भक्तिमार्गावरील शिल्पवैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

अखंड भारतवर्षात सर्वत्र साजरा होणारा, अत्यंत लोकप्रिय असा दीपावलीचा सण हा दिव्यांचा, प्रकाशाचा, उजेडाचा उत्सव होय. दिव्याचे आपल्या आयुष्यातील असलेले अनन्यसाधारण महत्त्व या सणाच्या निमित्ताने अधोरेखित केले जाते. अंधकारावर मात करून उजेडाच्या, उन्नतीच्या, प्रकाशाच्या वाटेवर जाताना हे असंख्य दिवे आपल्याला उजेड दाखवतात. मग ते पणतीच्या स्वरूपात असतील नाहीतर समईच्या स्वरूपात असतील. अखंड तेवत राहणे आणि पथिकाला मार्ग दाखवत राहणे हेच या लक्ष लक्ष दिव्यांचे उद्दिष्ट असते. स्थापत्यशास्त्र्ााचं प्रतिबिंब आपल्याला मंदिर स्थापत्यामध्ये जागोजागी दिसून येते.

स्थापत्यशास्त्रातील वैविध्यपूर्ण प्रतीकं आपल्याला मंदिर स्थापत्यामध्ये जागोजागी दिसून येतात. नुसते दिवेच नाहीत तर इथे असलेली अनेक प्रतीके, चिन्हे, शिल्पे आपल्याला भक्तिमार्गावर सतत मार्गदर्शन करीत असतात. त्यांचा अस्तित्वाने आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होते. आयुष्यातील अनेक घटनांचे प्रतिनिधित्व या गोष्टी करत असतात. मंदिर हे केवळ देवाचे निवासस्थान नसून ती एक सामाजिक संस्था आहे. इथे अनेक लोकांचा सतत वावर होत असल्यामुळे त्यांच्या शिकवणुकीसाठी, त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, तत्त्वज्ञान खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात रुजवण्यासाठी मंदिरांची, त्यावरील शिल्पांची आणि इतर गोष्टींची निर्मिती झाली असे म्हणता येईल.

मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या दीपमाळा यादेखील काही विशिष्ट उद्देशाने बांधल्या गेल्या असे म्हणता येईल. खासकरून महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये असलेल्या दीपमाळा या खूपच आगळय़ावेगळय़ा आणि वैशिष्टय़पूर्ण आहेत. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या दीपमाळा साऱया परिसराची शोभा वाढवतात. महाराष्ट्रात जवळ जवळ सर्व महत्त्वाच्या देवळांमध्ये दीपमाळा दिसतातच, पण काही आडवाटेवरच्या मंदिरांसमोरसुद्धा अत्यंत सुंदर आणि कलात्मक दीपमाळा पाहायला मिळतात. मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात असलेल्या दीपमाळा या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांनी उजळलेल्या दिसतात. त्रिपुरारी पौर्णिमेला या दीपमाळांवर त्रिपूरवात लावणे यालाच कोकणात टिपर पाजळणे असे म्हटले जाते. पुण्याच्या जवळ असलेल्या चास या गावची दीपमाळ अशीच भव्य, देखणी आणि आगळीवेगळी आहे. चास हे गाव पहिल्या बाजीराव पेशव्यांचे सासूरवाडीचे गाव होय. गावात चासकर जोश्यांचा एक भलामोठा वाडासुद्धा आहे. या गावचे वैशिष्टय़ म्हणजे ग्रामदैवत असलेले श्री सोमेश्वर महादेवाचे मंदिर. या मंदिराच्या प्रांगणातच एक भव्य मोठी अशी दीपमाळ आहे. 256 दिवे असलेली अशी ही डौलदार दीपमाळ त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री अनेक दिव्यांनी उजळते. त्रिपुरारीला रात्री सोमेश्वरावर रुद्राचा अभिषेक होतो आणि त्यानंतर गावातली तरुण मंडळी या दीपमाळेच्या प्रत्येक खोबणीमध्ये पणत्या लावतात. विजेचे दिवे बंद करतात आणि सगळा आसमंत त्या लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. अशाच भव्य दीपमाळा शिखरशिंगणापूर इथे असलेल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळतात.

