आभाळमाया –  सौरयान एल-1 वरच का?

>> वैश्विक,  [email protected]

आपल्या अवकाश संशोधन संस्थेने ‘आदित्य एल-1’ हे यान खास सूर्याच्या अभ्यासासाठी अंतराळात एका विवक्षित बिंदूपाशी पाठवले आहे. त्याचे नाव ‘लॅगरॅन्ज’ (किंवा लॅगरॅन्जियन) पॉइंट क्रमांक -1 ऊर्फ एल-1. आपण ज्याला सौरयान म्हणतोय ते ‘आदित्य’ यान प्रत्यक्षात एक सौर वेधशाळा आहे. तशा अनेक सौर वेधशाळा पृथ्वीवरही आहेत. आपल्याच देशात उदयपूरची सोलार-ऑब्झर्व्हेटरी जगप्रसिद्ध असून याशिवाय, गौर बिदनूर येथेही अशीच वेधशाळा आहे.

मग, अवकाशात सौर वेधशाळा पाठवायचं आणि तीही एका विशिष्ट बिंदूपाशीच पाठवण्याचं कारण काय? एक तर, पृथ्वीवरच्या कोणत्याही वेधशाळेला आपल्या दाट वातावरणाच्या काही मर्यादा पडतात. त्याव्यतिरिक्त काही सौर-वैशिष्टय़ं ही सूर्याजवळच पोहोचल्याने अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, परंतु त्याच वेळी सूर्य हा सतत आग ओकणारा, गाभ्यामध्ये दीड कोटी केल्विन (किंवा सेल्सिअस) तापमानाची अव्याहत नैसर्गिक अणुभट्टी असणारा आपला ‘हिरण्यगर्भ’ जनक तारा आहे.

साहजिकच सूर्याच्या ‘जवळ’ याचा अर्थ नेमकं किती दुरून त्याचं वैज्ञानिक दर्शन, सुरक्षितपणे घेता येईल आणि त्याचा विस्तृत ‘डेटा’ पृथ्वीवर राहून मिळवल्यावर कोणते फायदे होतील, या सर्व गोष्टींचा विचार वैज्ञानिकांना करावा लागतो. तसा तो साकल्याने करूनच ‘आदित्य’ वेधशाळा पुढील पाच वर्षांच्या कामगिरीसाठी ‘एल-1’ म्हणजे लॅगरॅन्ज पॉइंट क्रमांक-1 कडे पाठविण्यात आपल्या संशोधकांना यश आले आहे. आता चांद्रयान मोहिमा जशा गोफणगतीने (स्लिंग शॉट गतीने) चंद्राकडे गेल्या त्याच पद्धतीने ‘आदित्य एल-1’चा प्रवास अंतराळात सुरू आहे.

जिथे आपण ‘आदित्य’ सौर वेधशाळा पाठवत आहोत तो लॅगरॅन्ज बिंदू. चंद्राच्याही पलीकडे, पण पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी किलोमीटर असून ही सौर वेधशाळा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर, म्हणजे सूर्य-पृथ्वी अंतरापैकी केवळ एक टक्के अंतरावर जाणार आहे. आपलं रॉकेटरीमधलं जगन्मान्य तंत्रकौशल्य आणि वैज्ञानिकांचे परिश्रम यातून ही गोष्ट साध्य होईल यात शंका नाही. ‘आदित्य एल-1’ पॉइंटपर्यंत पोहोचण्याचा काळ 109 दिवसांचा आहे असं समजतं. त्यानंतर त्यावरची उपकरणं उघडतील आणि सौरनिरीक्षणांचे विविध पैलू जाणून घेता येतील. ती उपकरणं कोणती आणि त्यांचं कार्य काय असेल याआधी आपण ‘स्थिर’ लॅगरॅन्ज बिंदूविषयी माहितीची उजळणी करू या. कारण पूर्वी याच लेखमालेतून त्याविषयी वाचलं आहे.

कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण असते आणि एक लहान वस्तू दुसऱ्या मोठय़ा वस्तूभोवती फिरत असताना दोन्ही वस्तूंचं गुरुत्वाकर्षण पाच ठिकाणी ‘नगण्य’ ठरतं. ते पाच बिंदू म्हणजे ‘लॅगरॅन्ज पॉइंटस्.’ सूर्य आणि पृथ्वी यांच्यात तसेच अनेक ग्रह आणि सूर्य यांचेही ‘लॅगरॅन्ज’ बिंदू आहेत. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातही ते असतातच. ते पॉइंटस् म्हणजे एल-1 ते एल-5. यापैकी एल-1 ते 3 या बिंदूंचा शोध 1750 मध्ये स्वीस गणिती लिओनार्ड युलर यांनी लावला तो लुई लॅगरॅन्ज यांच्या 10 वर्षं आधीच.

मात्र लॅगरॅन्ज यांनी अशा दोन वस्तूंमधील जवळ जवळ शून्य गुरुत्वाकर्षणाच्या एल-4 आणि 5 या बिंदूंची निश्चिती केली होती. लुई लॅगरॅन्ज यांनी त्यांच्या थ्री-बॉडी प्रॉब्लेममध्ये याचा ऊहापोह केला होता. हे दोन्ही तुलनेने अधिक स्थिर बिंदू आहेत. नंतर सर्वच बिंदूंना लॅगरॅन्ज यांचे नाव मिळाले. एल-1 ते एल-3 हे सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरळ रेषेत असून सूर्य पृथ्वीच्या मध्ये, परंतु चंद्राच्या पलीकडे ‘एल-1’ (जिथे ‘आदित्य’ वेधशाळा जात आहे) दोन मोठय़ा वस्तूंपैकी लहान वस्तूंच्या पलीकडे एल-2 आणि मोठय़ा वस्तूंच्या पलीकडे एल-3 असं वर्गीकरण असल्याने निरीक्षणासाठी एल-1 आणि एल-3 अधिक उपयुक्त ठरतात. हे सर्व बिंदू दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आणि केंद्रोत्सारी (सेण्ट्रिफ्युगल) बलांच्या एकत्रित परिणामातून तयार होतात, असं अभ्यासक प्रीतेश रणदिवे यांनी सांगितले.

सूर्यापलीकडचं अवकाश धुंडाळायचं तर एल-2 बिंदू अधिक उपयुक्त ठरतो. कारण त्यात कोणताही अडथळा येत नाही. मात्र सूर्याचेच निरीक्षण करायचे असल्यास चंद्रापलीकडच्या सुरक्षित अशा एल-1 चीच निवड करावी लागते. सध्या तिथेच ‘सोहो’ नावाची एक वेधशाळा आहेच. त्याच्या जोडीला आता ‘आदित्य’ वेधशाळाही तेथे स्थिरावेल. एल-1 वर ‘डीप स्पेस क्लायमेट वेधशाळा’ही असून यातील माहितीचं आदानप्रदान अपेक्षित आहे. 1475 किलो वजनाच्या पीएसएलव्ही रॉकेटद्वारा पाठवलेली ‘आदित्य’ सौर वेधशाळा 244 किलो वजनाची आहे. एल-1 ते 3 हे बिंदू किंचित अस्थिर असल्याने वेधशाळा एल-1 वर स्थिर ठेवण्यासाठी नियमाने बुस्टरचा वापर करावा लागेल, पण स्थिर एल-4 व 5 वर नैसर्गिकरीत्या ‘पकडलेले’ (ट्रोजन) महापाषण (अशनी) असल्याने तिथे कोणताही प्रोब (प्रकल्प) नाही, परंतु 2029 मध्ये तिथे एक प्रोब जाईल (एल-5 वर) एल-2 वरील जेम्स वेब अवकाश दुर्बिण अवकाशाचा उत्तम वेध घेत आहे. सूर्याचा वेध घेताना ‘आदित्य’ पृथ्वीकडे जो डेटा पाठवणार आहे. त्यात प्रामुख्याने सूर्याच्या ‘करोना’चा (प्रभा मंडल) वर्णपट, सौर वारे, सौर ज्वालांची तीक्रता मापन, सूर्याच्या अंतर्भागातील स्पंदनांची माहिती इत्यादी अनेक प्रयोगांचा समावेश आहे. हा डेटा मिळू लागला की त्याविषयी माहिती घेऊच. मात्र त्यासाठी तीन-साडेतीन महिने धीर धरायला हवा. तोपर्यंत ‘आदित्य एल-1’ला सदिच्छा!