
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करत शिवसेनेशी गद्दारी करून भाजपसोबत हातमिळवणी केलेल्या मिंधे गटाला आता नवीन सरकारमध्येही निधी मिळत नसल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरत यांनी भाजप निधी वाटपात शिंदे गटाला डावलत असल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला आहे. याच वादावरून सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नेते तथा पालकमंत्री अतुल सावे यांना घेराव घालून जाब विचारला होता.
”विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी आमचे कार्यकर्ते अतुल सावे यांच्याकडे गेले होते. पण त्यांना जाब विचारून काही झाले नाही. सावे यांनी निधी दिल्याचे सांगितले. पण जर तसं असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. निधी बाबत सांगितलं वेगळं जातंय आणि प्रत्यक्षात निधी वेगळा दिला जातोय. आम्हाला 40 ते 45 कोटी निधी मिळणं अपेक्षित होतं मात्र 7 ते 8 कोटी देऊन आम्हाला गुंडाळलं जातंय”, असं खोतकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
इतर जिल्ह्यात काय परिस्थिती आहे माहित नाही, पण जालना जिल्ह्यात निधी देताना भाजपकडून आम्हाला डावललं जात आहे. आम्ही लोकांसाठी निधी मागत आहोत, आमच्या घराच्यासाठी हा निधी नाही मागत. जे काही वरच्या पातळीवर ठरलं आहे, त्यानुसारच सर्व काही व्हायला पाहिजे एवढीच आमची विनंती असणार. याबाबतच योग्य माध्यमातून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा विषय मी घालणार आहे, असे खोतकर म्हणाले.



























































