
>> आशुतोष बापट
बदामी इथल्या लेणी जगप्रसिद्ध आहेत. लाल रंगाच्या वालुकाश्म जातीच्या खडकात या लेणी खोदल्या आहेत. इथे पूर्वाभिमुख चार लेण्यांचा समूह असून त्यातल्या तीन हिंदू तर एक जैन लेणी आहे.
बदामीचे चालुक्य घराणे हे हिंदू राजघराण्यांपैकी एक. काही अभ्यासकांच्या मते हे कदंब राजांचे मांडलिक राजे होते. नंतर त्यांनी बदामी इथे आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. बदामी ही चालुक्यांची राजधानी. निसर्गाचे सान्निध्य बदामीला लाभलेले आहे. एका बाजूला टेकडी आणि दुसरीकडे असलेल्या दरीच्या जणू काठावर बदामी वसलेली आहे. चालुक्य राजवटीच्या आधीपासून बदामी हे एक नावाजलेले शहर होते.
बदामी इथल्या लेणी जगप्रसिद्ध आहेत. लाल रंगाच्या वालुकाश्म जातीच्या खडकात या लेणी खोदल्या आहेत. इथे पूर्वाभिमुख चार लेण्यांचा समूह असून त्यातल्या तीन हिंदू तर एक जैन लेणी आहे. बदामीच्या हिंदू लेणी या हिंदुस्थानातल्या सर्वात प्राचीन हिंदू लेणी समजल्या जातात. अतिशय आकर्षक, सुबक कोरीव काम असलेल्या या चारही लेणी अप्रतिम आहेत. या लेणींमध्ये असलेली शिल्पे, त्यांचे सौष्ठव आणि त्यांच्या चेहऱयावर दाखवलेल्या भावभावना बघून आपल्याला स्तिमित व्हायला होते. लयन स्थापत्याचा अप्रतिम कलाविष्कार असेच या लेणींना म्हटले पाहिजे. या लेणींमध्ये देवाच्या मूर्तीसुद्धा असल्यामुळे यांना नुसते लेणी न म्हणता लेणीमंदिर असे म्हटले जाते. टेकडीच्या मध्यात खोदलेल्या या चारही लेणींचे स्वरूप किंवा आराखडा सारखाच आहे. पुढे स्तंभयुक्त ओसरी, त्यामागे मोठा सभामंडप आणि आत मधे गर्भगृह जिथे देवतेचे शिल्प वसलेले आहे, असा आराखडा या लेणींचा आहे.
डोंगरात पहिली येते ती अंदाजे इ.स. 550च्या सुमारास खोदली गेलेली शैव लेणी. दारातच उजवीकडे शिवाची अठरा हात असलेली तांडव नृत्य करणारी अशी भव्यदिव्य प्रतिमा पाहायला मिळते. शिवाला एकूण 18 हात दाखवलेले आहेत. बदामी म्हटले की केवळ हीच प्रतिमा डोळ्यासमोर येते इतके या मूर्तीचे आणि बदामीचे अभिन्न नाते जडलेले आहे. इथे शिव कमळावर नृत्य करताना दाखवले असून हातात विविध आयुधे दाखवलेली दिसतात. अतिशय रेखीव, सुबक आणि आकर्षक अशी ही प्रतिमा लालसर दगडात कोरलेली आहे. याशिवाय अजून विविध मूर्ती या लेणीत पाहायला मिळतात. तिथून पुढे गेले की येते वैष्णव लेणी. या लेणीत विष्णूची विविध रूपे खूपच भव्यदिव्य रूपात कोरलेली पाहायला मिळतात. इथले एक शिल्प फारच अफलातून आहे ते म्हणजे इथल्या छतावर कोरलेले चक्र. सोळा आरे असलेल्या या चक्राला जे आरे आहेत ते माशाच्या रूपातले आहेत. थोडक्यात 16 मासे इथे मध्यवर्ती भागात असलेल्या कमळाच्या वर्तुळाकडे तोंड केलेले कोरले आहेत. त्याच्या पुढे येते ती महाविष्णू लेणी. चालुक्य राजा कीर्तिवर्मन दुसरा याच्या राज्यकारभाराच्या 12व्या वर्षाप्रीत्यर्थ इ.स. 578मध्ये त्याचा भाऊ मंगलेश याने ही लेणी खोदून घेतली. या लेणीत मंगलेशाने यासंबंधीचा शिलालेखच कोरून ठेवला आहे. त्यावरून ही एवढी अचूक आणि वैशिष्टय़पूर्ण माहिती आपल्याला समजते. या लेणीत दुर्मिळ अशी एक मूर्ती आहे ती म्हणजे अनंतविष्णूची. शेषाच्या म्हणजेच नागाच्या वेटोळ्यावर ललितासनात विष्णू बसलेले आहेत आणि त्याच नागाने त्यांच्या मस्तकाच्या वर फणा धरलेला आहे. शक्यतो विष्णूच्या शेषशायी म्हणजे शेषावर पहुडलेल्या प्रतिमा अनेक दिसतात. पण अनंत विष्णूच्या मूर्ती तुलनेने फारच कमी दिसतात. नरसिंह, हरिहर यांच्या सुबक मूर्ती इथे बघायला मिळतात.
पुढचे चौथे लेणे आहे जैनांचे. चालुक्य राजे हे सर्व धर्मीयांना राजाश्रय देणारे राजे होते. सर्व धर्मियांचा समान आदर त्यांच्याकडून केला जाई. पुलकेशी पहिला याचा राजकवी रविकीर्ती हा जैन होता. त्यामुळे चालुक्यांनी हे जैन लेणे खोदून घेतले असेल यात नवल काहीच नाही. मुख्य गर्भगृहात भगवान महावीरांची बसलेली मूर्ती स्थापन केलेली दिसते. आतील भिंतींवर तीर्थंकरांच्या विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. याशिवाय बदामीमध्ये असलेले भूतनाथ मंदिर, लकुलीश मंदिर आणि जवळच असलेल्या महाकूट इथली मंदिरे हे बदामीचे वैभव आहे. तसेच बदामीचा किल्ला आणि त्यावर असलेले स्थापत्य अवशेष अवश्य बघावेत असे आहेत. चालुक्यांचा राजा पहिला पुलकेशी याने इ.स. 543मध्ये इथे किल्ला बांधल्याचे सांगतात. चालुक्यांची बदामी सजली आहे या समृद्ध वारशाने. तिचा आस्वाद घेण्यासाठी मुद्दाम वेळ काढून जायला हवे.



























































