न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण!

>> अभिपर्णा भोसले

‘बिग डेटा’सारखी साधने कायदेशीर कामकाज सुलभ करू शकत असली तरी ती न्यायालयीन कर्मचाऱयांची, वकिलांची आणि न्यायाधीशांची जागा घेऊ शकत नाहीत. तांत्रिक साधनांचे स्वतःचे कोणतेही आंतरिक मूल्य नसते. त्यांद्वारे मिळणारी माहिती तेव्हाच उपयुक्त ठरते जेव्हा संबंधित माहितीचे व्यक्तीनिष्ठ पद्धतीने विश्लेषण केले जाऊ शकते. व्हर्च्युअल न्यायालयीन सुनावणी, रजिस्ट्रीमधील केसेसची वेगवान आणि अचूक नोंद तसेच अल्पानुभवी ते ज्येष्ठ अशा सर्व वकिलांचे आणि एकंदरीत न्यायव्यवस्थेचे हितसंबंध जोपासणारे तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे.

कोरोना हा जीवघेणा आजार असला आणि नवीन म्युटेशन्स वेगाने होत असल्याने त्याचा संसर्ग तसेच रूपही भीतीदायक झाले आहे. तथापि त्यामुळे कायद्याची प्रक्रिया थांबवता येत नाही. त्या त्या प्रसंगानुसार न्यायव्यवस्था कार्यपद्धती विकसित करते आणि कार्यप्रणाली नियमित करते; परंतु न्यायदानाची प्रक्रिया थांबवत नाही, हे लोकशाही देशांतील न्यायव्यवस्थेचे वैशिष्टय़ आहे. या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही न्यायालयीन व्यवस्था व्हिडीओ कॉन्फरन्सिंगकडे वळली आहे. त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालयाचे कोरोनाकाळातील संपूर्ण कामकाज हे ऑनलाइन फायलिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले आहे. कायदेशीर कामकाज आणि न्यायालयीन सुनावण्या आभासी पद्धतीनेही होऊ शकतात ही शक्यता कोरोनापूर्व काळात अवास्तव वाटली असती. कोरोनासारख्या दुर्दैवी कारणामुळे का होईना, पण हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेसाठी हे दशक एक परिवर्तनीय पर्व असेल. हिंदुस्थानच्या एकल न्यायव्यवस्थेचे अधिकाधिक तांत्रिक एकत्रीकरण ही या बदलाची अंतिम परिणती असेल.

गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स समिती न्यायालयीन प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत कशी घेता येईल यावर संशोधन करत आहे. गेल्या महिन्यात न्यायालयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे पोर्टल (सुपेस) सुरू करण्यात आले आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेच्या तांत्रिकीकरणाचा प्रयोग यशस्वी ठरला. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये स्वदेशी अभियांत्रिकीकरणातून ‘सुव्हास’ हे भाषांतर साधन सर्वोच्च न्यायालयाने सुरू केले होते. एकविसाव्या शतकातील डिजिटल साधनांची अपरिहार्यता पाहता भविष्यकाळातील न्यायव्यवस्थेला ‘बिग डेटा’शिवाय पर्याय नाही.

बिग डेटा, सुपेस आणि सुव्हास
‘बिग डेटा’ ही संकल्पना ढोबळमानाने भव्य माहितीचे संकलन असा अर्थ सूचित करते. डिजिटलायझेशन करण्यासाठी सक्षम असलेल्या प्रत्येक क्षेत्रामधून मोठा डेटा संकलित केला जाऊ शकतो. यात मार्केट्स, व्यवसाय, शैक्षणिक संस्था ते शासकीय कामकाज आणि आता न्यायालयीन व्यवस्थेचाही समावेश होतो. या संस्थांमध्ये प्रसरण पावलेला हा ‘डेटा फ्लड’ (माहितीचा महापूर) वर्गीकृत केला जातो आणि या संग्रहाचा परीक्षण आणि विश्लेषणासाठी वापर केला जातो. हा माहिती संग्रह आर्थिक मालमत्तेइतकाच मौल्यवान असतो. हिंदुस्थानी न्यायप्रणाली स्थापनेपासूनच ग्रंथ आणि कागदपत्रांवर अवलंबून आहे. हिंदुस्थानी न्यायालयांत दरवर्षी हजारो खटले दाखल होतात आणि ही संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे. प्रत्येक प्रकरणात कार्यक्षेत्र, पूर्वसूचना, कायद्याचे स्पष्टीकरण, साक्षीदारांची विधाने, कोर्टाच्या नोंदी, निर्णय इत्यादींची माहिती ठेवणे आवश्यक असते. न्यायालयाच्या ऑनलाइन स्वरूपामध्ये सुनावणीसाठी आवश्यक असणाऱया या कागदपत्रांचे अपरिहार्य डिजिटलायझेशन करण्यासाठी आधीपासूनच संग्रहित माहिती जतन करता यावी म्हणून ‘सुव्हास’ची निर्मिती करण्यात आली होती. आता ‘सुपेस’ सारख्या नव्या साधनांमुळे सर्वोच्च न्यायालयाने मोठय़ा प्रमाणात डेटा संकलित करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची आपली क्षमता वाढवली आहे. भविष्यात ही साधने न्यायालयीन प्रक्रियेत परीक्षण, विश्लेषण आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरतील. ज्यांचे कामकाज सुरू आहे अशा केसेसचे व्यवस्थापन तसेच तयारीमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

