिरवे गार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती –

aaफुलराणी ही खेळत होती’

या मुग्ध कळीला मग रविकिरणाचे वेध लागतात. पहाट होते आणि सृष्टी रविकिरणांचं स्वागत करायला सज्ज होते.

चित्रमयता हा बालकवींच्या कवितेचा आणखी एक विशेष. ‘निर्झरास’ या कवितेत एका झऱयाचं जिवंत चित्र ते उभं करतात…

‘गिरिशिखरे वनमालाही । दरी दरी घुमवत येई

कडय़ावरूनी घेऊन उडय़ा ।

खेळ लतावलयी फुगडय़ा

आणि पाहता पाहता हा झरा त्यांना एका वैश्विक तत्त्वाची अनुभूती देतो,

‘पर्वत हाही दरी दरी । तव गीते भरली सारी ।

गाण्याने भरली राने । वरखाली गाणे गाणे।

गीतमय स्थिरचर झाले । गीतमय ब्रह्मांड डुले।’

त्यांच्या कवितेतील ही चित्रमयता कधीकधी रंगांची रम्य उधळण करते. ‘श्रावणमास’ ही कविता त्याचे उत्तम उदाहरण आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरुनी ऊन पडे!

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!’

‘मेघांचा कापूस’ या कवितेत संध्याकाळच्या ढगातून डोकावणारा चंद्र हे नेहमीचं दृश्य त्यांची प्रतिभा किती सुंदर रीतीने चितारते पहा…

फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा

वरून कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा

त्यातही हसली मंदपणे ती चंद्रकला राणी

कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचे पाणी’

बालकवींची कविता अतिशय नादमधुर आहे. त्यांची मंजुळ गीतं झाली नाहीत तर नवलच. ‘माझे गाणे’ हे त्यांच्या कवितेवर आधारलेले गीत प्रसिद्धच आहे.

निसर्गात सौंदर्य शोधणारा हा कवी अनेकदा लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई…

‘बोल बाई बोल गं ।

तुझ्या बोलाचे काय वाणू मोल गं ।

डोल बाई डोल गं ।

जाईजुईची लाख फुले तोल गं ।’

हे अंगाई गीत बालकवींनी लिहिलं आहे हे बऱयाच जणांना माहीत नसेल आणि त्यांचं…

‘चिव चिव चिव रे । तिकडे तू कोण रे?

कावळेदादा, कावळेदादा, माझा घरटा नेलास बाबा।’

हे बालगीत अनेकांनी लहानपणी ऐकलं असेल. परंतु निसर्गातील सौंदर्य पाहून आनंदाने बेहोष होऊन जाणारा हा कवी कधी कधी घोर निराशेत बुडून जात असे…

‘कोठुनी येते मला कळेना

उदासीनता ही हृदयाला!’

असा हा सृष्टिसौंदर्याची गीते गाणारा, नादमधुर काव्यरचना करणारा, निसर्गाचा उपासक वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी रेल्वे अपघातात मरण पावला.

ब्लर्ब : बालकवींच्या कवितेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पहा www.ब्दल्tल्ंा.म्दस्/@graहूप्ब्atra भाग 17. कवयित्री आसावरी काकडे यांच्याकडून ऐका त्यांच्या कवितेतील माधुर्य.