खाणं आणि बरंच काही – काही आंबट काही गोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आरती देवगावकर

लोणचे! लागते किती तर अगदी लहान चमचाभर, पण ते भाव खाऊन जाते; जेवणाच्या ताटातही आणि बनवतानाही. ते बनतानाचा थाट तर विचारूच नका. वर्षभराचे लोणचे घालणे हा कैक घरांमध्ये एक सोहळाच असतो. तसेच नियोजन, तेवढीच पूर्वतयारी, तेवढेच कष्ट आणि सगळा निरानिपटा झाल्यावर येणारी तशीच कृतकृत्यतेची भावना, सगळं कसं एखाद्या समारंभाप्रमाणेच.

ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ रघुनाथ माशेलकर एका भाषणात म्हणाले होते, की, ‘‘हिंदुस्थानात संशोधन फक्त प्रयोगशाळेत होत नाही, तर शेतात शेतकरी आणि घराघरांतल्या गृहिणी निरंतर संशोधन करत असतात, फक्त त्याची नोंद होत नाही.’’ याचे प्रत्यक्ष उदाहरण बघायचे तर आपले जेवणाचे ताट पहा. आपले जेवणाचे ताट विविध पदार्थांनी सजलेले असते. सणावाराला किंवा कुणी पाहुणे येणार असताना होणारे साग्रसंगीत भोजन असो किंवा आपले रोजचे जेवण, ताटाची डावीकडची बाजू जेवणात अगदी मस्टच! आणि त्यात तिखट-गोड-आंबट-खारट हे सगळे प्रमाणात पडलेले कुठलेही लोणचे… अहाहा! नुसते नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.

लोणचे! लागते किती, तर अगदी चमचाभर, पण ते भाव खाऊन जाते; जेवणाच्या ताटातही आणि बनवतानाही. ते बनतानाचा थाट तर विचारूच नका. वर्षभराचे लोणचे घालणे हा कैक घरांमध्ये एक सोहळाच असतो. तसेच नियोजन, तेवढीच पूर्वतयारी, तेवढेच कष्ट आणि सगळा निरानिपटा झाल्यावर येणारी तशीच कृतकृत्यतेची भावना, सगळं कसं एखाद्या समारंभाप्रमाणेच.

सहसा सगळीकडे घातले जाणारे लोणचे म्हणजे कैरीचे लोणचे. आंबे खाऊन सुस्तावलेले मन-शरीर पहिल्या पावसाच्या चाहुलीने लख्खकन जागेवर येते. घरातली पोक्ती-पुरवती आजीबाई आधीच मागे लागलेली असते, ‘‘पाऊस येईल गं, बरण्या धुऊन घ्या.’’ मग आदल्या वर्षीच्या बरण्या मोकळ्या केल्या जातात. बहुतांशी त्या संपलेल्या असतात किंवा त्या मार्गावर असतात. उरलेसुरले लोणचे असलेच तर ते छोटय़ा बाटल्यांमध्ये काढून मोठय़ा चिनी मातीच्या बरण्या मोकळ्या केल्या जातात. काळजीपूर्वक धुतल्या जातात. त्यांना चांगले ऊन दाखवले जाते.

मग तयारी सुरू होते मसाल्याची. लोणच्याचा मसाला ही तर खरी सुगृहिणीची ओळख! काही ठिकाणी बाजारचा तयार मसाला वापरला जातो, तर काही घरांमध्ये पूर्वापार त्या घरच्या चवीनुसार घरीच मसाला बनतो. मग त्यासाठी लागणारे घटक पदार्थ, जसे की मोहरी, लाल तिखट, मेथ्या, हिंग, हळकुंडे इ. आणून त्याची पुढची सगळी उस्तवार केली जाते. आता प्रतीक्षा असते पहिल्या पावसाची. जुन्या बायका अजूनही पहिला पाऊस पडून गेला की, मगच वर्षाचे लोणचे घालतात.

