तिमिराकडून तेजाकडे – दीपमाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणजे या दीपमाळा. भक्तिमार्गावरील वाटसरूला पथदर्शी असणाऱया या दीपमाळा. सामर्थ्य, समृद्धी आणि संपन्नता यांची श्रीमंती मिरवणाऱया या दीपमाळा. रम्य नदीकाठ, त्याशेजारी उभे असलेले पुरातन देवालय. अधूनमधून होणारा घंटानाद, मंदिराचा फरसबंदी परिसर आणि त्या प्रांगणात मोठय़ा डौलाने उभी असलेली दीपमाळ. महाराष्ट्रातल्या गावागावात हे रम्य दृश्य हटकून बघायला मिळते. उत्सवाच्या प्रसंगी या दीपमाळा अनेक दिव्यांनी उजळून जातात. शांत, सौम्य अशा उजेडाने मंदिराचा सारा परिसर प्रसन्न होतो. मंदिराच्या सौंदर्यात भर घालणाऱया या दीपमाळा कायमच प्रकाशाची वाट दाखवतात.

ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरामुळे उन्मत्त झालेला त्रिपुरासुर कोणालाही जुमानेसा झाला. त्याने सर्वत्र हलकल्लोळ माजवला. तिन्ही लोकी आपली दहशत निर्माण केली. तेव्हा सर्वांनी देवाधिदेव महादेवाकडे मदतीची याचना केली. महादेवांनी सर्वांना आश्वस्त केलं आणि त्रिपुरासुराचं निर्दालन केलं. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमा. हाच दिवस पुढे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जाऊ लागला. याच दिवशी सर्वत्र शंकराच्या देवळांमध्ये असलेल्या दीपमाळा अनेक दिव्यांनी उजळून निघतात. दुष्ट शक्तींवर, अंधकारावर मिळालेला तो विजय दिवे लावून साजरा केला जातो. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर आपल्याला दर्शन होते ते देखण्या, डौलदार दीपमाळेचे.

तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणजे या दीपमाळा. भक्तिमार्गावरील वाटसरूला पथदर्शी असणाऱया या दीपमाळा. सामर्थ्य, समृद्धी आणि संपन्नता यांची श्रीमंती मिरवणाऱया या दीपमाळा. रम्य नदीकाठ, त्याशेजारी उभे असलेले पुरातन देवालय. अधूनमधून होणारा घंटानाद, मंदिराचा फरसबंदी परिसर आणि त्या प्रांगणात मोठय़ा डौलाने उभी असलेली दीपमाळ. महाराष्ट्रातल्या गावागावात हे रम्य दृश्य हटकून बघायला मिळते. मंदिराचे पावित्र्य, अनुभवाला येणारी शांतता या सगळ्याला तिथे असणाऱया दीपमाळा निश्चितच कारणीभूत असतात. देवालयांच्या समोर हमखास उभी असलेली दीपमाळ म्हणजे महाराष्ट्राचे वैभव म्हणावे लागेल.

मंदिरात होणाऱया उत्सवात उंच ठिकाणी दिवे लावण्याची प्रथा अगदी पूर्वापार चालू आहे. देवळासमोर हातभर उंचीचे दगडी स्तंभ उभारून त्यावर कापूर जाळायची पद्धतदेखील बरीच प्राचीन आहे. असे स्तंभ प्राधान्याने शिवालयांसमोर असत आणि ते शिवरूप समजले जात. असे स्तंभ दक्षिणेतील देवालयांसमोर आजही आढळतात. तिथे त्यांना दीपदंड असे म्हणतात. दक्षिणेत देवालयांत समयांचे आणि दीपलक्ष्मीचे जे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यातल्या अनेक समया दगडी असतात. काही समयांची उंची दहाबारा फूट उंच असते तर काहींना झाडासारखा आकार दिलेला असतो. या दीपवृक्षांच्या शाखेशाखेवर दिवे पाजळतात. आपल्याकडच्या दीपमाळांची ही पूर्वरूपे म्हणावी लागतील. महाराष्ट्रात यादव काळापर्यंत दीपमाळा आढळत नाहीत. इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दीपमाळा आपल्याकडील मंदिरांमधून दिसू लागतात.

