
>> आरती देवगावकर
काही जणांना दूध आणि त्यापासून बनणारे सगळेच पदार्थ प्रिय असतात, तर काहींना ते डोळ्यासमोरही नको असते. दुधात-कॉफीत-चहात आवर्जून साय घेणारे लोक जसे माहिती आहेत तसे जराशी साय धरली म्हणून ते पेयच नाकारणारे किंवा पुन्हा गाळून पिणारे लोकही पाहण्यात आहेत. ही साय साठवून त्याला विरजण लावून सायीचे दही बनते. रोजच्या खाण्यात दही असावे; अर्थात ते सायीचे नाही तर साध्या दुधाचे. शरीराला अत्यावश्यक असणाऱया जीवाणूंचा पुरवठा अशा विरजण लावलेल्या दह्यातून होतो. हेच दही भरपूर पाणी घालून घुसळून केलेले ताक पचनासाठी अत्युत्तम समजले जाते.
आता एका मंगळागौरीला जाण्याचा योग आला होता. हल्ली अभावानेच होणाऱया जागरणाचा तिथे मात्र उत्साह होता. खेळून दमल्यावर एक अपरिहार्य कार्यक्रम झाला तो म्हणजे उखाणे घेण्याचा. त्यात एका आजींनी उखाणा घेतला… ‘हंडय़ावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, परातीत तूप, तुपासारखं रूप…’ इ. ते ऐकलं आणि लहानपणी आम्ही एक गाणे म्हणायचो तेही आठवलं बऱयाच जणींना- ‘दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दह्याचं ताक, ताकावरचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाचा डेरा, डेऱयाची माती, मातीचा गणपती, गणपतीची घंटा वाजे घण घण घण!’ मजा म्हणून पुन्हा लहान होऊन ते आम्ही जोरजोरात म्हटलेही. जागरण झाले. घरी आले तरी या गाण्याने काही पिच्छा सोडला नाही. वाटलं, किती सहजतेने ‘दूध ते तूप’ हा प्रवास मांडला गेला आहे यात. देवाच्या नावाने सुरू झाल्याने नकळत त्याला एक धार्मिक अधिष्ठान लाभते आणि त्यातून सहजतेने विज्ञानयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचते.
दूध हे पूर्वीपासून पूर्णान्न मानले जाते. लहान मुलांसाठी तर नक्कीच. शाकाहारी व्यक्तींसाठी तो कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत मानला जातो. पूर्वी म्हशीचं आणि गाईचं दूध गवळ्यांकडून सर्रास मिळत असे. शहरांमध्येसुद्धा गोठे आढळत असत. त्यावरून त्या भागाला गवळीवाडा वगैरे नावेदेखील पडली आहेत. पुढे सहकारी तत्त्वावर डेअरी चालू झाल्या. सुरुवातीला या संस्था उत्तम चालू होत्या. आताही चालू आहेतच; पण आता बरेचदा ग्राहकांच्या काही ना काही तक्रारी सुरू झाल्या आहेत. कित्येक संस्थांच्या दुधामध्ये काही अनैसर्गिक घटक मिसळले असावेत का अशी शंका उद्भवू लागली आहे. दूध घट्ट वाटावे, जाड आणि भरपूर साय निघावी यासाठी दुधात केमिकल्स मिसळली जातात हे मागे वृत्तपत्रात आले होते, ते वाचनात आले असेलच. गाई-म्हशींना देण्यात येणाऱया खाण्यातदेखील काही अनैसर्गिक गोष्टी मिसळल्या जातात म्हणे. जास्त दूध द्यावे म्हणून त्यांना हार्मोन्सची इंजेक्शन्सही दिली जातात. अशा जनावरांच्या दुधाने मुलींची पाळी लवकर चालू होणे, मुलांचे वयात येण्याचे वय अलीकडे येणे असे परिणाम दिसू लागले आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यावर पर्याय निघत गेले. आधी जास्त दूध देणाऱया म्हणून जर्सी गाईंची चलती होती. आता देशी गाई उत्तम असे म्हणतात. त्यातही उच्चवर्गीय आणि अति श्रीमंतांकडे येणाऱया दुधाच्या किमती पाहिल्या तर अवाक् होण्यापलीकडे हातात काही उरत नाही. तीनशे रुपये लिटरपेक्षाही अधिक भाव, काही केल्या पचनी पडत नाही. शेवटी फार विचार न करता आपला गवळी जे दूध आणून घालतो ते उत्तम म्हणायचे नि शांत राहायचे धोरण स्वीकारावे हे बरे.
काही जणांना दूध आणि त्यापासून बनणारे सगळेच पदार्थ प्रिय असतात, तर काहींना ते डोळ्यासमोरही नको असते. दुधात-कॉफीत-चहात आवर्जून साय घेणारे लोक जसे माहिती आहेत तसे जराशी साय धरली म्हणून ते पेयच नाकारणारे किंवा पुन्हा गाळून पिणारे लोकही पाहण्यात आहेत. ही साय साठवून त्याला विरजण लावून सायीचे दही बनते.
रोजच्या खाण्यात दही असावे; अर्थात ते सायीचे नाही तर साध्या दुधाचे. शरीराला अत्यावश्यक असणाऱया जीवाणूंचा पुरवठा अशा विरजण लावलेल्या दह्यातून होतो. हेच दही भरपूर पाणी घालून घुसळून केलेले ताक पचनासाठी अत्युत्तम समजले जाते. पोटाला आणि एकुणातच शरीराला थंडावा, तकवा देणारे हे ताक देवांच्या राजाला, इंद्रालाही दुर्लभ; पण आपणा मर्त्य मानवाला मात्र सहजी उपलब्ध असे आहे. यासाठी आपण स्वतःला नशीबवानच मानले पाहिजे, नाही का?
सायीचे दही लावले की, त्यापासून घुसळून लोणी निघते. हे लोणीदेखील औषधी असते. ताजे लोणी चवीला तर चांगले असतेच, शिवाय बद्धकोष्ठता विकारावर गुणकारी असते. हे लोणी मंद आचेवर कढवले की, तूप मिळते. तूप कढवताना घरभर जो सुगंध दरवळतो त्याची तुलना दुसऱया कशाशी करताच येऊ शकत नाही. असे लोणकढे तूप गरम भात, मेतकूट आणि लिंबाच्या लोणच्याची फोड… अहाहा यापुढे स्वर्गसुखही फिके वाटेल.
हल्ली विरजण लावा, ताक घुसळा, लोणी काढताना हात बरबटवून घ्या आणि मग ते कढवून तूप बनवा एवढय़ा लांबलचक प्रक्रियेचा लोकांना कंटाळा येतो. डबाभर साय साठवून ती कुणाला तरी देऊन टाकणारे लोक पाहिले की, मनाला त्रास होतो. शिवाय हल्ली थेट ही साठलेली साय कढवून तूप केले जाते. मधल्या सगळ्या पायऱया यात गाळल्या जातात. सोपे पडते या नावाखाली आपण शास्त्र्ाापासून दूर जातो आहोत हे या लोकांच्या गावीही येत नाही याची कमाल वाटते. केवळ परंपरा म्हणून नव्हे तर त्यामागील विज्ञान लक्षात घेऊन आपण ही गोष्ट केली तर आपले आणि पुढच्या पिढय़ांचे आरोग्य राखण्यात काही अंशी आपला हातभार लागेल नाही का? त्यामुळे दूध ते तूप हा प्रवास डोळसपणे करा एवढेच सांगणे. तोवर मस्त खा नि स्वस्थ राहा !
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)




























































