पुलवामामध्ये सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील सुमारे २० गावांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने सोमवारी सकाळपासून या गावांमध्ये शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. सीआरपीएफ, लष्कराचे जवान, राज्य पोलिसांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. पुलवामा जिल्ह्यातील २० गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दलाने रविवारी शोपिया जिल्ह्यात शोधमोहीम राबवली होती.

दक्षिण कश्मीरच्या पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी सक्रीय आहेत. सुरक्षा दलाने शनिवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. घटनास्थळाहून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला होता. या कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. हाजीन परिसरात गुरुवारी सुरक्षादलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्याआधी शोपियामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद झाले होते. दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळे सुरक्षा दलाने या दोन जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम हाती घेतली आहे.