
>>गणेश आचवल
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे असे आपण म्हणत असतो आणि या स्पर्धेच्या युगात व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणारे पालघरमधील एक महत्त्वाचे कॉलेज म्हणजे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारे हे कॉलेज आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा सर्व शाखा येथे आहेत. अकरावीपासून ते पीएचडीपर्यंतचे कोर्सेस येथे उपलब्ध आहेत. या कॉलेजला 53 वर्षांची परंपरा आहे.
1968 सालची गोष्ट आहे. पालघर जिह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने या कॉलेजची स्थापना 1968 साली झाली. 1984 पासून या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला सुरुवात झाली, तर 2006 सालापासून येथे सेल्फ फायनान्सिंग अभ्यासक्रमांना सुरुवात झाली. त्याअंतर्गत बीएमएस, बायो टेक्नॉलॉजी, बीबीआय, बीएस्सीआयटी असे अनेक अभ्यासक्रम येथे उपलब्ध असून बारावीनंतर येथे मुले-मुली या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.
व्यवसायाभिमुख प्रशिक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून या कॉलेजने लुपिन इंडस्ट्रीबरोबर एकत्रितपणे एक डिप्लोमा सुरू केला आहे. हा एक वर्षाचा डिप्लोमा असून एमएस्सी झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना फार्मासुटिकल केमिस्ट म्हणून करीअर करता येऊ शकते. येथे एमएस्सी, एमकॉम आणि एमए असे सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
सोनोपंत दांडेकर कॉलेजचा परिसर खूप मोठा असून या कॉलेजच्या आवारातच चिकू आणि आंब्याच्या बागा आहेत. पालघर परिसरातील महिलांना येथे फळांची उत्पादने, फळांवर प्रक्रिया करणे या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. साहजिकच महिलांनादेखील रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल लक्षात घेऊन 17 विविध सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा येथे चालवले जातात. त्यात मुद्रण शोधनासारखा वेगळा अभ्यासक्रम आहे. भाषिक कौशल्ये विकास अभ्यासक्रम आहे. मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्सेसदेखील येथे उपलब्ध आहेत. मराठी भाषेच्या संदर्भात व बोली भाषेच्या संदर्भातील एक कोर्सदेखील येथे आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेतदेखील या कॉलेजमधील विद्यार्थी नाव कमावत आहेत.इन्पहसिस स्प्रिंग बोर्ड यांचा ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सदेखील येथे उपलब्ध असून गेल्या वर्षी पाच हजार विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला होता. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येथे वेगळा विभाग आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आज उत्तम प्रकारचे प्रशिक्षण येथे मिळत असून काळाप्रमाणे नवीन कोर्स निर्माण करून करीअरच्या नवीन संधी येथे उपलब्ध होत आहेत.






























































