अभिनेता अर्जुन रामपाल याचा घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

चंदेरी दुनियेत गेल्या वर्षापासून सुरू झालेलं घटस्फोटाचं सत्र अद्याप थांबलं नसून आता या यादीत अर्जुन रामपालचाही समावेश झाला आहे. अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया यांनी आपल्या २० वर्षांचा संसार मोडला आहे.

आपल्या घटस्फोटाविषयी त्या दोघांनीही माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. ‘आमच्या दोघांतील २० वर्षांच्या लग्नप्रवासाच्या खूप आठवणी आहेतच. पण आता आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढं वेगळ राहून आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करायची आहे. पण, आमच्या मनात ऐकमेकांबद्दल प्रेम व आदर नेहमीच असेल. हे सगळं विचित्र जरी असलं तरीही आयुष्य हे असचं असतं’, असं अर्जुन आणि मेहेर यांचं म्हणणं आहे.

अर्जुन आणि मेहेर यांनी वेगळ राहायचं ठरवलं तरीही ते मुलांसाठी एकत्र येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या विषयावर अधिक काही न बोलणं इष्ट असून आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. अर्जुन आणि मेहेर हे वांद्रे येथं त्यांच्या मुली माहिका व मायरा यांच्यासोबत राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेथे राहत नसल्याचं समोर आलं होतं. मेहेर हिच्या मनात अर्जुन आणि सुझानच्या नात्याविषयी संशयाची पाल चुकचुकली होती. त्यामुळे २० वर्षांच्या लग्नाच्या प्रवासानंतर दोघांनी आता ऐकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.