
>> अभय मोकाशी
सध्याच्या युगात व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर नीति-अनीति, प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टी ‘जुन्या जमान्या’च्या म्हटल्या जातात. उद्योग – व्यवसाय स्वार्थ, आर्थिक गैरव्यवहार, नफेखोरी, लाचखोरी अशा दुर्गुणांनी बरबटलेला दिसून येतो. अनैतिक आर्थिक व्यवहार आणि नफेखोरी हेच आपल्या देशातील उद्योग जगताचे सर्वसाधारण स्वरूप झाले आहे. सर्वच उद्योगपती आणि उद्योग या रांगेत बसणारे नाहीत. काही मोजके हिंदुस्थानी उद्योगपती आणि औद्योगिक घराणी यांच्याबद्दल जनसामान्यांत एक आदराची भावना दिसून येते. ‘टाटा’ उद्योगसमूह आणि टाटा फॅमिली हे अशाच घराण्यांपैकी एक.
हिंदुस्थानातील उद्योग जगताबद्दल विजय मल्ल्या, नीरव मोदी आदी प्रकरणांमुळे वाईट प्रतिमा निर्माण झाली आहे. देशातील अनेक उद्योगपतींबद्दल जनमानसात एक नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. वास्तविक देशाच्या प्रगतीत आणि औद्योगिकीकरणात उद्योगपतींचे योगदान मोठे असते. रोजगार निर्मिती, देशाचे अर्थकारण आणि औद्योगिक प्रगती यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे. तरीही सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर कमी आणि अविश्वास जास्त दिसून येतो. अलिकडेच टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी एका ठिकाणी बोलताना टाटा समूहाची चांगली प्रतिमा का निर्माण झाली याची मिमांसा केली. ते म्हणाले, गैरव्यवस्थापन आणि अनैतिक पद्धतीने काम करणे या दोन्ही गोष्टी टाळल्यामुळेच टाटा उद्योगसमूहाची आज जी प्रगती झाली आहे ती होऊ शकली. त्यामुळेच आज आपल्या समूहाची उलाढाल १०० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्राr यांनी टाटा समूहात योग्य व्यवस्थापन नसून त्यात टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि विश्वस्त एन. सुनावाला यांचा टाटा सन्सच्या संचालक मंडळात अयोग्य हस्तक्षेप होतो असा आरोप केला होता आणि त्याला अनुसरून मिस्त्राr यांनी नॅशनल कंपनी लॉ बोर्ड ट्रायब्युनलपुढे याचिका दाखल केली होती. मिस्त्राr यांना २४ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले होते. दुखावलेल्या मिस्त्राr यांनी दुसऱयाच दिवशी टाटा सन्सच्या संचालक मंडळावर हल्ला चढविला. रतन टाटा आणि टाटा ट्रस्टचा टाटा सन्समध्ये अयोग्य हस्तक्षेप असल्याचा आरोप केला तसेच त्या कंपनीचे व्यवस्थापन नीट चालविले जात नसल्याचा दावादेखील केला.
यासंदर्भात न्याय मागण्यासाठी दोनच महिन्यांत त्यांनी नॅशनल कंपनी लॉ बोर्ड ट्रायब्युनलकडे धाव घेतली. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १९ डिसेंबर २०१६ रोजी मिस्त्राr यांनी टाटा समूहातील सर्व कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला.
९ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आपल्या निकालात ट्रायब्युनलचे सदस्य बी. एस. व्ही. प्रकाश कुमार आणि व्ही. नल्लसेनापती यांच्या खंडपीठाने मिस्त्राr यांचे सर्व आरोप फेटाळले.
मिस्त्राr उघडपणे टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या विरोधात जात होते. म्हणून त्यांना काढून टाकण्याचा अधिकार संचालक मंडळाला असल्याचे या खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी टाटा समूहात चांगले आणि नीतिमत्तेला धरून व्यवस्थापन चालविले जात असल्याचे म्हटले आहे. टाटा कुटुंबातील आणि टाटा समूहाचे पितामह जे.आर.डी. टाटा यांच्या ११४व्या जयंतीनिमित्त रतन टाटा यांचे भाषण टाटा समूहाच्या नूतनीकरण झालेल्या बॉम्बे हाऊस या इमारतीत २९ जुलै रोजी झाले.
मिस्त्राr यांच्या आरोपांनी दुखावलेल्या रतन टाटा यांनी मिस्त्राr यांचे नाव न घेता टाटा समूहातील आपल्या सहकाऱयांना सांगितले की, टाटा यांनी स्थापन केलेली देशातील पहिली कापड गिरणी, मुंबईला वीज पुरविण्यासाठी वीज निर्मिती करणारी कंपनी, मिठाचे उत्पादन, पोलाद कारखाना अथवा पंचतारांकित हॉटेल या सर्वांची सुरुवात नफ्यासाठी केलेली नसून देशातील तत्कालीन नेतृत्वाची आणि देशाची गरज लक्षात घेऊन करण्यात आली होती.
