पाऊलखुणा – शिल्पकार प्राध्यापिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो. परंतु छंद जोपासणे जीवनातील अनेक अडचणीमुळे खूप कमी जणांना शक्य होते, तर अनेकांना छंद सोडून द्यावा लागतो. प्रा. डॉ. आर्य शोभा परशुराम यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या शिल्पकलेचा छंद जोपासत अनेक शिल्प तयार केलेले आहेत.

कलेचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे. त्यांचे वडील लातूरातील एक नामवंत चित्रकार होते. त्यांचा फोटो स्टुडिओही होता. वडील चित्र काढत असताना केवळ ते पाहण्याचे काम लहानपणी त्यांनी केले. लग्नानंतर 1980-81 मध्ये त्या वेरुळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेलेल्या होत्या. त्याचप्रमाणे हैदराबाद येथील सालरगंज म्युझियममधील शिल्पकलेने त्यांना भुरळ घातली. 1982 मध्ये पीएच.डी. करत असताना त्यांनी दत्ताची मूर्ती तयार केलेली होती. त्यानंतर 1987 मध्ये त्यांनी एक शिल्प पीओपीमध्ये तयार केले ते वडिलांनी काढलेल्या चित्राचे. दीड फुटांचे मायकल एंजेलचे शिल्प त्यांनी तयार केलेले. त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे साहित्यही उपलब्ध नव्हते. त्यानंतर त्यांनी एक श्रीकृष्णाचे शिल्प तयार केले.

2016 मध्ये त्या प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या. वडिलांच्या चित्रकलेचा छंद त्यांना खुणावत होता. त्यामुळे घरी आलेल्या खताच्या पोत्यावर त्यांनी एक काल्पनिक चित्र तयार केले. त्यानंतर त्यांची भेट झाली ती प्रतिभा घारे यांच्याशी आणि त्यांच्यामुळे ड्रॉइंग स्केल पाहण्याचा योग त्यांना आला. त्यापासून मिळालेली प्रेरणा घेऊन त्यांनी काही चित्रे रेखाटली. त्यानंतर पुणे येथील चित्रप्रदर्शनात त्यांनी आपली चित्रे ठेवली. ती सर्वांना भावलेली. परंतु चित्रे कोणी विकत घेतली नाहीत. पुणे चित्रप्रदर्शनामध्ये त्यांना चित्रकलेपेक्षा शिल्पकलेत काम करण्याचा सल्ला देण्यात आला.

शिल्पकलेसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक्स टूल त्यांच्या मुलाने तयार करून दिले आणि काही टूल्स ऑनलाईन मागवून घेतले. राजस्थानमधून एक लाख रुपयांचे मार्बल्स व लाल रंगाचे दगड त्यांनी विकत आणले आणि शिल्पकलेस सुरुवात केली. कटर, ग्राइंडर चालवण्यास मुलाने शिकवले आणि त्यांची शिल्पकला जोरात सुरू झाली. शिल्पकलेचे विशेष असे प्रशिक्षणही त्यांनी कुठे जाऊन घेतलेले नाही हे विशेष होय.

आपल्या कलेविषयी प्रा. डॉ. आर्य शोभा परशुराम म्हणतात, काल्पनिक शिल्प तयार करत असताना हे शिल्प मी तयार करतच नाही, तर माझ्याकडून अज्ञात शक्तीच करून घेत आहे असे सतत जाणवते आणि शिल्प तयार होते. पुणे येथे काही शिल्प त्यांनी प्रदर्शनातही ठेवलेली होती. सर्वांनी त्यांच्या कलेचे गुणगाण केले, परंतु शिल्प मात्र कोणतेच विकले गेले नाही अशी खंतही त्यांना वाटली. परंतु आपण व्यवसाय म्हणून हे करतच नाही, आपला छंद म्हणून ते करतोय. म्हणून मनाचे सांत्वन करून हा छंद त्यांनी कायम ठेवलेला आहे.

चित्रकलेत तुम्हाला चुकले तर दुरुस्त करण्याची संधी असते, परंतु शिल्पकलेत ही संधी मिळत नाही. देशातील अतिशय प्रगत शिल्पकला केवळ राजाश्रय होता म्हणूनच टिकलेली होती. कारण त्या कलाकारांनी कुठल्या शाळेत शिक्षण घेतलेले नव्हते, परंतु त्यांना राजाश्रय होता. शिल्पकलेस राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तरच ही कला लोप पावणार नाही. त्याचप्रमाणे कलेचे किमान कौतुक तरी करण्यात आले तरच कलाकारास आपली कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे त्या म्हणतात. ज्याप्रमाणे कलादालनाची निर्मिती काही ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे शिल्पदालन उभारण्यात आले आणि त्या ठिकाणी शिल्प जतन करून ठेवले तर हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी मागर्दशक राहील व तो जतनही होईल.

– [email protected]