शाश्वत उर्जा – सौरऊर्जा

315

>> अभय यावलकर

ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, मात्र एका ऊर्जेचे रूपांतर दुसऱया ऊर्जेत करता येते. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम सत्य परिस्थितीचे वास्तव दर्शवतो. इंधनामुळेच आज संपूर्ण जगाला गती प्राप्त झालेली आहे. पारंपरिक इंधनाचे साठे संपुष्टात येऊ लागले आहेत. त्याच्या मर्यादा आणि उपलब्धता याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला होणे आवश्यक आहे.

अक्षय ऊर्जा दिन म्हणून 20 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात येतो. सन 2001-02 साली सर्वप्रथम वीज भारनियमन सुरू झाले महाराष्ट्राला. या भारनियमनाने मोठा धक्का पोहचला होता. सर्वात प्रथम ग्रामीण भागाला याची झळ पोहचली होती. हळूहळू हे भारनियमन 14 ते 16 तासांवर पोहचले आणि दोन-तीन वर्षांत ते शहरांपर्यंत आले. 1600 मेगावॅटपासून झालेली सुरुवात 4500–5000 मेगावॅटपर्यंत पोहचले. एकूणच विकासकामांनाच नव्हे तर अनेक लघुउद्योगांना या भारनियमनाने खीळ बसली आणि उद्योग डबघाईस आले. हा इतिहास सर्वांनाच मारक ठरला आणि आजही ठरत आहे. एकूणच कोणत्याही पारंपरिक इंधनाच्या मर्यादा आहेत. हे नैसर्गिक स्रोत संपुष्टात येणार ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. यासाठीच सन 2004 सालापासून 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. लाकूड, कोळसा, वीज, पेट्रोल, डिझेल, गॅस या सर्व पारंपरिक इंधनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थातच हे सर्व नैसर्गिक स्रोत 2040 सालापर्यंत संपुष्टात येतील तर यातील गैस, पेट्रोल-डिझेल 2025 सालापर्यंत संपुष्टात येतील असा तज्ञांचा अंदाज आहे. म्हणूनच याविषयीची जाणीव सर्व जनसामान्यांमध्ये व्हायला हवी यासाठीच अक्षय ऊर्जा दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभर अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्कारक्षम वयोगटावर अर्थात विद्यार्थ्यांवर या जाणिवेचा परिणाम अधिक लवकर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांमधून ऊर्जा बचतीचे अनेक चित्र रेखाटले जातात तर वीज बिल, रेल्वेची तिकिटे, पोस्टर्स आदींमधून इंधन बचतीचे संदेश जनतेपर्यंत पोहचवले जातात.

आजची वीज बचत म्हणजेच उद्याचा विकास आहे. यासाठीच सरकारी पातळीवर प्रथम सीएफएल दिव्यांचा तर आज एलईडी दिव्यांचा प्रसार केला जात आहे. शासनाने एलईडी दिवे मोठय़ा संख्येने जनतेपर्यंत पोहचवले. या दिव्यांसाठी अनुदान देऊन मोठय़ा संख्येने हे दिवे ग्रामीण भागापर्यंत पोहचवले. यामुळे खऱया अर्थाने वीज बचतीला सुरुवात झाल्याचे दिसून आले. या बचतीतून महाराष्ट्रातील भारनियमन कमी होण्यास मदत झाल्याचे दिसून येते. अर्थात आपल्याला सातत्याने विजेचे उत्पादन वाढवत राहणे गरजेचे आहे. म्हणजेच विकसनशील हिंदुस्थानला विकसित व्हायला वेळ लागणार नाही हे निश्चित. देशाच्या विकासाची सुरुवात प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक कुटुंबापासून होते. जर घराघरांतून आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीला किती ऊर्जा लागलेली आहे याचे मोजमापन केले गेले तर खरोखरच होणारा अपव्यय थांबवता येणे शक्य आहे. कारण घरातील कागद असो अथवा कापड, धान्य असो की इतर पदार्थ, संगणक असो अथवा मोबाईल या सर्वांनाच तयार करताना प्रचंड इंधनाची आवश्यकता भासत असते. आपण ही सर्व साधने वापरतो म्हणूनच एकीकडे आपले राहणीमान उंचावत असते हे विसरून चालणार नाही. यासाठी कागदाचे एकमेव उदाहरण पुरेसे ठरेल. अडीच टन बांबूपासून फक्त एक टन कागद तयार होतो. या बांबूची योग्य वाढ होण्यासाठी किमान तीन वर्षे पाणी, उत्तम सूर्यप्रकाश हे आवश्यक आहेच. अर्थात सूर्य बांबूच्या वाढीसाठी देत असलेल्या सूर्य प्रकाशाची किंमत मागत नाही म्हणून आज सर्वत्र वापरला जाणारा ए 4 आकाराचा कागद एक रुपयाऐवजी 8 ते 10 रुपयांत मिळाला असता. हा कागद तयार होताना 25 हजार लिटर पाणी, हे पाणी गरम करण्यासाठी कोळसा, वीज आदी गोष्टींचा वापर केला जातो. जर वीज किंवा कोळसा किंवा पाणीच नसते तर कागद तयार करताना अजून किती अडचणींना सामोरे जावे लागले असते याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
2040 साली कोळशाचे साठे संपुष्टात येतील असा उल्लेख केलेला आहे. किंबहुना आपण सौरऊर्जेचा वापर वाढवला नाही तर हे साठे त्याअगोदरच संपतील याचाही प्रत्यय आता येऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात परळी वैजनाथमधील वीजनिर्मिती केंद्रातील काही जनित्र कोळशाअभावी बंद पडले होते आणि त्यासाठी आफ्रिकेमधून कोळसा आयात करण्याची गरज आपल्याला भासली होती. आता ही नेहमीचीच बाब होऊन बसली आहे आणि त्यामुळे आज अनेक खासगी उद्योग हे बाहेरून कोळसा आयात करत असल्याचे दिसून येत आहे.

