
>>आशिष बनसोडे
हे जीवन सुंदर आहे. विविध रंगांची उधळण, निसर्गाचा विलोभनीय आविष्कार, मनुष्यनिर्मित अफलातून कलाकुसरी…या आणि अशा विविध अंगांनी जग नटलंय, सजलंय…पण जन्माला येऊनही हे स्वर्ग प्रत्यक्ष पाहता आले नाही तर जन्माला येणं व्यर्थच. अंधकारमय आयुष्य जगावे लागणार असेल तर असं जगणं नाहीच्याच बरोबर…आजही अनेकांच्या वाटय़ाला दृष्टीहीन जीवन येतं. जन्मताच अंधत्व आल्याने आयुष्यच काळवंडून जाते. हे चित्र बदलू शकते. जर वेळीच दृष्टीच्या आड येणारा ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ म्हणजेच ‘आरओपी’ ओळखला तर जन्मापासून येणाऱया अंधत्वावर मात करता येते.
आजूबाजूला कोणी ना कोणी अंध व्यक्ती सहज पाहायला मिळतात. काहींना जन्मत:च अंधत्व आलेले असते, तर काहींची अपघाताने दृष्टी हिरावली जाते. परिणामी आयुष्य अंधाऱया वाटेवरून घालवावे लागते. हे जरी उघड असले तरी जन्मत येणारे अंधत्व रोखता येऊ शकते. वेळीच आवश्यक उपचार करून दृष्टी सहीसलामत ठेवता येते, पण हीच बाब आजही कोणाला माहिती नसल्याचे चित्र आहे. मुळात कुठल्या बाळाला जन्मत अंधत्व येते हेच कोणाला फारसे ठाऊक नसते. त्यामुळे ते आधी जाणून घेणे गरजेचे व महत्त्वाचे आहे, परंतु त्या बाबतीत हवी तशी जनजागृतीदेखील होत नाही हेही तितकेच गंभीर आहे. म्हणूनच सर्व प्रकरण बिघडते आणि होत्याचे नव्हते होऊन बसते. याचीच गंभीर दखल घेत के. बी. हाजी बच्चुअली रुग्णालयाच्या माध्यमातून ‘आरओपी’वर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे त्याला यशदेखील मिळत आहे.
कोणाला अंधत्व येते हे जाणून घ्यायला हवे. अकाली जन्मलेले व कमी वजनाचे बाळ असेल तर त्याला रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (आरओपी) हा नेत्रपटलाचा विकार होण्याची जास्त शक्यता असते. दिवस पूर्ण होऊन जन्मलेल्या अर्भकांमध्ये रेटिनाची (नेत्रपटलाची) पूर्णत वाढ जन्मानंतर काही आठवडय़ांत होते. पण अकाली जन्मलेल्या अर्भकांमध्ये नेत्रपटलाची वाढ पूर्णत झालेली नसते. परिणामी नेत्रपटलाला रक्त पुरवठा करणाऱया रक्तवाहिन्यांची अस्वाभाविक वाढ होऊ लागते आणि हेच अंधत्वाचे कारण ठरू शकते. नेत्रपटलातील रक्तवाहिन्यांच्या या अस्वाभाविक वाढीला रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी म्हटले जाते. अकाली जन्माला आलेल्या सर्वच बाळांना आरओपी होतोच असे नाही. ज्या बाळाचे जन्मत वजन दोन हजार ग्रॅमपेक्षा कमी असेल किंवा ज्याचा जन्म 34 आठवडय़ांपूर्वी झाला असेल अशा बाळांना आरओपी होण्याचा जास्त धोका असतो. इतकेच नाही तर जन्मलेल्या बाळाला एखाद्या आजारामुळे खूप दिवस अतिदक्षता विभागात ठेवावे लागले आणि त्याला कृत्रिम ऑक्सिजन द्यावे लागले, तर अशा बाळांना आरओपी होण्याची दाट शक्यता असते.
