
>> अक्षय मोटेगावकर
इतिहास, जागतिक महासत्ता, लोकशाही, दहशतवाद, अण्वस्त्रs, जागतिकीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांबाबतची आपली दृष्टी विस्तारणाऱ्या ‘चाणक्य मंडल परिवार’ यूटय़ूब चॅनेलवरील अविनाश धर्माधिकारी सरांची व्याख्याने ऐकली की, वक्ता दशसहस्रेषु हे विशेषण पूर्णपणे पटते.
शाळेत असताना नवनीतचे छान पण महागडे रजिस्टर नोटबुक घ्यायची इच्छा असायची त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या शेवटच्या पानावर जगातील सार्वकालिक थोर नेत्यांचे, विचारवंतांचे सुविचार असायचे. त्यापैकी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे दोन सुविचार हे खूप खोलवर रुजले आहेत. ‘जे राष्ट्र स्वतचा इतिहास विसरते, ते भविष्य घडवू शकत नाही’ आणि ‘आपण जितके दूरवर इतिहासात पाहू शकू तेवच दूरवर तुम्ही भविष्यात डोकावू शकाल.’ हे दोन सुविचार म्हणजे आपण इतिहासाचा अभ्यास का केला पाहिजे याची सोपी कारणमीमांसा आहे असा मला वाटते.
हळूहळू समज वालागली तसतसे लक्षात येऊ लागले की, इतिहास हा त्या काळच्या परिस्थितीमुळे, त्या काळातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या निर्णयामुळे खूप मोठय़ा प्रमाणात प्रभावित झालेला असतो. इतिहासाची कित्येक पाने, प्रवाह हे काही घटना, काही निर्णय इतक्या प्रकर्षाने बदलवतात की, त्याची दखल पुच्या कित्येक दशकांत, शतकांत घेतली जाते. त्यामुळे इतिहासाचे पडसाद हे दूरगामी ठरतात. जसजसा इतिहासाचा अभ्यास, वाचन सुरू केले तसतसा त्यात रस येऊ लागला. मग इतिहासाशी संबंधित व्याख्याने, भाषणे ऐकण्याचा छंद लागला. यातूनच गवसले अविनाश धर्माधिकारी सरांची व्याख्याने. सरांची पहिल्यांदा ओळख झाली ती रिचर्ड बाखच्या त्यांनी सांगितलेल्या जगप्रसिद्ध गोष्टीमुळे- जोनाथन लिविंगस्टन सीगलमुळे. या त्यांच्या कथेच्या भाषणाची कॅसेट लहानपणी ऐकली होती. कोरोना काळात सरांचे चाणक्य मंडल परिवार हे यूटय़ूब चॅनेल सापडले आणि माझ्या हाती इतिहासाचा एक वेगळा खजिनाच सापडला.
अविनाश धर्माधिकारी हे स्वत एक ज्येष्ठ सनदी अधिकारी. त्यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक अकरावीला असतानाच वाचले होते. त्यामुळे आयएएस परीक्षेची तयारी, अभ्यास, ट्रेनिंग, अधिकाऱयाच्या जबाबदाऱया, त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, लोकांसोबत काम करताना त्यांची मने आणि विश्वास कसा जिंकावा लागतो हे सर्व वाचून होतो. यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या अवघड स्पर्धा परीक्षांसाठी किती वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, लोक प्रशासन, इतिहास, तत्त्वज्ञान, भूगोल, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यांसारख्या अनेक विषयांचा अभ्यास लागतो. धर्माधिकारी सरांची चाणक्य मंडल परिवार या यूटय़ूब चॅनेलवरची भाषणे ऐकताना त्यांच्या अभ्यासाचा आवाका आणि विषय समजावून सांगण्याची हातोटी श्रोत्याला अचंबित करते. त्यांची जय भारत, जय जगत ऐकताना जागतिक महासत्ता, लोकशाही, दहशतवाद, अण्वस्त्रs, जागतिकीकरणसारख्या विषयांवर ऐकायला मिळते.
जग बदलवून टाकणाऱ्या नेत्यांच्या आपण त्यांच्या सम व्हावे या शृंखलेत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांच्यावरची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पूर्वग्रह विरहित व वस्तुनिष्ठ भाषणे ऐकायला मिळतात. आधुनिक भारताचा इतिहास ही सात व्हिडीओजची शृंखला प्रत्येक वेळी एक नवीन पैलू उलगडून समोर यावा अशी झाली आहे. भारतीय ज्ञानगंगा ही छोटी म्हणजे 1 ते 2 मिनिटांच्या व्हिडीओजची मालिका ज्यात कबीराचे दोहे, तुकारामांचे अभंग, कर्मयोगाचे सार, श्रीकृष्णाची शिकवण यांसारख्या गोष्टींवर भर देते. ‘नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी’ ही प्रार्थना आणि त्याच नावाची मालिका तर फार रोमांचक आहे. ऑपरेशन एंटेबी, मेजीची पुनस्थापना, जॉन ऑफ आर्क, अमेरिकन गृह युद्ध आणि अब्राहम लिंकन, कारगिल युद्ध, जोनाथन लिविंगस्टन सीगल, लॉन्ग मार्च ऑफ चायना ही फार प्रेरणादायी भाषणे आहेत. लहान-थोर सगळ्यांनी ऐकावी अशी. यासोबतच कार्यकर्ता अधिकारी, अस्वस्थ दशकाची डायरी या व्हिडीओ शृंखला पण छान आहेत. या यूटय़ूब चॅनेलवर धर्माधिकारी सरांसमवेत अजून बऱयाच मान्यवरांची भाषणे प्रेरणादायी आहेत, ती पण एक वेगळा दृष्टिकोन देणारी आहेत.
अविनाश धर्माधिकारी सरांची व्याख्याने ऐकली की, वक्ता दशसहस्रेषु हे पूर्णपणे पटते. घटनांची उकल कशी करायची आणि त्यामागचे जागतिक स्तरावरचे पडसाद कसे जोखायचे हे सरांच्या भाषणातून कळते. ही भाषणे आणि व्याख्याने खऱया अर्थाने तुमची दृष्टी विस्तारतात.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)





























































