
विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने ‘बाप तैसा बेटा’ या म्हणीप्रमाणे कामगिरी केलीय. त्याने वडिलांप्रमाणेच रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकण्याचा पराक्रम केला. बाप-लेकांनी डिसेंबरमध्येच रणजीत पदार्पण केले व शतकही झळकावले, असा दुर्मिळ योग यानिमित्ताने जुळून आलाय, हे विशेष.
सचिन तेंडुलकरने वयाच्या 15 व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून 1988 मध्ये गुजरातविरुद्ध पदार्पण केले होते. त्यावेळी 11 डिसेंबरला सचिनने नाबाद 100 धावांची खेळी केली होती. गोवा संघाकडून खेळणाऱया अर्जुन तेंडुलकरने 14 डिसेंबरला राजस्थानविरुद्ध 120 धावांची खेळी करीत वडिलांच्या 34 वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. अर्जुनने 207 चेंडूंच्या खेळीत 120 धावा करताना 16 चौकारांसह 2 षटकार लगावले.





























