वेळीच आरओपी ओळखायला हवा. जन्माला आलेल्या बाळाला आरओपी आहे किंवा नाही ते वेळीच ओळखले पाहिजे. त्यासाठी बाळाची वेळीच तपासणी करणे हा एकमेव उपाय आहे. डोळय़ांची तपासणी केल्यावर आरओपी आहे किंवा नाही याचे निदान करता येते. बाळाच्या डोळय़ांची तपासणी त्याच्या जन्मानंतर 30 दिवसांच्या आत करावी. ही तपासणी नवजात शिशू विभागामध्ये डिस्चार्जच्या आधी करता येते. जो नेत्ररोग तज्ञ आरओपी निदान व चिकित्सा सेवा प्रशिक्षित आहे. म्हणजेच जे रेटिना तज्ञ किंवा बाल नेत्र तज्ञ असतात ते बाळांच्या डोळय़ांची तपासणी करून आरओपी आहे किंवा नाही ते शोधतात.
आरओपीचे स्तर हे रक्तवाहिन्यांची विकृती कशा प्रकारे व कोणत्या भागात होते यावरून ठरते. पहिल्या स्तरावर रक्तवाहिन्यांची अविकसित वाढ होते, तर दुसऱया स्तरावर रक्तवाहिन्यांची मध्यम प्रकारची अविकसित वाढ होते. तिसऱया स्तरावर रक्तवाहिन्यांची गंभीर प्रकारे अविकसित वाढत होते. चौथ्या स्तरावर रेटिना अंशत सरकतो, तर पाचव्या स्तरावर रेटिना पूर्णत सरकतो. साधारणत पहिला, दुसरा व बऱयाच वेळा तिसरा स्तर आपोआप निघून जातो, पण काही अर्भकांचे आरओपी गंभीर रूप धारण करतो. डोळय़ांमध्ये रक्तस्त्राव होतो. परिणामी रेटिना सरकतो आणि पूर्ण अंधत्व येते.
के. जी. हाजी बच्चुअली इस्पितळाच्या वतीने ही गंभीर बाब लक्षात घेऊन आरओपीवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. इस्पितळाचे वैद्यकीय संचालक जी. चंद्रेशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद सुब्रमण्यम, आशीष दोशी आणि प्राची आगाशे हे डॉक्टर सिस्टर आणि आवश्यक टेक्निशियनच्या माध्यमातून तसेच अशोक गायकवाड यांच्या समन्वयाने शीव इस्पितळ, केईएम, नेस वाडिया, के. जी. सोमय्या, शताब्दी इस्पितळ तसेच कळव्यातले छत्रपती शिवाजी महाराज आणि नवी मुंबईतील नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन व राजमाता जिजाऊ इस्पितळ येथे नवजात बाळांमध्ये आरओपीची समस्या आहे का याचा शोध घेऊन पुढची कारवाई करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत अकाली जन्मलेल्या व दोन किलोपेक्षा कमी वजानाच्या जवळपास 14 हजार 998 बाळांच्या डोळय़ांची तपासणी करून त्यातील 912 बाळांची दृष्टी जाण्यापासून वाचविण्यात या
डॉक्टरांच्या पथकाला यश मिळाले आहे, तर उर्वरित बाळांना उपचाराची आवश्यकता भासली नाही. म्हणजेच अकाली जन्मलेल्या व दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांच्या डोळय़ांची वेळीच तपासणी केली, तर त्यांची दृष्टी हिरावली जाण्यापासून रोखता येईल. पण यासाठी पालकांमध्ये, नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. विशेषकरून ज्यांना अकाली बाळ होईल त्या पालकांनी आपल्या बाळाची नेत्र चिकित्सा करून घ्यायलाच हवी. आरओपीबाबत आणखी मोठय़ा स्तरावर जनजागृती व त्यावर उपचार होण्याच्या दृष्टीने डॉक्टरांचे पथक प्रयत्नशील असल्याचे गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.
तरीही काळजी घ्यावी लागतेच
अकाली जन्मलेल्या बालकाला आरओपी असेल किंवा नसेल तरीही त्याला नजर कमी असणे (कमी वयात चष्म्याचा नंबर लागणे) तिरकसपणा, डोळे अस्थिर असणे, एंबिलोपिया आदी होऊ शकते. यामुळे अकाली जन्मलेल्या बालकांची पहिले दहा वर्षे नियमित नेत्र तपासणी करून घेणे गरजेचे ठरते.




























































