व्यापाऱ्यांना फसविणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वेटर विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर पेटीएम कोडद्वारे पैसे पाठविल्याचे नाटक करून पैसे न देताच दोन हजार रुपयांची फसवणूक करणाऱयास शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार व्यावसायिकांना फसविल्याचे चौकशीत समोर आले आहे.

तानाजी बाळकृष्ण जानकर (वय 24, मूळ रा. पळसावडे, ता. सातारा, सध्या रा. गडकरआळी, सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत सिरिंग टाशिलामो (वय 52, सध्या रा. राधिरा रोड, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

सिरिंग यांचा पंचायत समितीच्या पाठीमागे स्वेटर विक्रीचा व्यवसाय आहे. एक युवक दुकानावर आला. त्याने दोन हजार रुपयांची खरेदी केली. त्यानंतर त्याने त्यांना पेटीएम कोडची मागणी केली. सिरिंग यांनी कोड दिल्यावर त्याने पैसे पाठविल्याचा ‘सक्सेसफुल’ असा मेसेज दाखविला; परंतु प्रत्यक्षात सिरिंग यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. पैसे आले नसल्याचे सांगितल्यावर ‘नंतर येतील,’ असे सांगून तो गडबडीने तेथून निघून गेला. जाताना त्याने काही तक्रार असल्यास मोबाईल क्रमांक देत त्यावर संपर्क करण्यास सांगितले. मात्र, तो फोन चुकीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर सिरिंग यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे प्रकटीकरण विभागाने तातडीने तपास करून तानाजीला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आणखी चार व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे फसविल्याचे समोर आले आहे.

पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विक्रम माने हे या कारवाईत सहभागी होते.