आजही टाटा समूहापुढे आव्हान आहे की, देशाची गरज लक्षात घेऊन उद्योग सुरू करावेत, ज्यात नफा असेल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दूरदृष्टी असावी असे मत त्यांनी मांडले. हे विचार टाटा समूहाच्या १५० वर्षांच्या इतिहासात वेळोवेळी दिसून आले आहे.
अनेक वर्षे टाटा समूहाचे नेतृत्व केलेल्या जे.आर.डी. टाटा यांनी मांडलेले विचार टाटा समूहाबद्दल अनेक पुस्तके लिहिलेल्या रुस्सी लाला यांनी आपल्या ‘दी क्रिएशन ऑफ वेल्थः द टाटाज फ्रॉम द नाईन्टीन्थ टू द ट्वेन्टीएथ सेंच्युरी’ या पुस्तकात दिले आहेत. जे.आर.डी. टाटा यांचे त्या पुस्तकात दिलेले वक्तव्य असे आहे, ‘‘एका विशिष्ट पद्धतीने कार्य करण्यात आमचा विश्वास आहे. मला कल्पना आहे की, इतर काही औद्योगिक समूह ज्या प्रकारे कामं करतात त्याप्रमाणे जर आम्ही पण केले असते तर आज आम्ही दुप्पट क्षमतेचे असतो. तसे पाहता आम्ही १०० टक्के वाढीचा त्याग केला आहे, पण मी अन्य कोणताही मार्ग स्वीकारला नसता.’’
टाटा समूहाची आचारसंहिता प्रत्येक कर्मचाऱयाला पाळावी लागते. आपल्या देशात फार कमी औद्योगिक समूहांत कर्मचाऱयांसाठी नैतिकतेवर आधारित आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.
व्यवसायातून जनतेकडून मिळालेला पैसा पुन्हा समाजासाठी वापरावा हे टाटा परिवाराचे मूळ तत्त्व आहे. असा पैसा टाटा यांच्या विविध धर्मादायी संस्थांमार्फत सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. कर भरल्यानंतरच्या नफ्यातील जवळपास २५ टक्के पैसा समाजातील चांगल्या कामांसाठी होतो.
टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी नुस्सेरवानजी टाटा यांनी ब्रिटिशांची हिंदुस्थानातील कापड गिरण्यांवरील मक्तेदारी कमी करण्यासाठी देशात कापड गिरणी उभारण्याचे ठरविले. युरोपमधील औद्योगिक क्रांती पाहता आपल्या देशात पोलादाची गरज लागणार हे लक्षात घेऊन त्यांनी पोलाद कारखाना उभारण्याचे ठरविले, त्याचबरोबर विज्ञानाच्या शिक्षणासाठी उत्तम संस्था असावी हे स्वप्न मनात ठेवून त्यांनी बंगळुरू येथील इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची स्थापना केली.
पोलाद कारखाना आणि इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स सुरू होण्याआधीच जमशेदजी टाटा यांचे निधन झाले. मात्र त्यांनी आपल्या स्वप्नातील प्रत्येक संस्थेबद्दल बारकाईने आराखडा आपल्या मुलाला लिहून दिला होता.
आपल्या पोलाद कारखान्यातील कामगारांची व्यवस्था कशी असावी हे त्यांनी पुत्र दोराब यांना १९०२ साली एका पत्राद्वारे कळविले होते. हे पत्र लिहिल्यानंतर पाच वर्षांनी पोलाद कारखान्यासाठी जमीन घेण्यात आली. त्या पत्रात लिहिले होते, ‘‘रस्ते रुंद असतील आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला छाया देणारी भरपूर झाडे असतील याची खात्री करा. हेही बघ की, पुरेसे बागबगिचे आहेत. फुटबॉल आणि हॉकीसारख्या खेळांसाठी पुरेशी जागा ठेव. हिंदूंसाठी देऊळ, मुसलमानांसाठी मशिदी आणि ख्रिश्चनांसाठी चर्च यासाठी जागा आरक्षित करावी.’’ इतकी योजना केल्यानंतर त्या शहराचे नाव जमशेदपूर झाले नसते तरच आश्चर्य वाटले असते. हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये शिकता यावे यासाठी त्यांनी १८९२ साली शिष्यवृत्तीची स्थापना केली आणि १९२४ पर्यंत अशी स्थिती निर्माण झाली की, तत्कालीन हिंदुस्थानी नागरी सेवेतील दर पाच अधिकाऱयांपैकी दोन टाटांकडून शिष्यवृत्ती मिळालेले होते.
नैतिकतेवर चालल्यामुळे टाटा समूह १९३९ सालापासून विविध सर्वेक्षणांत प्रथम स्थानावर राहिला आहे. आजही हा औद्योगिक समूह व्यवसाय करण्यासाठी सर्वात विश्वासार्ह आहे असे विविध पाहण्यांतून समोर येते.
टाटा समूहाचे अनुकरण देशातील इतर मोठय़ा उद्योग समूहांनीही केले तर त्याचा लाभ देशाला आणि समाजाला नक्कीच होईल.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)





























