नुकतेच निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे हिंदुस्थानी न्याय प्रणालीत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अंतर्भूत करण्याच्या चळवळीचे जनक मानले जातात. तांत्रिकीकरणाचे संस्थापक म्हणून त्यांनी आपली संकल्पना स्पष्ट करताना एक उदाहरण दिले. एखाद्या केसमध्ये आरोपीचा रक्तगट पीडितेचा रक्तगटाशी जुळत आहे की नाही हे न्यायाधीशांना माहीत असणे आवश्यक असेल तर त्याची कागदोपत्री खातरजमा निश्चितपणे होऊ शकेल, परंतु ती वेळखाऊ स्वरूपाची असेल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हीच माहिती काही सेकंदांमध्ये देऊ शकेल आणि त्याशिवाय अशा स्वरूपाच्या केसेसमध्ये केले गेलेले वाद-प्रतिवाद आणि न्यायालयांनी नोंदवलेली निरीक्षणेही सादर करू शकेल. याशिवाय न्यायाधीशांनी त्या केसमध्ये ज्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत त्यातील एखादी बाब राहून गेल्यास किंवा वकिलांकडून त्या प्रकरणातील एखादी वस्तुस्थिती नमूद करण्याचे राहून गेल्यास संबंधित डेटा सूचित करेल आणि सर्व आवश्यक निरीक्षणे नमूद झाल्यानंतरच न्यायालय निर्णय देईल. अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किती वारंवारतेने वापरला जाईल आणि तांत्रिक संज्ञा वापरण्यासाठी न्यायप्रणालीस कसे प्रशिक्षित केले जाईल यावर त्याची कार्यक्षमता अवलंबून असेल. न्यायालयाच्या रजिस्टरमधील दैनंदिन नोंदी या अधिक वेगाने तसेच अचूकतेने केल्या जातील आणि मानवी चुकांची शक्यता उरणार नाही. यामुळे रजिस्ट्रीमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांवरील ताण कमी होईल तसेच त्यांचा वेळही वाचेल.

हिंदुस्थानी न्याय प्रणाली आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान यांच्या संगमाची ‘सुव्हास’ आणि ‘सुपेस’ पहिली पिढी आहेत. ‘सुपेस’ एखाद्या फाईलमधून तारीख, वेळ, घटनेची जागा अशी वस्तुस्थितीपर सत्यता पडताळू शकते. त्यामुळे केसशी संबंधित प्रश्नोत्तरांमध्ये मदत होऊ शकते. कोणत्याही वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरमध्ये जी माहिती विखुरलेल्या स्वरूपात आढळते ती ‘सुपेस’मध्ये वर्गीकृत स्वरूपात संकलित केली जाते आणि वापरकर्ता ही माहिती सहजगत्या मिळवू शकतो. ‘सुव्हास’ निकाल आणि इतर कायदेशीर कागदपत्रांचे इंग्रजीमधून नऊ स्थानिक भाषांमध्ये आणि नऊ स्थानिक भाषांमधून इंग्रजीमध्ये भाषांतर करु शकते. हिंदुस्थानातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज इंग्रजीतून होत असले तरी कोणत्याही केसची प्राथमिक सुनावणी करणाऱया कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज प्रादेशिक भाषांमध्ये होत असल्याने ‘सुव्हास’सारख्या तांत्रिक साधनास हिंदुस्थानसारख्या बहुभाषिक राष्ट्रामध्ये पर्याय नाही. न्यायाधीशांसाठी अडचण ठरणाऱया प्रशासकीय कार्यांमध्ये ही साधने उपयुक्त ठरतील याबद्दल शंका नाही. एखाद्या प्रकरणाशी संलग्न असणाऱया कायदेशीर तत्त्वांवर न्यायालयाने यापूर्वी नेमकी कोणती मते मांडली आहेत आणि त्यात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे का, ही न्यायिक जबाबदारी पार पाडणे न्यायालयांना सोपे जाईल. जगातील अनेक न्यायपालिका या तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांची न्याय क्षमता वाढविण्यासाठी करत आहे.

