अवैध शस्त्र बाळगणाऱ्याला अटक; तीन गावठी कट्टे, अकरा जिवंत काडतुसे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे टीमने लातूर येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील तीन गावठी कट्टे (पिस्टल) आणि अकरा जिवंत काडतुसे, दोन एक्स्ट्रा मॅगझीन असा एकूण 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर शहरातील समीर सत्तार शेख (पांढरे) रा. इंडिया नगर लातूर याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि नऊ जिवंत राऊंड जप्त केली. त्याच्याकडे पिस्टल आणि राउंड विषयी चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अधिक तपास करत आणखीन एका व्यक्तीच्या घरातून दोन गावठी कट्टे पिस्टल, दोन मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 81 हजार रुपयाचा अवैध शस्त्र साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस नायक खुर्रम काझी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, विनोद चीलमे, बालाजी जाधव, रवी गोंदकर, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, अंगद कोतवाड, यशपाल कांबळे, संपत फड, राजेश कंचे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.