दुसरी एक दीपमाळ आहे ती म्हणजे नगर जिह्यातल्या कर्जत तालुक्यातील राशीन या गावातल्या भवानी/जगदंबा मंदिरातली. इथे अत्यंत डौलदार अशा दोन दीपमाळा आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे या चक्क हलतात. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. वर जाण्यासाठी बाहेरून आणि आतून जिने केलेले आहेत. वर गेल्यावर एक लाकडी दांडा आहे. तो धरून हलवला की, दीपमाळ हलते. हा चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे. बीड जिह्यातील रेणापूर, शिरूरजवळील कर्डे इथेही अशाच डोलणाऱया दीपमाळा आहेत. कोकणातल्या राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या गावी असलेल्या भार्गवराम मंदिरातील दीपमाळ अशीच पाहण्याजोगी आहे. इथे या दीपमाळ खूपच वेगळय़ा पद्धतीने बांधलेली आहे. आधी चौकोनी, मग वर काहीशी गोल अशा पद्धतीची ही दीपमाळ आहे. देवाचे गोठणे हे गाव कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांना इनाम म्हणून दिलेले गाव आहे. पुण्याजवळच्या पांडेश्वर या मंदिरासमोर असलेली दीपमाळ ही विटांची बांधलेली आहे. आतून पोकळ असलेल्या या दीपमाळेमधून वर जाण्यासाठी जिना आहे. तिथेच जवळ असलेल्या लोणी भापकर या गावी असलेल्या भैरवनाथ मंदिरातील दीपमाळा अशाच उंच आणि अत्यंत देखण्या अशा आहेत. काही दीपमाळांमध्ये खोबणी करून त्यामध्ये दिवे ठेवायची व्यवस्था केलेली असते तर काही दीपमाळांना पणत्या किंवा दिवे ठेवण्यासाठी काही प्रोजेक्शन्स केलेली आढळतात. मंदिराच्या सौंदर्यात कायम भरच घालणाऱया या दीपमाळा कायम प्रकाशाचीच वाट दाखवतात. सारा आसमंत उजळून टाकून मनामध्ये अपार भक्ती निर्माण करण्याचे काम या दीपमाळा कायमच करीत आल्या आहेत.

या दीपमाळेप्रमाणेच गरुडस्तंभ आणि नंदीस्तंभ आपल्याला मंदिराच्या आवारात पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये यांचे दर्शन अगदी दुर्मिळ असे आहे, पण कर्नाटकातील मंदिरांमध्ये हे अगदी आवर्जून पाहायला मिळतात. विष्णू मंदिराच्या प्रांगणात उंच असा खांब असून त्यावर एक छोटीशी घुमटी बांधलेली असते. त्या घुमटीमध्ये हात जोडलेल्या स्थितीमधील गरुडाचे शिल्प पाहायला मिळते. अगदी तशाच स्वरूपात शिवमंदिराच्या प्रांगणात त्या घुमटीमध्ये बसलेला नंदी पाहायला मिळतो. जसे विजयस्तंभ खूप उंच आणि मोठे बांधायची प्रथा आहे, त्याचप्रमाणे हे गरुडस्तंभ आणि नंदीस्तंभ आपल्याला मंदिराच्या प्रांगणात पाहायला मिळतात. बऱयाच वेळा त्या खांबांवर मोठय़ा प्रमाणात नक्षीकाम केलेले आढळते. उत्तर कर्नाटकातल्या शिरसी, शिमोगा आणि आसपासच्या बळ्ळीगावी, बनवासी, बंदलिके, कोटीपुरा, केळदी या ठिकाणी असलेल्या मंदिरांमधील हे उंचच्या उंच गरुड किंवा नंदीस्तंभ पाहण्यासारखे आहेत. बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरातील गरुडस्तंभ केवळ देखणा आणि आवर्जून पाहण्यासारखा आहे.

मंदिरामध्ये आणि परिसरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्या निव्वळ अस्तित्वाने सतत मार्गदर्शन करत असतात. कीर्तिमुख हासुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. अनन्यसाधारण भक्ती कशी असावी याचे हे एक द्योतक आहे याची आपल्याला काही माहीत नसते आणि म्हणून ते काय आहे, त्याचे मंदिरावर प्रयोजन काय याचा आढावा घेणे गरजेचे ठरते. मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात, गर्भगृहाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले असते किंवा चित्रित केलेले असते. त्याला कीर्तिमुख असे म्हणतात. पुढे कीर्तिमुख हे एक डेकोरेटिव्ह मोटिफ म्हणून मंदिर स्थापत्यामध्ये वापरले जाऊ लागले. मंदिराच्या बाह्यांगावर जसे गजथर, अश्वथर असतात तसेच कीर्तिमुखथरसुद्धा दिसू लागले. दक्षिणेकडे होयसळ राजवटीमध्ये बांधल्या गेलेल्या बेलू, हळेबिडू इथल्या मंदिरांवर हा कीर्तिमुखाचा थर प्रकर्षाने पाहायला मिळतो. अनेक मंदिरांच्या छतावरसुद्धा कोनामध्ये ही कीर्तिमुखे कोरलेली पाहायला मिळतात.

मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर मुख्य देवतेची मूर्ती ही गर्भगृहामध्ये बसवलेली असते. ‘गर्भगृह’ हा शब्दसुद्धा किती समर्पक वापरला गेला आहे नाही का. ज्या ठिकाणी गेल्यावर आपले मीपण गळून पडते. आपली साक्षात ईश्वराशी गाठ पडते. मी आणि तो भगवंत एकाच आहोत याची जाणीव होते. त्याचे ज्ञान प्राप्त होते. याचाच अर्थ आपला पुन्हा एकदा जन्म होतो. त्यामुळे जन्म होण्याची जागा ती म्हणजे गर्भगृह. अर्थातच इथे अंधार असला पाहिजे. फक्त तेवणारी एक समई आणि त्या गूढ प्रकाशामध्ये आपल्याला झालेली स्वतःची ओळख. अत्यंत पवित्र, अत्यंत अर्थपूर्ण आणि ज्ञानामुळे स्वतःला होणारी स्वतःची ओळख असे हे गर्भगृह.

– [email protected]