
बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे भांडण सोडवल्याचा राग आल्यामुळे एका व्यक्तीने दुचाकीतील पेट्रोल काढून फुटबॉल आणि क्रिकेटच्या मैदानावरील जाळी जाळून 3 लाखांचे नुकसान करण्यात आले आहे.
ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खराडातील टर्फ अप फिशल फुटबॉल मैदानावर घडली. याप्रकरणी एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केले आहे. पांडुरंग किसनराव सुरनार (37 , रा. बनगाई वस्ती, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बळीराम धिंडे (35) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग हे बळीरामचे दाजी आहेत. 15 मार्चला पांडुरंगचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्या दोघांची भांडणे त्यांचा मेहुणा बळीरामने सोडविल्यामुळे पांडुरंगला राग आला. त्यामुळे पांडुरंगने मेहुणा बळीराम कामाला असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल काढले. त्यानंतर फुटबॉल आणि क्रिकेटच्या मैदानावरील गवताला आग लावून तेथील मैदानातील जाळीचे तीन लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.




























































