प्रेरणा – बांबू कलेचा चंद्रपूर पॅटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

‘बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र’ म्हणून राज्याला सुपरिचित चंद्रपूरच्या मीनाक्षी मुकेश वाळके पालघरच्या आदिवासी महिलांना बांबू कलेचे धडे देत आहेत. वसई तालुक्यातील भालिवली गावात 20 आदिवासी महिलांना बांबू राखी, दिवे आणि दागिने बनविण्याचे 10 दिवसांचे प्रशिक्षण मीनाक्षी देत आहेत. विवेक रुरल डेव्हलपमेंटच्या ‘सेवा विवेक’ प्रकल्पात मीनाक्षी यांचे प्रशिक्षण 3 एप्रिलपासून सुरू झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशिक्षणापूर्वी 2 एप्रिलला या कार्याचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या. ‘सेवा विवेक’चे मनोज कुमार शाह आणि विजय चौथाईवाले यांच्या मार्गदर्शनात लुकेश बंड आणि प्रगती बांगर यांच्या निरीक्षणात हे प्रशिक्षण सुरू असून बांबू राखीला संपूर्ण देशात आणि पाच पाश्चिमात्य देशांत लोकप्रिय करणाऱ्या मीनाक्षी वाळके यांच्या प्रशिक्षणाने पालघर जिह्यातील बांबू राखीच्या कार्याला नवी झळाळी येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मीनाक्षी यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या 25 मुलामुलींना 40 दिवस बांबू कलेचे धडे दिले आहेत. त्यानंतर नाबार्ड आणि उमेद अभियानाच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगरच्या एमआयटी संस्थेकडून रोटेगाव येथे मीनाक्षी यांनी बचत गटाच्या महिलांना बांबू कलेचे धडे दिले आहेत. मीनाक्षी यांना येणाऱया काळात मराठवाडय़ातील धाराशीव, झारखंडच्या रांची, छत्तीसगढच्या बस्तर, कोलकाता, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांतून महिलांना बांबू कलेचे धडे देण्याची निमंत्रणे मिळाली आहेत. अवघ्या 29 वर्षांच्या मीनाक्षी या आपल्या सहा वर्षांच्या मुलाला सांभाळत महिलांच्या सक्षमीकरणाचा रथ पुढे नेण्यासाठी सरसावल्या आहेत. इस्रायलच्या जेरुसलेम येथे एका कला शाळेत शिकवण्यासाठी निमंत्रण मिळालेल्या मीनाक्षी यांना कॅनडाचा इंडो-कॅनेडियन आर्ट अँड कल्चरल इनिशिएटिव्ह संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय यशवंतराव चव्हाण सेंटरचा बांबू उद्योगासाठी विशेष पुरस्कार ही 23 एप्रिलला प्रदान करण्यात येणार आहे. मीनाक्षी या स्वतः ग्रामीण क्षेत्रातील असून अत्यंत गरिबी आणि अभावाच्या परिस्थितीतून त्यांनी 2016-17 पासून बांबूचा वसा घेतला. त्यानंतर त्यांनी बांबू क्षेत्राला पाच नव्या कलाकृती दिल्या. बांबूचा क्यूआर कोड स्कॅनर हे त्यांचे डिझाईन विशेष गाजले आहे.

बांबू हे फ्युचर मटेरियल म्हणून सारे जग त्याकडे मोठय़ा उत्सुकतेनं बघताना जगाला बांबू कलेचं दान देणाऱया हिंदुस्थानात त्यातून क्रांती व्हावी हा माझा उद्देश आहे. महिलांना शाश्वत रोजगार देण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. आदिवासी महिलांना उपजत या कलेचं अंग असल्यानं त्यांच्या उत्कर्षासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पिंजून काढण्याचा विचार केलाय.
 मीनाक्षी वाळके