
सामना ऑनलाईन, श्रीनगर/इस्लामाबाद
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यामुळे पाकडय़ांचा थयथयाट सुरूच आहे. हिंदुस्थानबरोबरचे सर्व द्विपक्षीय, राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडल्याचे पाक सरकारने आज जाहीर केले. तसेच हिंदुस्थानी राजदूतांचीही पाठवणी केली जाणार आहे. दरम्यान, कश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता असून, 100च्या वर नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. संचारबंदी कायम आहे.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. जम्मू-कश्मीर पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही स्थानबद्ध करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या नेत्यांना त्यांच्या निवासस्थानातून काही मीटर अंतरावरच असलेल्या हरी निवास येथे ठेवण्यात आले आहे.
इंटरनेट, रेल्वेसेवा बंदच
कश्मीर खोऱ्यात वातावरण तणावपूर्ण आहे. दक्षिण कश्मीरमधील सर्व जिह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असतानाच तेथील इंटरनेट आणि रेल्वेसेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि सुरक्षा दलांची नजर आहे.
सचिवालयावर फडकणार तिरंगा
बुधवारी जम्मू येथे असलेल्या राज्य सचिवालयाच्या कार्यालयाच्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये या इमारतीवर दोन झेंडे फडकताना दिसले. यात एक जम्मू-कश्मीरचा झेंडा आणि दुसरा तिरंगा दिसत आहे. 370 कलम रद्द झाल्यामुळे सचिवालयावर आता लवकरच फक्त तिरंगा फडकणार आहे.
पाकडय़ांचा थयथयाट
जम्मू-कश्मीरातून 370 कलम हटविल्यामुळे पाकडय़ांचा जळफळाट सुरू आहे. त्यातच आज पाकिस्तानने हिंदुस्थानबरोबरचे सर्व द्विपक्षीय संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान संसदेचे विशेष अधिवेशन मंगळवारी झाले. आज पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा कमिटीची बैठक झाली. यावेळी पाक सैन्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी माहिती दिली. हिंदुस्थानबरोबरचे सर्व राजनैतिक आणि व्यापार संबंध तोडण्यात येत असून, हिंदुस्थानच्या राजदूतांना परत पाठविले जाईल. तसेच पाकच्या राजदूतांना परत बोलविण्यात येईल, असे कुरेशी यांनी सांगितले. 370 कलम हटविण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात येईल, असे ते म्हणाले.





























