त्यामुळे दीपमाळा हे मराठा स्थापत्य शैलीचे खास वैशिष्टय़ समजले गेले आहे. आकाराने लहान होत गेलेले दगड एकावर एक रचून सर्वात वर एक दगडी खोबण केली जाते आणि त्यात दिवा लावला जातो. हे झाले दीपमाळेचे अगदी प्राथमिक स्वरूप, परंतु कलाकारांच्या कल्पक दृष्टीमुळे या साध्या रूपालासुद्धा एक देखणे स्वरूप प्राप्त झाले. दीपमाळांच्या रूपात आणि आकारात विविधता आली. त्यांचे सौंदर्य वृद्धिंगत केले गेले आणि मग आपल्यासमोर उभ्या राहिल्या अत्यंत डौलदार आणि देखण्या अशा एकापेक्षा एक सुंदर दीपमाळा.

आपल्या मंदिरांमध्ये असलेल्या दीपमाळा या बऱयाचदा खूप आगळ्यावेगळ्या आणि वैशिष्टय़पूर्ण असतात. दीपमाळांमध्ये खोबणी करून त्यामध्ये दिवे ठेवायची व्यवस्था केलेली असते, तर काही दीपमाळांना पणत्या किंवा दिवे ठेवण्यासाठी काही प्रोजेक्शन्स केलेली आढळतात. त्यांना ‘हात’ असा शब्द आहे. दीपमाळेच्या सर्वात वर नक्षीदार, गोल खोलगट भाग असतो, ज्यात तेलात भिजवलेली मोठी वात जाळली जाते. हा वरचा भाग अनेक ठिकाणी खूप आकर्षक घडवलेला असतो. दगडी पाकळ्या असलेला गोलसर भाग लांबूनसुद्धा उठून दिसतो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात असलेल्या दीपमाळा अनेक दिव्यांनी उजळलेल्या दिसतात. त्रिपुरारी पौर्णिमेला या दीपमाळांवर त्रिपुरवात लावली जाते. यालाच कोकणात ‘टिपर पाजळणे’ असे म्हटले जाते.

या दीपमाळांची रूपे आणि त्यांचे सौंदर्य पाहायचे असेल तर विविध गावांच्या आणि विविध मंदिरांतील दीपमाळा बघायला हव्यात. देखणी, डौलदार, सुंदर अशी विशेषणे असलेली एक दीपमाळ आहे पुण्याच्या जवळ असलेल्या चास या गावी. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या सासूरवाडीचे हे गाव. जोशी घराण्यातील लाडूबाई ऊर्फ ताईबाईसाहेब यांचा विवाह बाळाजी विश्वनाथ भट पेशव्यांचा थोरला मुलगा विश्वासराव ऊर्फ विसाजी ऊर्फ बाजीराव याच्याशी इ.स. 1711 साली झाला. लाडूबाई मग सकलसौभाग्यसंपन्न काशीबाईसाहेब झाल्या. काशीबाईंचे वडील महादजी कृष्ण जोशी हे पेशव्यांचे सावकार होते. काशीबाईंनी आपल्या माहेरच्या चास गावी भीमा नदीला उत्तम घाट बांधून घेतला, सोमेश्वराचे मंदिर बांधले आणि त्या मंदिरात उभारली अत्यंत विलोभनीय आणि देखणी अशी दीपमाळ. पुण्यापासून जेमतेम 50 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव. गावात भीमा नदीच्या काठावर वसलेले सोमेश्वरचे मंदिर आणि त्या मंदिरात उभी असलेली ही दीपमाळ. इथल्या दीपमाळेला 256 हात आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला सोमेश्वरावर रुद्राचा अभिषेक केला जातो आणि तो संपत आला की, इथल्या दीपमाळेच्या प्रत्येक हातावर दिवे लावले जातात. सर्वत्र अंधार आणि मंदिराच्या प्रांगणात तेवत असलेली ही दीपमाळ यामुळे सगळे वातावरण प्रसन्न होते.

उत्सवाच्या प्रसंगी या दीपमाळा अनेक दिव्यांनी उजळून जातात. शांत, सौम्य अशा उजेडाने मंदिराचा सारा परिसर प्रसन्न होतो. मंदिराच्या सौंदर्यात भर घालणाऱया या दीपमाळा कायमच प्रकाशाची वाट दाखवतात. सारा आसमंत उजळून टाकून मनामध्ये अपार भक्ती निर्माण करण्याचे काम या दीपमाळा सदैव करीत आल्या आहेत. अशा अजून निरनिराळ्या वैशिष्टय़ांनी नटलेल्या दीपमाळा पुढील भागात पाहूया.

 [email protected]