जाहले जन्माचे ओझे…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शब्दांकन : राज चिंचणकर

वडिलांबद्दलचा आदर अनेक पटीने वाढवणारा प्रसंग कथन करत आहे… अभिनेत्री गार्गी फुले.

एक मालिका मी घेतली होती करायला आणि ती म्हणजे ‘राजा राणीची गं जोडी’, पण त्याआधी ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याचबरोबर ‘तुला पाहते रे’ मालिकेमुळे बाबांना म्हणजे निळू फुले यांना एक मुलगी आहे, हेसुद्धा लोकांना कळले. माझा तसा स्वभाव नाही, त्यामुळे मी ‘गार्गी निळू फुले’ म्हणून कुठे वावरले नाही. ज्यांनी मला ओळखले त्यांनी ओळखले, नाहीतर स्वतःहून जाऊन कुणाला ‘मी निळूभाऊंची मुलगी आहे’ अशी ओळख करून कधी दिली नाही. तशी ओळख बाबालाही आवडली नसती. वास्तविक, मला खूप अभिमान वाटतो की, मी ‘बाबा’ची मुलगी आहे, पण मुद्दामहून मी कधीही ‘गार्गी निळू फुले’ असे नाव लावले नाही. त्यामुळे ‘तुला पाहते रे’मध्ये अभिनय करणारी एक मुलगी आहे, ती छान काम करतेय, लोक कौतुक करताहेत हे सर्व गाठीशी घेऊन मी ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेच्या शूटसाठी सांगलीत आले.

या शूटिंगच्या वेळची एक घटना आहे, जी मला कधीच विसरता येणार नाही. तिथे आमचा मनोज नावाचा एक स्पॉटबॉय होता. मला कायम जाणवायचे की, तो माझ्याशी संवादच साधत नाही. मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. कधीतरी शूटला काहीतरी गडबड होते, नीट शूट होत नाही, कधी माझ्याकडून मनोजला चढय़ा आवाजात बोलले गेले असेल, हे त्यामागचे कारण असेल का? असा प्रश्न मला पडायचा. मी ठरवले की, याला शांतपणे समजून घेतले पाहिजे. एकदा मी त्याला विचारले, ‘‘तू सगळय़ांशी हसतखेळत वागतोस, मग माझ्याशीच का बोलत नाहीस?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘ताई, तुमच्याशी खूप अदबीने वागायची मला सवय आहे.’’ मी त्याला म्हटले, ‘‘मी तुला असे कधी जाणवून दिले आहे का, मी निळू फुले यांची मुलगी आहे वगैरे.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘ताई, तुमच्या वडिलांचे माझ्या कुटुंबावर व माझ्यावर खूप उपकार आहेत. माझी आई प्रेग्नंट होती आणि तिला प्रेग्नन्सीमध्ये खूप अडचणी येत होत्या. त्या दिवशी रस्त्यात माझे वडील माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी थांबले होते, पण त्यांना काहीच वाहन मिळत नव्हते. तितक्यात निळूभाऊंची गाडी तिथे आली. त्यांनी आईला गाडीतून हॉस्पिटलला नेले. खूप उशीर झाल्यामुळे आईची डिलिव्हरी धोक्याची बनली होती. तेव्हा निळूभाऊंनी डॉक्टरांना फोन केला, त्यांच्या नावावर ते डॉक्टर तिथे आले. आईची डिलिव्हरी झाली आणि मी जन्मलो. इतकेच नाही, तर निळूभाऊंनी त्याकाळचे पाचशे रुपये आईवडिलांच्या हातात ठेवले आणि मगच ते तिथून निघाले. या सगळय़ामुळे मला तुमच्याविषयी खूप आदर आहे आणि म्हणूनच माझ्या तोंडून शब्द निघत नाहीत तुमच्याशी बोलायला. मी तुमच्याशी बोलायला लागलो की, मला भरून येते. म्हणजे डोळे भरतात आणि मला असे वाटते की, मी तुमच्यासमोर ढसाढसा रडेन.’’

त्याचे हे बोलणे ऐकून मला कुठेतरी एकदम असे वाटले की, अरे बापरे, म्हणजे समोर जी माणसे दिसत असतात त्यांच्याविषयी आपण मात्र काहीतरी वेगळेच ठरवून टाकतो. माझ्या वडिलांनी त्याला मदत केली, याचे ओझे त्याला इतके होते की, त्यांच्यामुळे आपण जन्मलो हे तो विसरूच शकत नव्हता. हे सर्व आठवून अजूनही मी अस्वस्थ होते. या सगळय़ामुळे माझा माझ्या वडिलांविषयीचा आदर कितीतरी पटीने वाढला. त्यावेळी ते मूल जन्माला आले नसते तर, माझा बाबा रस्त्यात त्यांना भेटला नसता तर, या विचारानेच मी अस्वस्थ होते. मला ‘तो’ आठवतो आणि आजही अंगावर काटा येतो. आता माझ्याशी कुणी कमी बोलणारा किंवा रुसून बसणारा माणूस बघितल्यानंतर मला भीती वाटते. मी आधी विचार करते की, तो कुठले ओझे घेऊन आला आहे का किंवा त्याच्यावर असलेल्या ओझ्याचा निदान आपण विचार केला पाहिजे. समोरच्याशी बोलताना एखादा माणूस अशा पद्धतीने वागतो, तर त्या वागण्यामागचा अर्थ समजून घेणे फार गरजेचे असते. आपण कुठल्या जगात असतो, कुठल्या वेगवेगळय़ा पद्धतीने माणसे जगत असतात आणि कोणत्या तरी उपकाराच्या ओझ्याखाली माणसे आयुष्यभर असतात. किती वेगळे आहे हे सगळे…!