झुंजार सरसेनापती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

प्रसंग 1
5 सप्टेंबर 1965,
स्थळ – शंकरगढ, युद्धक्षेत्र – पश्चिम सीमा
परेशन ‘जिब्राल्टर’ अशी युद्धयोजना आखून पाकिस्तानच्या फिल्ड मार्शल अयुब खानने हिंदुस्थानवर हल्ला केला. हिंदुस्थानी सैन्याने असा काही प्रहार केला की बडा पिंड या पाकिस्तानी गावात घुसून 26 ‘पॅटन’ रणगाडय़ांना धाराशाही केले. शंभर पाकिस्तानी रणगाडे समोर असताना त्याने हा पराक्रम केला. ती पलटन होती डेक्कन हॉर्स आणि या तुकडीचे नेतृत्व करीत होता एक लेफ्टनंट कर्नल हुद्दय़ाचा मराठी मावळा. त्याला पुढे या कामगिरीसाठी हिंदुस्थानी सरकारने ‘महावीरचक्र’ बहाल केले.

प्रसंग 2
7 डिसेंबर 1971, स्थळ – बसंतार,
युद्धक्षेत्र – पाकिस्तानव्याप्त ‘बडा पिंड’
ऑ पुन्हा एकदा चिलखती रणगाडय़ांचे घनघोर युद्ध. अमृतसरला लागून असलेल्या शिखांच्या पवित्र डेरा बाबा नानक या परिसरात 86 इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व होते 45 वर्षांच्या रुबाबदार, पण कर्तव्यकठोर ब्रिगेडिअर पदावरील मराठी नरशार्दुलाकडे. पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल बहाद्दूर शेर व मेजर जनरल अब्दुल मजीद यांचा 4 कोर, 10 इन्फंट्री डिव्हिजन, 114 बलूच येवढा मोठा फौजफाटा अंगावर येत असताना हा मराठी अधिकारी डगमगला नाही. शत्रूचे 45 अद्ययावत पॅटन टँक हस्तगत करत तो आपल्या पलटनीसह बाबा नानक डेरापर्यंत पाकिस्तानमध्ये घुसला. या मोहिमेत गनिमाने पेरलेल्या भूसुरुंगांना न जुमानता या 86 इन्फंट्री ब्रिगेडने पाकिस्तानी हल्ला परतवून लागला. या कामगिरीसाठी या मराठीवीराला दुसरे महावीरचक्र मिळाले.

दोन महावीरचक्रे पटकवणारे हे वीर म्हणजेच भविष्यात लष्करप्रमुख झालेले जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य. मुंबईत 27 जानेवारी 1926 रोजी अरुणकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अलिबागचे जिल्हाधिकारी होते. अलिबागच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. आज ती शाळा ‘जनरल अरुणकुमार वैद्य’ यांच्या नावाने ओळखली जाते. तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अरुणकुमार वैद्य त्यावेळच्या ‘रॉयल इंडियन आर्मी’मध्ये दाखल झाले. वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजे 1944 मध्ये त्यांना व्हाईसरॉय इमर्जन्सी कमिशन मिळाले. चिलखती विभागात दाखल होताच दुसऱया महायुद्धात त्यांची नेमणूक बर्मा फ्रंटवर झाली. 9 डेक्कन हॉर्स ही सर्वात जुनी पलटन व त्या पलटनीचे ते सातवे कमांडर होते. बर्मामध्ये नाझी फौजेशी लढताना सुरुंगाच्या वायरला पाय लागून ते बेशुद्ध झाले, पण हार न मानून अर्ध्या तासात आपल्या पलटनीत परतले. त्यांचे हे धाडस, ही कर्तव्यपरायणता पाहून मेजर आल्फ्रेड कमिन्स म्हणाले, ‘‘हा तरुण सैन्यात एके दिवशी उच्चाधिकारी होईल.’’ घडलेही तसेच जनरल अरुणकुमार वैद्य 1 ऑगस्ट 1983 रोजी हिंदुस्थानी सैन्याचे सरसेनापती (Army Chief of Staff) झाले.

रोमारोमात भिनलेली देशभक्ती आणि निडरपणा यामुळे अरुणकुमार वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोहिमा धडाक्यात यशस्वीपणे पार पाडल्या. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तेव्हा कश्मीरमध्ये झालेली घुसखोरी असेल, 1965चे पाकिस्तान युद्ध असो किंवा 1971चा बांगलादेश मुक्ती संग्राम, अरुणकुमार वैद्य यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने धडाकेबाज यश मिळवले. ईशान्य हिंदुस्थान जेव्हा बंडखोर आणि नागा अतिरेक्यांच्या उच्छादाने अशांत होता तेव्हा वैद्य यांची नियुक्ती पूर्व विभागप्रमुख म्हणून करण्यात आली होती. त्यांनी हे बंड मोडून काढले. त्याबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले. इंदिराजींच्या कार्यकाळात अत्यंत संवेदनशील मात्र तेवढेच आवश्यक ठरलेले ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले गेले ते वैद्य लष्करप्रमुख असतानाच. ही मोहीम भावनात्मकदृष्टय़ा अत्यंत जोखमीची होती. मात्र कर्तव्यकठोर भावनेने जन.वैद्य यांनी सुवर्णमंदिर दहशतवादीमुक्त केले. त्याचीच किंमत त्यांना पुढे 1986मध्ये पुण्यात स्वतःचा जीव देऊन मोजावी लागली. खलिस्तानवादी अतिरेक्यांनी 10 ऑगस्ट 1986 रोजी त्यांची हत्या केली आणि एका झुंजार सैन्य कारकिर्दीचा अस्त झाला. जन.वैद्य हे एकमेव लष्करप्रमुख आहेत की ज्यांना दोन महावीर चक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे.

जन. वैद्य यांनी त्यांच्या कारकिर्दीत अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले. शिवाय सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे गुलामीची प्रतीक असलेली ब्रिटिशकालीन तलवार बाद करून त्याजागी शिवकालीन बाकदार संगीन सैन्याच्या ‘नॅशनल सेरिमोनियल परेड’मध्ये सामील करण्याचे पालकत्व जन. वैद्य यांचेच. हिंदुस्थानी सैन्यात त्यांनी अनेक चांगले बदल केले. ‘पॅटन’सारखे रणगाडे वैद्य आणि त्यांच्या पलटनीने अक्षरशः नेस्तनाबूत केले. त्याचा अमेरिकेने एवढा धसका घेतला की, त्यांना पॅटन रणगाडय़ाची पुनर्बांधणी करणे भाग पडले.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)