हिंदुस्थानी न्यायप्रणालीतील बिग डेटा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे दोन्हीही अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत, शिवाय या दोन्ही संकल्पनांचा प्रत्यक्ष प्रणालीतील वापर अजून तरी मर्यादित स्वरूपाचा आहे. पारंपरिक कायदेशीर कामकाजाचा विचार केल्यास आपली कायदेव्यवस्था ही प्रचंड माहितीने वेढलेली आहे हे लक्षात येते. वकिलांची कार्यालये आणि लॉ फर्म्स ग्रंथ, पुस्तके, कागदपत्रे आणि फाईल्सनी वेढलेली असतात, तरीही कायदेशीर सल्ला देताना वकील अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमधून प्राप्त केलेल्या व्यवहारी ज्ञानाचा वापर करतात. अनुभव, स्मरणशक्ती आणि अनुभवाने आलेले विश्लेषणसामर्थ्य यांच्या संयोगातून मिळालेले हे ज्ञान अप्रबंधित स्वरूपाचे असते आणि ही अंतर्दृष्टी कोणत्याही तांत्रिक साधनात अंतर्भूत करता येत नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि ‘बिग डेटा’सारखी साधने कायदेशीर कामकाज सुलभ करू शकत असली तरी ती न्यायालयीन कर्मचाऱयांची, वकिलांची आणि न्यायाधीशांची जागा घेऊ शकत नाहीत. तांत्रिक साधनांचे स्वतःचे कोणतेही आंतरिक मूल्य नसते. त्यांद्वारे मिळणारी माहिती तेव्हाच उपयुक्त ठरते जेव्हा संबंधित माहितीचे व्यक्तीनिष्ठ पद्धतीने विश्लेषण केले जाऊ शकते. व्हर्च्युअल न्यायालयीन सुनावणी, रजिस्ट्रीमधील केसेसची वेगवान आणि अचूक नोंद तसेच अल्पानुभवी ते ज्येष्ठ अशा सर्व वकिलांचे आणि एकंदरीत न्यायव्यवस्थेचे हितसंबंध जोपासणारे तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे.

वकिली व्यवसायाचे भवितव्य

कायद्याचे नियम अबाधित ठेवत घटनात्मक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असलेले वकील न्यायालयीन प्रक्रियेच्या स्थिरतेवर अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांशी आणि शासनाच्या विविध शाखांशी संवाद साधणारे वकील हे त्या घटकांना आणि शाखांना न्यायालयीन व्यवस्थेशी जोडतात. कायद्याच्या विकासाला सामर्थ्य देणारे आणि सामाजिक बदल घडवणारे तर्काधारित आणि घटनानिष्ठ बौद्धिक भांडवल हे वकिलांकडे असते. आपल्या अशिलाच्या खासगी, आर्थिक आणि सांपत्तिक कारणांसाठी लढणारे वकील प्रत्यक्षात सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असतात त्यामुळे ते न्यायालयाच्या प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहेत. व्हर्च्युअल स्वरूपातील न्यायालयीन कामकाज हे प्रत्यक्ष न्यायालयातील कामकाजाच्या तुलनेत फारसे प्रभावशाली नसले तरी जगाच्या कोणत्याही कोपऱयात असणारा क्लायंट या सुनावणीमध्ये सहभागी होऊ शकतो ही या बदलाची जमेची बाजू आहे. याशिवाय कोर्टरूममध्ये अनेक वकिलांच्या उपस्थितीत केल्या जाणाऱया वाद-प्रतिवादांपेक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपली बाजू मांडणे नवीन वकिलांना अधिक सोयीचे आणि आत्मविश्वासदेय आहे.

[email protected]
(लेखिका दिल्ली विद्यापीठात कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या