अनुबंध – नोमॅडलँड : फिरस्तीपणाचं वैश्विक अपील

>> अमोल उदगीरकर

कोरोनाची जीवघेणी साथ आहे. सध्याचा भवताल हा प्रचंड नकारात्मक आहे. रोज मृत्यूच्या आणि दुःखद शोकांतिकांच्या बातम्या कानावर पडत आहेत. अशा वेळेस थोडा उदासवाणा तरीही आशा देणारा सूर लावणाऱया ‘नोमॅडलँड’सारख्या अप्रतिम सिनेमाला ऑस्कर मिळणं सर्वार्थाने महत्त्वाचं आहे .

एका रात्रीत आपल्या घर /सोडून जाणाऱया माणसांच्या प्रेरणा नेमक्या काय असतील? त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू असतं? तडकाफडकी घरं किंवा गाव सोडणं म्हणजे आपल्या आवडत्या थियेटरला सोडणं, एखाद्या वडाच्या झाडाखालची हवीहवीशी सावली सोडणं, आईच्या हातच्या शेंगदाणा चटणीची चव सुटणं आणि बरंच काही. घर सोडून जाण्याभोवती जो एक रोमँटिसिज्म आहे, तितका तो प्रत्यक्षात नसावा. ‘हमने घर छोडा है, रसमो को तोडा है’वाला कोवळा रोमँटिसिज्म घराला कातावलेल्या, घरातल्या लोकांशी कधीच नाळ न जुळलेल्या लोकांसाठी फार लवकर अकाली मृत्यू पावत असावा. वर्षानुवर्षे एका घरात काही लोकांसोबत राहिल्याने ‘Sense of belonging’ निर्माण होतो हे मिथ आहे. या लोकांचं आयुष्यात कधीच ‘घर ’ निर्माण होत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका.

अनेक उत्तम सिनेमे, संगीत, साहित्यकृती अशा घर सोडून वणवण फिरणाऱया नायकांच्या आणि नायिकांच्या संदर्भांनी भरलेल्या आहेत. अशाच घर सोडून निघालेल्या एका स्त्र्ााrची कथा सांगणाऱया ‘नोमॅडलँड’ सिनेमाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मानाचा ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाला. जणू या ‘वॉन्डरलस्ट’ जमातीची नोंद घेणं ‘ऑस्कर’ला अगत्याचं वाटलं असावं.

2008 च्या आर्थिक महामंदीमध्ये अनेक अमेरिकन मध्यमवर्गीय लोकांना मोठा फटका बसला. एरवी अतिशय सुखवस्तू आयुष्य जगणारे अनेक लोक एका रात्रीत बेघर झाले. फर्न (फ्रान्सेस मॅकडरमॉट) ही या लोकांपैकीच एक. एके दिवशी आपल्या व्हॅनमध्ये काही गरजेच्या आणि काही आठवणी निगडित असणाऱया गोष्टी घेऊन आपलं राहतं शहर सोडून फिरतीवर निघते. रस्त्यात लागणाऱया मॉल्समध्ये, सुपरमार्केट्समध्ये आणि शॉप्समध्ये मिळेल ते काम करायचं, गरजेपुरते पैसे कमवायचे आणि पुढच्या शहराकडे निघायचं, अशी फर्नची पद्धत असते. या प्रवासात तिला अनेक चांगले लोक भेटतात. तिचे काही निखळ मैत्र तयार होते. नवऱयाच्या निधनानंतर एकाकीपण आलेल्या फर्नच्या आयुष्यात पुन्हा प्रेम येण्याची शक्यता पण तयार होते. या सगळ्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देते, पण फर्न कुणामध्येही गुंतत नाही.

