अमेरिकेत सोळावं वरीस युद्धाचं

57

>> अभय मोकाशी

अमेरिकेच्या हवाई दलात आणि नौदलात अपेक्षेप्रमाणे भरती होत असली तरी सैन्यात (भूदलात) मात्र पुरेशी भरती होत नाही. गेल्या आर्थिक वर्षात अमेरिकेच्या सैन्यात 6500 सैनिक आवश्यकतेपेक्षा कमी भरती झाले. ही तूट भरून काढण्यासाठी सैन्यभरतीची वयोमर्यादा कमी करून 16 वर्षांवर आणावी असे अमेरिकेतील काही सुरक्षा मुत्सद्यांना वाटते आहे. या प्रस्तावाला तेथे मोठा विरोध होत आहे.

युद्ध आणि शस्त्रास्त्रांची निर्यात करणे हा अमेरिकेचा जणू व्यवसाय झाला आहे. युद्धामुळे काही प्रमाणात अमेरिकेत नोकऱया निर्माण होतात, पण त्याचा सर्वात जास्त फायदा देशातील काही अतिश्रीमंत माणसांना होतो असे दिसून येते. दुसऱया महायुद्धापासून अमेरिकेच्या मोठय़ा उद्योगपतींना आणि श्रीमंतांना युद्धाचा फायदा झाला आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक स्टुअर्ट ब्राण्डेस यांनी आपले पुस्तक ‘वॉरहॉग्सः ए हिस्ट्री ऑफ वॉर प्रॉफिटस् इन अमेरिका’ यात म्हटले आहे की, 1942 ते 1945 या काळात 2000 अमेरिकी कंपन्यांचा नफा 1936 ते 1939 या काळातील नफ्याच्या तुलनेत 40 टक्यांनी वाढला होता. यामागचे कारण म्हणजे, अमेरिकेच्या सरकारने अब्जावधी डॉलर्सची युद्धसामग्रीची खरेदी केली, किमतींवर नियंत्रण ठेवले नाही आणि नफ्यावर अतिअल्प कर लावले.

सोव्हियत युनियन संपुष्टात आल्यावर शीतयुद्ध संपले आणि अमेरिकेला नवीन शत्रू शोधणे गरजेचे होते. अशातच अमेरिकेने सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वात असलेल्या इराकवर हल्ला चढविला, पण त्या पहिल्या खाडीयुद्धात सद्दाम हुसेन यांचे राज्य चालू दिले, कारण अमेरिकेला आपला युद्ध उद्योग चालू ठेवण्यासाठी एक शत्रू हवा होता. अमेरिका सातत्याने जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी आपले सैन्य पाठवीत असते आणि म्हणून जास्त सैनिकांची गरज त्या देशाला असते. अमेरिकेच्या हवाई दलात आणि नौदलात अपेक्षेप्रमाणे भरती होत असली तरी सैन्यात (भूदलात) मात्र पुरेशी भरती होत नाही. गेल्या आर्थिक वर्षात अमेरिकेच्या सैन्यात 6500 सैनिक आवश्यकतेपेक्षा कमी भरती झाले. अंतर्गत सुरक्षेची गरज आणि मध्यपूर्व देशांत, अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये सैन्य तैनात करण्याचे आश्वासन अमेरिकेकडून देण्यात आले आहे. यासाठी अमेरिकेला सैन्यभरतीची आवश्यकता वाटते. त्यामुळे युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याकडून अनेक आर्थिक आमिषे देऊ केली जात आहेत, तरीसुद्धा कमी युवक सैन्याकडे आकर्षित होत आहेत आणि त्यामुळे सैनिकांची तूट कायम राहिली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सैन्यभरतीची वयोमर्यादा कमी करून 16 वर्षांवर आणावी असे अमेरिकेतील काही सुरक्षा मुत्सद्यांना वाटते आहे. साहजिकच अशा प्रस्तावाला अनेकांकडून विरोध व्यक्त करण्यात येत आहे.

महिलांच्या आणि मुलांच्या हक्कांसाठी लढणाऱया ग्रास माचेल यांचे एक महत्त्वपूर्ण वाक्य या अहवालात वापरण्यात आले आहे. त्या म्हणतात, “मुलांवर प्राणघातक हल्ला केला जातो, त्यांचे उल्लंघन केले जाते, खून केले जातात आणि तरीही आपली सदसद्विवेकबुद्धी बंड करत नाही किंवा आपल्या सन्मानाच्या भावनेला आव्हान दिले जात नाही. हे आपल्या सभ्यतेचे मूलभूत संकट दर्शवते.’’ ब्रिटनमध्येदेखील 16 वर्षांच्या मुलांना लष्करात घेतले जाते. याविरुद्ध अनेकांनी आवाज उठविला आहे. गुड्डी सिंह आणि रीम अबू-हय्येह यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित लेखात पौगंडावस्थेतील मुलांना लष्करात भरती केलेल्यांवर मानसिक आजार कसे होतात याची दिलेली माहिती भयानक आहे. त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, पौगंडावस्थेत लष्करात गेलेल्या मुलांमध्ये इतर समवयीन मुलांपेक्षा मद्यपानाच्या अधीन जाणे, स्वतःला इजा करून घेणे आणि आत्महत्या करणे याचेप्रमाणे अधिक आहे. आपल्या या लेखात या दोन संशोधकांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लष्करात भरतीवर बंदीची मागणी केली आहे. युरोपियन युनियनमध्ये ब्रिटन एकमेव देश आहे, ज्यात 18 वर्षांखालील मुलांना लष्करात भरती केले जाते. ब्रिटनमधील लष्कर भरतीच्या नियमानुसार मुलांचे वय 15 वर्षे सात महिने झाले की ते लष्कर भरतीसाठी अर्ज करू शकतात म्हणजे वयाची 16 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर ते लष्करात भरती होऊ शकतात.

18 वर्षांची वयोमर्यादा
जगातील 46 देशांत 18 वर्षांखालील मुलांचा वापर सशस्त्र संघर्षात केला जातो असा दावा ‘चाइल्ड सोल्जर वर्ल्ड इंडेक्स’ या संस्थेने केला आहे. या यादीत हिंदुस्थानचा समावेशदेखील आहे. याचा अर्थ असा होत नाही की, या देशांच्या सैन्यात 18 वर्षांखालील मुलांना भरती केले जाते असे नाही, अतिरेकी संघटना अशा मुलांचा वापर करतात. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेपुढे सचिवांच्या अहवालात अफगाणिस्तान, मध्य आफ्रिकन गणराज्य, सोमालिया, दक्षिण सुदान, येमेन, सुदान हे काही देशा आहेत, ज्यात 18 वर्षांखालील मुलांना सशस्त्र संघर्षात वापरले जाते.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या