मंडईतल्या ठरावीक भाजीवाल्याकडे जाऊन हव्या तेवढय़ा कैऱया आणल्या जातात. त्या धुऊन पूर्ण कोरडय़ा केल्या जातात. चुकूनही ओलसरपणा राहून चालत नाही. राहिला तर लोणचे खराब होणार याची पूर्ण गॅरंटी! सुकलेल्या कैऱयांचे आपल्या आवडीप्रमाणे बाठीसकट, बाठीशिवाय, लहान-मोठे असे तुकडे केले जातात. आता या फोडींवर ठरलेल्या प्रमाणात मसाला, तिखटमीठ घातले जाते. धसमुसळेपणा न करता हलक्या हाताने, मायेने गोंजारल्यासारखे करत सगळ्या फोडींना सगळीकडून सारखा लागेल अशा प्रकारे तो चोळला जातो. त्या वेळी त्या खमंग वासाने आजूबाजूला जमलेल्या घरातल्या बालगोपालांनी त्यात पटकन हात घालून एखादी फोड उचलू नये यासाठी फार दक्ष असावे लागते बरे! त्यांच्यासाठी काही नैवेद्य बाजूला काढून द्यावाच लागतो, शेवटी जे करायचे ते त्यांच्याचसाठी तर असते. त्यांच्या तोंडावरचे त्या आंबट-तिखट फोडी चोखतानाचे भाव अगदी पाहण्यासारखे असतात. ब्रह्मानंदी टाळी लागते अगदी. फोडींना मसाला लावायला घ्यायच्या आधी भरपूर तेलाची खमंग फोडणी करून ठेवलेली असते. ती पूर्ण थंड झाल्यावरच लोणच्यावर ओतायची म्हणून आधी करून ठेवायची. ही गार फोडणी ओतून पुन्हा एकदा लोणचे कालवले जाते आणि मग स्वच्छ केलेल्या बरण्यांमध्ये निगुतीने भरले जाते. ताजे लोणचे एका लहानशा भांडय़ात मुद्दाम ठेवले जाते. संध्याकाळच्या जेवणासाठी. लोणच्याच्या बरण्या घट्ट झाकण लावून घेऊन जागेवर गेल्या की, बाईला हुश्श होते. रात्री जेव्हा ‘‘मस्त झालंय हं लोणचं,’’ अशी दाद येते तेव्हा तिला केलेल्या सगळ्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटते.

मग हे लोणचे उपयोगी पडते, कधी ताटाची रंगसंगती साधत डोळ्यांना सुखवायला, कधी तोंडाची गेलेली चव परत आणायला, कधी भाजी करायचा आलेला कंटाळा सांभाळून न्यायला, एखाद्या डोहाळतुलीचे डोहाळे पुरवायला आणि अशाच कितीतरी वेळा मारून न्यायला. अगदी आई घरी नसेल तर ब्रेडला हे लावून पोट भरायलाही!

महाराष्ट्रात जसे वर्षाचे हे लोणचे घालतात तशाच प्रत्येक प्रदेशात कितीतरी निरनिराळ्या प्रकारची लोणची घातली जातात. त्याची नुसती यादी करायची म्हटले तरी एका लेखाची जागा वापरावी लागेल आपल्याला. या कैरीच्या लोणच्याच्याच कितीतरी तऱहा असतात- गोड, तिखट, किसून, खाराचे, कोरडे, कारले घातलेले, लसूण घातलेले, शिवाय लिंबू लोणचे – तिखट आणि गोड, आवळ्याचे, माईनमुळ्याचे, मिरचीचे इ. या बेगमीच्या लोणच्यांशिवाय तात्पुरती केली जाणारी वेगवेगळी लोणची हा अजूनच निराळा मामला. भाज्यांच्या लोणच्याची लज्जत हिवाळ्याच्या दिवसांत काही औरच!
अशी ही लज्जतदार, चटकदार लोणची म्हणजे आपल्या गृहिणींनी केलेले पिढय़ान्पिढय़ांचे संशोधनच म्हणायला हवे. अजूनही हे संशोधन सुरूच आहे, दिवसागणिक यात नवनव्या कल्पनांची भर पडते आहे. या वाटेवरून असेच निरंतर चालत राहू या.

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)

n [email protected]