मराठवाड्यातील अध्यक्ष हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

मराठवाडय़ात तीन वर्षांसाठी असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घेतल्यामुळे 16 वर्षांनंतर मराठवाडय़ात धाराशीव येथे 93 वे संमेलन निश्चित झाले. या संमेलनाचाही अध्यक्ष मराठवाडय़ातील असला पाहिजे हेही आता महामंडळाने मनावर घ्यावे. आजपर्यंत मराठवाडय़ात जी सहा अ. भा. मराठी साहित्य संमेलने झाली त्यांचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील प्रतिथयश लेखकांनीच भूषविले आहे आणि मराठवाडय़ातील ज्या लेखकांना साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला तो अन्य ठिकाणी. आता महामंडळाने संमेलन तर दिले त्यासोबत याच भागातील अध्यक्षास प्राधान्य द्यावे, अशी मराठवाडय़ाच्या साहित्य क्षेत्रातून आलेली प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पावन शक्तिपीठाने व संत गोरोबा काकांच्या भक्तिवासाने पुनीत झालेल्या मराठवाडय़ातील धाराशिव येथे पुढील वर्षी 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची मंदियाळी रंगणार आहे. साहित्यसंमेलनाचे यजमानपद शेवटी अथक पुढाकाराने धाराशीवकरांनाच मिळाले आणि महिनाभरापासून सुरू असलेली चर्चाही आता थांबली आहे.

यंदाही नियोजित संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक, धाराशीव या चार ठिकाणची निमंत्रणे साहित्य महामंडळाला प्राप्त झाली होती. त्यातील नाशिक आणि धाराशीव हे महामंडळाने स्थळपाहणीसाठी निवडले. दोन्ही ठिकाणी स्थळपाहणी झाली. शेवटी धाराशीवची निवड झाली. मराठवाडय़ास तब्बल 16 वर्षांनंतर ही संधी मिळते आहे. याबाबतीत मराठवाडय़ाच्या साहित्य क्षेत्रात आनंद वाटणे स्वाभाविकच आहे. खरे तर याआधी पाच-सात वर्षांपासून संमेलन आयोजनाची मागणी होती. तेव्हापासून स्थानिक मसाप शाखेचा जोरदार पाठपुरावाही सुरू होता. दुष्काळ, पाणीटंचाई अशीही कारणे महामंडळाचे तत्कालीन पदाधिकारी देत होते. या ना त्या कारणाने धाराशीवकरांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत होते. साहित्य महामंडळाचे कार्यालय मराठवाडय़ाबाहेर असल्याने योग्य वेळेची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. 2014 साली स्थळपाहणीसाठी महामंडळ धाराशीवला येऊन पाहणी करूनही गेले. त्यावेळी घुमान, पंजाब येथीलही निमंत्रण होते. संत नामदेवांच्या कर्मभूमीत संमेलन होणार असल्याने घुमानचे पारडे जड होते. शेवटी झालेही तसे. ऐनवेळी धाराशीवला होऊ घातलेले संमेलन घुमानला गेले. त्यावेळीही धाराशीवकरांचा हिरमोड झाला असला तरी तेथील साहित्यिकांनी ‘संत गोरोबा काकांची दिंडी नामदेवांच्या भेटी’ म्हणून 200 साहित्यिक घुमान साहित्य संमेलनात आनंदाने सहभागी झाले होते. भगवे फेटे बांधून हजर होते. पण अखिल भारतीय संमेलन होऊ शकत नाही ही सल मात्र प्रत्येकाच्या मनात कायम होती. ती आता दूर झाली आहे. नाही म्हणायला मसापचे साहित्य संमेलन काही वर्षांपूर्वी तेथे झाले होते. एवढेच नव्हे तर 2017 साली 97 व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचा सोहळा अविस्मरणीय रंगला होता. त्यामुळे फार भपकेबाज, खर्चिक नसले तरी 93 व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उत्तम होऊ शकते असा विश्वास आधी झालेल्या या दोन्ही संमेलनांनी दिला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या प्रांगणात सारस्वतांची मांदियाळी नवीन वर्षात रंगणार आहे हे आता नक्की झाले.

92 वर्षांनंतर धाराशीवला साहित्य संमेलन होत असले तरी मराठवाडय़ात याआधी संभाजीनगरमध्ये 1957 आणि 2004 साली हे संमेलन होऊन गेले आहे. मध्यंतरीच्या काळात अंबाजोगाई, नांदेड, परभणी, परळी येथेही अनुक्रमे 1983, 1985, 1995 आणि 1998 येथेही संमेलने शानदार, अविस्मरणीय अशीच झाली आहेत. एकूण संमेलनातील केवळ सहा संमेलने ही मराठवाडय़ात झाली. असे असले तरी या भागातील प्रतिभावंत लेखकांना आपल्या भागात होणाऱया साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान काही मिळाला नाही हे सोबतच्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येते.

असे असले तरी डॉ. यू. म. पठाण (पुणे), डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (चिपळूण), प्रा. फ. मुं. शिंदे (सासवड) आणि लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा) येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान केवळ चारच लेखकांना आजपर्यंत मिळाला आहे. मराठवाडय़ात संमेलने झाली की त्याचा अध्यक्ष हा मराठवाडय़ाच्या बाहेरचा आणि मराठवाडय़ातील लेखक हे अन्य ठिकाणच्या संमेलनाचे अध्यक्ष. तात्पर्य काय तर आपल्या भागात होणाऱया संमेलनाचा अध्यक्ष हा आपल्या भागातील नसतो असे यावरून आपल्या लक्षात येते.

दरवर्षी संमेलन आले की मराठवाडय़ातील लेखक ना. धों. महानोर, प्रा. सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या नावांची चर्चा होते. अध्यक्षपदासाठी निवडणूक होती ती यापैकी कुणालाही मान्य नव्हती आणि बिनविरोध निवड हेही शक्य नव्हते. त्यामुळे ही चारही नावे तेव्हा चर्चेत होती व आजही कायम चर्चेत आहेत. याआधी डॉ. गंगाधर पानतावणे, भारत सासणे यांनी निवडणूक लढवली व पराभूत झाले. या सर्व बाबीस डॉ. पठाण, डॉ. कोत्तापल्ले, फ. मुं. शिंदे, देशमुख अपवाद ठरले. थेट निवडणूक लढवूनच विजयी झाले.

गतवर्षीपासून साहित्य संमेलन अध्यक्षपदाची होणारी निवडणूक रद्द झाली. त्यामुळे त्यानिमित्ताने होणारे, झडणारे वादविवादही थांबले. साहित्य महामंडळाचे 19 सदस्यच आता अध्यक्षांची सर्वानुमते निवड करणार आहेत. त्याच प्रक्रियेतून अरुणा ढेरे यांना 2019 च्या यवतमाळ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवता आले. आता मराठवाडय़ात धाराशिव येथे अशाच पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार की अध्यक्ष बाहेरचा असणार हे आगामी दोन-चार महिन्यांत कळेल.

मराठवाडय़ात झालेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने
नं.        वर्ष                       नाव
1) 39      1957          प्रा. अनंत काणेकर, संभाजीनगर
2) 57      1983          व्यकंटेश माडगूळकर, अंबाजोगाई
3) 59      1985          शंकर पाटील, नांदेड
4) 68      1995          नारायण सुर्वे, परभणी
5) 71      1998          प्रा. द. मा. मिरासदार, परळी-वैजनाथ
6) 77      2004          प्रा. रा. ग. जाधव, संभाजीनगर

[email protected]