‘नोमॅडलँड’चं कथानक म्हणाल तर हेच. फर्नला भेटणारी वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वयोगटातली माणसं हीच कथानकाला पुढे नेतात. दिग्दर्शक क्लोई झाओला सिनेमातून कुठलंही विधान करायचं आहे, असं वाटतं नाही. सामाजिक संदेश देणाऱया किंवा राजकीय विधान करू पाहणाऱया चित्रपटांच्या भाऊगर्दीत ‘नोमॅडलँड’ हा काहीजणांना महत्त्वाकांक्षी चित्रपट न वाटण्याची शक्यता आहे. पण क्लोई झाओच्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून आणि जोशुआ रिचर्डसच्या सिनेमॅटोग्राफीमधून अतिशय तटस्थपणे आणि संथपणे उलगडत जाणं हेच नोमॅडलँड’चं महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. चित्रपट तटस्थपणे उलगडतो म्हणजे त्यात भावनांना फारसं स्थान नाही का? तर तसं नाही. नोमॅडलँडमध्ये उत्कट भावनांचं विलोभनीय चित्रण आहे. घर सोडण्यापूर्वी फर्नने नवऱयाच्या शर्टाला घट्ट कवटाळणे, प्रवासात भेटलेल्या एका तरुण भटक्याने त्याच्या प्रेयसीला एकवावं म्हणून फर्नने त्याला शेक्सपियरची कविता एकवणं, फर्नच्या एका भटक्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर तिला तिच्यासारखेच अनेक लोक श्रद्धांजली वाहतात तो प्रसंग, चित्रपटातलं महत्त्वाचं पात्र असणारा बॉब आपली करुण कहाणी फर्नला ऐकवतो तो क्षण आणि असे कित्येक हळुवार क्षण सिनेमात आहेत. तिथं कुठलाही मेलोड्रामा नाही, कुठलंही अंगावर येणारं पार्श्वसंगीत नाही की बटबटीत क्लोज अप्सचा सतत मारा नाही. सगळं कसं तद्दन मेलोड्रामाला फाटय़ावर मारणार. सिनेमात एक फार सुंदर मोंताज आहे. फर्न तिच्या एका मैत्रिणीचं ऐकून-बघून अतिशय निसर्गरम्य जागांना भेटी देते. रानटी श्वापदांना जवळून बघते. दरीच्या टोकावर उभी राहते. नदीच्या निखळशंक पाण्यात सगळे कपडे काढून पोहते. स्क्रीनवरच्या फर्नचं आयुष्य श्रीमंत करणारे हे क्षण आपल्याला पण कुठंतरी समृद्ध करून जातात . पण इतकं असूनही नोमॅडलँड ही ‘फील गुड’ फिल्म नाहीये. ती अतिशय वास्तवात जगणारी फिल्म आहे. सिनेमातल्या सुंदर क्षणांना आणि सुंदर शॉट्सला पण एक औदासिन्याचं कोंदण आहे. सिनेमात दाखवलेलं भटक्या लोकांच्या आयुष्यातलं एकाकीपण, वयानुरूप पाठीमागे लागलेले आजार, सदैव पाचवीला पुजलेली आर्थिक असुरक्षितता या गोष्टी आपल्याला त्या मनमोकळ्या, वरकरणी उन्मुक्त वाटणाऱया आयुष्यातली ठसठशीत भोकं पण दाखवतात. अनेकदा असा स्वतंत्र, एकाकी आणि दहा ते पाचच्या चक्रात न अडकणाऱया माणसांच्या आयुष्याबद्दल एक हेव्याचा सूर तुलनेनं सुरक्षित आयुष्य जगणाऱया लोकांमध्ये दिसतो. पण हे मनमोकळं सुंदर आयुष्य दिसतं तितकं सुंदर नाही हे पण नोमॅडलँड बघताना जाणवतं. मी वर म्हणालो तसं हा चित्रपट फार तटस्थ आहे तो या अर्थाने. ‘नोमॅडलँड’ची कथा जरी एका भटकं आयुष्य जगणाऱया स्त्र्ााrची असली तरी ती जगातल्या अनेक फ्रिलान्सर्सची, लग्न न करता एकटं राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱया माणसांची, घरच्या लोकांशी जमत नाही म्हणून वेगळं राहणाऱया माणसांची आणि जगातल्या कित्येक एकटेपणा -अस्थिरतेचा पर्याय स्वीकारलेल्या माणसांची गोष्ट आहे. ‘नोमॅडलँड’चं वैश्विक अपील आहे, ते या चिरंतन एकटेपणात .विनोद कुमार शुक्ल ‘नौकर की कमीज़’मध्ये लिहितात, बाहर जाने के लिए उतना नहीं होता जितना लौटने के लिए होता है. लौटने के लिए खुद का घर ज़रूरी होता.’ आपल्या मध्यमवर्गीय सुरक्षिततेची सवय लागलेल्या काही प्रेक्षकांना शेवटी ‘नोमॅडलँड’ बघताना आपल्या सुरक्षित भवतालाची किंमत नवीनपणे आकलण्याची शक्यता पण एकदमच नाकारण्यासारखी नाही.
एक वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे सिनेमात महत्त्वाची असणारी पात्रं ही व्यावसायिक अभिनेते नाहीत. तर खऱया आयुष्यातले व्हॅनमध्ये देश पालथा घालणारी माणसं आहेत. खऱया आयुष्यातलीच भूमिका कॅमॅऱयासमोर करत असल्यामुळे असेल, पण ते फ्रेममध्ये खूप नैसर्गिक वाटतात. चित्रपटातल्या प्रत्येक सीनमध्ये फर्नची भूमिका करणारी फ्रान्सेस मॅकडरमॉट ही जगभरातल्या चित्रपटरसिकांना माहीत असणारी अभिनेत्री आहे. यापूर्वी अवघे दोन चित्रपट नावावर असणाऱया क्लोई झाओने या चित्रपटातून डायरेक्ट ऑस्करवर आपली मोहोर उमटवली आहे. सिनेमाच्या विषय प्रकृतीमुळे तो डॉक्युमेंट्री वाटण्याची खूप जास्त शक्यता असताना तो तसा होत नाही, याचं श्रेय क्लोई झाओचं.

कोरोनाची जीवघेणी साथ आहे. सध्याचा भवताल हा प्रचंड नकारात्मक आहे. रोज मृत्यूच्या आणि दुःखद शोकांतिकांच्या बातम्या कानावर पडत आहेत. अशा वेळेस थोडा उदासवाणा तरीही आशा देणारा सूर लावणाऱया ‘नोमॅडलँड’ सारख्या अप्रतिम सिनेमाला ऑस्कर मिळणं सर्वार्थाने महत्त्वाचं आहे. ‘नोमॅडलँड’ हा ‘प्रीक्वल-सिक्वल’च्या व्यावसायिक खेळात अडकणारा सिनेमा नाही. पण नोमॅडलँड’मधल्या फर्नला पुन्हा स्वतःचं घर, स्वतःचं अंगण आणि स्वतःचं माणूस सापडण्याची शक्यता अंधुकपणे का होईना दिसते. या सिनेमातलं बॉब हे पात्र कधीही कुणाला निरोप देत नसतं. अगदी आपल्या मृत मुलालाही तो पारंपरिक अर्थाने निरवानीरवीची भाषा वापरून तो निरोप देत नाही. या अनेक शक्यतांचा अकाली शेवट करणाऱया भाषेऐवजी तो नेहमी म्हणत असतो -I’ll see you down the road .. ’नोमॅडलँड’चं भरतवाक्य म्हणता येईल ते हेच.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या