#Article370 खासदार नामग्याल यांच्या भाषणाने विरोधक चारीमुंड्या चित, मोदींकडून कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक विधेयकावर मंगळवारी लोकसभेमध्ये दीर्घ चर्चा झाली. दीर्घ चर्चेनंतर 366 विरुद्ध 66 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. तत्पूर्वी लोकसभेतील चर्चेमध्ये लेह-लडाखचे भाजपचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी भाग घेतला. खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी आपल्या आक्रमक भाषणाने विरोधकांना चारीमुंड्या चित केले.

लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या संकल्प प्रस्तावाचं स्वागत करताना लेहचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. लोकसभेत त्यांनी केलेल्या जोरदार भाषणाचे कौतुक सर्व खासदारांसोबतच लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले. मोदी यांनी ट्वीट करुन या भाषणाबद्दल नामग्याल यांचे कौतुक केले.

34 वर्षीय नामग्याल यांनी आक्रमक भाणा केले “अनेकांनी आपल्या भाषणात लडाख, लेह आणि कारगीलचा उल्लेख केला. पण खरच त्यांना लडाख ठाऊक आहे का? मागील सात दशकांमध्ये लडाखला देशाच्या एका कोपऱ्यात टाकून देण्यात आले होते. या भागामध्ये गवताची काडीही उगवत नाही अशी वक्तव्येही संसदेमध्ये व्यक्त करण्यात आली होती. गेल्या 71 वर्षांमध्ये लडाखला कधीच स्वीकारले गेले नाही. आम्ही याआधीच आम्हाला जम्मू-कश्मीरबरोबर रहायचे नाही असं सांगितलं होतं पण आमचं कोणी ऐकून घेतलं नाही. त्यामुळेच लडाखचा विकास झाला नाही. मी मूळचा कारगीलचा असून मला मी लडाख केंद्रशासित व्हावे म्हणून मत दिल्याचा मला अभिमान आहे, असे नामग्याल म्हणाले.

युपीए सरकारवर कडाडून टीका
युपीए सरकारवर कडाडून टीका करताना नामग्याल म्हणाले, “युपीए सरकारने 2011 मध्ये कश्मीरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय उभारले. जम्मूनेही भांडून एक विश्वविद्यालय मिळवले. मी त्यावेळी विद्यार्थी परिषदेचा नेता होतो. मी त्यावेळी लडाखमध्ये केंद्रीय विश्विद्यालय उभारण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. मात्र आमच्या मागणीचा कोणताही विचार झाला नाही. पंतप्रधान मोदींनी नुकतेच लडाखमध्ये विद्यापीठ उभारण्यास मंजुरी दिली. म्हणूनच मी म्हणतो की मोदी आहे तर शक्य आहे, अशा शब्दात नामग्याल यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.