क्रीडानगरीतून – मढवी महिला क्रिकेट आजपासून

डॉ. राजेश मढवी स्पोर्टस् असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित सहाव्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेला 23 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील साखळी सामने 29, 30 आणि 31 डिसेंबर रोजी खेळवले जातील. उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने माटुंगा जिमखान्याच्या मैदानावर रंगतील. शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल मैदानावर स्पर्धेतील सलामीची लढत होणार असून मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर आणि आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू प्रीती डिमरी यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होणार असल्याचे स्पर्धेचे मुख्य आयोजक मढवी यांनी सांगितले. यंदा प्रथमच हे सामने ठाण्याऐवजी मुंबईत रंगणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना 15 हजार आणि उपविजेत्या संघाला 10 हजार रुपयांच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.

आदित्य पडवळला दुहेरी मुकुट

 तिसऱया मानांकित टियान पॅस्टेलिनोने पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल मानांकित अन्विशा घोरपडे हिच्यावर पिछाडीवरून विजय मिळवत गौतम ठक्कर स्मृती राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेच्या 15 वर्षांखालील मुली एकेरीचे विजेतेपद पटकावले. बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत दिवंगत गौतम ठक्कर  याचे जवळचे सहकारी सुनील गावस्कर, श्याम भाटिया, खालिद अन्सारी आणि अपर्णा पोपट आदींची प्रमुख उपस्थिती होती.15 वर्षांखालील मुली एकेरीच्या अंतिम फेरीत पहिला गेम 2-17 असा गमावूनही टियानने निराश न होता दुसरा गेम जिंकून दमदार पुनरागमन केले. प्रभावी लाँग रॅली आणि नेटजवळील अचूक फटक्यांच्या जोरावर तिने 22-20 असा गेम जिंकला. तिसऱया आणि अंतिम गेममध्ये टियानने सातत्य राखत 17-21, 22-20, 21-14 अशी बाजी मारली. 15 वर्षांखालील मुले एकेरीच्या चुरशीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित आदित्य पडवळने चंद्रांशू गुंडलेवर 21-17, 15-21, 21-15 अशी मात केली. आदित्यने पहिला गेम जिंकला तरी चंद्रांशूने दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली. तिसऱया आणि निर्णायक गेममध्ये मागील चुका टाळताना आदित्यने जेतेपदावर नाव कोरले. 15 वर्षांखालील मुले दुहेरीत पडवळने गुंडलेसह साईराज सामंत आणि सुमेध सुर्वे यांचा 16-21, 21-10, 21-12 असा पराभव करत दुहेरी मुकुट पटकावला. 13 वर्षांखालील मुलींच्या गटातही उलटफेर पाहायला मिळाला. दुसऱया मानांकित रिद्धी खोपकरने अव्वल मानांकित स्पृहा जोशीचा 21-15, 12-21, 22-20 असा पराभव करत ट्रॉफी जिंकली.

स्वराज्य स्पोर्टस्, संघर्षला अजिंक्यपद

ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीनिमित्त गोरेगाव एनएनपी येथे अभिनव क्रीडा मंडळ आणि एकता क्रीडा मंडळ, वडगाव आयोजित उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात कांजूरमार्गच्या स्वराज्य स्पोर्टस् क्लबने अटीतटीच्या अंतिम लढतीत गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाचे आव्हान 34-25 असे 9 गुणांनी संपुष्टात आणत जेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. पुरुष गटात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने सांताक्रूझच्या सागर क्रीडा मंडळाचे तगडे आव्हान 31-29 असे 2 गुणांनी संपवत जेतेपद पटकावले.

एनएनपीच्या मृणाल गोरे उद्यानातील क्रीडांगणात आयोजित जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेला स्थानिक कबड्डीशौकिनांचा अभूतपूर्व सहभाग लाभला. पुरुष लीग कबड्डीचे विजेतेपद जोगेश्वरीच्या जॉली स्पोर्टस् क्लबने गोरेगावच्या स्पर्श फाऊंडेशनला 37-26 असे 9 गुणांनी पराभूत करीत पटकावले. पारितोषिक वितरणाला ‘द्रोणाचार्य’ दिनेश लाड आणि शिक्षणतज्ञ  अरविंद वैद्य, कबड्डीपटू नीलेश शिंदे, राष्ट्रीय कबड्डीपटू सचिन सातार्डेकर, सुषमा सातार्डेकर, वडगाव बुद्रुक ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, सचिव पांडुरंग दळवी, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे सचिव राजेश पडेलकर आणि शांताराम खामकर हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या समारोपाला गौरवमूर्ती कबड्डी संघटक अंकुश मोरे आणि अपर्णा मोरे दाम्पत्याचा ‘द्रोणाचार्य’ दिनेश लाड आणि अरविंद वैद्य सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

भोसले अकादमीचा जबरदस्त विजय

अब्दुल अहदची (65 चेंडूंत 91 धावा) तुफानी फटकेबाजी तसेच चिन्मय गीतेश आणि फैज यांच्या (प्रत्येकी 3 विकेट) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भोसले क्रिकेट अकादमीने ज्वाला स्पोर्टस् फाऊंडेशन आयोजित एमसीसी टॅलेंट सर्च 12 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट लीगमध्ये 22 यार्डस् क्रिकेट अकादमीवर 100 धावांनी विजय मिळवला.

अब्दुलच्या फटकेबाजीच्या जोरावर भोसले क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 6 बाद 196 धावा केल्या. ईदहास स्वेनने 46 धावा करत त्याला चांगली साथ दिली. मोठे आव्हान 22 यार्डस् क्रिकेट अकादमीला पेलवले नाही. त्यांचा डाव 21 षटकांत 96 धावांवर संपला. चिन्मय गीतेश (3/13) आणि फैज के. यांनी (3/24) अचूक मारा करत विजय सुकर केला. अब्दुल अहदला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दुसऱया सामन्यात एमसीसी ठाणे संघाने स्पायडर स्पोर्टस् अकादमीचा 3 विकेट राखून पराभव केला.

17 जानेवारीला वडाळ्यात जिम्नॅस्टिक्स स्पर्धा

वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात मुंबई, ठाणे, रायगड जिह्यात जिम्नॅस्टिक्स खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यंदाही मुंबई शहर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने येत्या 17 जानेवारीला वडाळ्यात भारतीय क्रीडा मंदिरात 18 व्या जिम्नॅस्टिक्स मिनी स्टेट टॅलेंट ‘डिस्प्ले’  स्पर्धेचे  आयोजन केले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंना सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत मुला-मुलींसाठी 8, 10, 12, 14, 16 वर्षांखालील आणि 16 वर्षांवरील असे वयोगट ठेवण्यात आले आहेत. फक्त फ्लोअर एक्झरसाईझेवर प्रत्येक खेळाडूला कोणतेही 10 प्रकार सादर करायचे आहेत. यामुळे नवोदित खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेला मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे प्रायोजकत्व लाभले आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे आणि सचिव डी. डी. शिंदे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. स्पर्धासंदर्भात अधिक माहितीकरिता  डॉ. राजेंद्र शेळके (7021437635) अजय मापुसकर  (9869019069) रवींद्र विसपुते (9869978990) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.