यासाठीच आपल्या देशाला मिळालेली विपूल सौरऊर्जा वापरणे आपल्या सर्वांसाठीच हिताचे आहे. ही ऊर्जा आपल्याला निश्चित शाश्वततेकडे घेऊन जाईल. 365 दिवसांपैकी 325 दिवस उत्तम सूर्यप्रकाश देणारा आपला हिंदुस्थान देश. नुसता सूर्यप्रकाश किंवा उष्णता एवढेच नव्हे तर उत्तम कार्यक्षमता मिळवून देणारा आपला देश आहे. यामुळेच सौरऊर्जेचा वापर आपल्या देशातील प्रत्येक घराघरांत व्हायला हवा ही काळाची गरज आहे. सौरऊर्जेविषयी असलेल्या गैरसमजुती निश्चित दूर करता येतात तसेच वाजवी किमतीत ही साधने उपलब्ध करून देता येतात असा गेल्या 20 वर्षांचा माझा अनुभव आहे. ही यंत्रणा चालेल का? रात्री कसे चालणार? वाजवी दरात ही यंत्रणा कशी मिळेल? शेतातील पंप कसे चालवता येतील? भाजीपाला वाळवून साठवण कशी करता येईल असे अनेक प्रश्न जनतेसमोर असतात याची जाणीव ठेवून सौरऊर्जेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा निर्णय गेल्या 20 वर्षांपूर्वीच घेतल्याने आज हजारो कुटुंबे सौरऊर्जेचा वापर करताना दिसत आहेत.

वाट न पाहणे ठरेल हिताचे
सरकार अनुदान देईल तर आम्ही करू, ही मानसिकता मागे ठेवून प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. आज सर्वत्र समृद्धी येत आहे. या समृद्धीचा वापर आपण आपल्यासाठी केला तर आपण अजून समृद्ध होऊ असा आत्मविश्वास मला वाटतो. ज्या सधन व्यक्तींना सौरऊर्जेचा वापर करणे शक्य आहे अशा कुटुंबांनी तर हे करणे गरजेचे आहेच. तो शहरातील असो वा ग्रामीण भागातील, कारण या गरजा सगळय़ांच्याच आहेत. आपण दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेताना कधीही अनुदान मागत नाही. उलट छान दिसण्यासाठी अजून खर्च करतो. त्यातून मात्र परतावा फारसा नसतोच, कदाचित समाजातील प्रतिष्ठsचा तो प्रश्न असावा असे वाटते. परंतु आता वाहन म्हणजे प्रतिष्ठा नसणार असून पुढील काळात माझं घर अंधारात नाही, माझे सर्व व्यवहार माझ्या घरी तयार होणाऱया विजेवर चालतात ही प्रतिष्ठा असेल असे हा लेख लिहिताना मला वाटत आहे. कारण कोळशाच्या साठय़ांप्रमाणेच पेट्रोल, डिझेल, गॅस यांचेही साठे पुढील 7-8 वर्षांत संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच मला माझे वाहनही बदलणे गरजेचे ठरणार ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. काळाच्या ओघात सौरऊर्जेवर चालणारी वाहने, बॅटरीवर म्हणजेच चार्ज करून चालणारी वाहने पुढील 5-7 वर्षांत जास्तीत जास्त प्रचलित होतील आणि पेट्रोल पंपाची जागा सौरचार्ंजग पपं घेतील असा आत्मविश्वास वाटतो.

आजमितीला मिळणारी औष्णिक अथवा जलविद्युत महाग असून सौर वीज स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. जसे मोबाईलची संख्या जसजशी वाढत गेली तसतसा मोबाईल कॉलचा खर्च आणि हॅण्डसेटचा खर्च कमी होत गेला आणि तो सर्वांना परवडू लागला असेच अर्थकारण सौरऊर्जेचे होईल आणि म्हणूनच आपण सर्वांनीच अक्षय दिनाच्या दिवशी मुबलक, स्वच्छ आणि शाश्वत सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून देश विकसित करण्याला हातभार लावण्याचा निश्चय करूया.

(लेखक सौरऊर्जा अभ्यासक आणि संशोधक आहेत.)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या