गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस

>>अनिल हर्डीकर

गदिमा म्हणजे अनेक रसिकांचे, कवींचे आदरस्थान. कविवर्य सुधीर मोघे यांनाही या आपल्या आवडत्या माणसाला भेटण्याची आस लागली होती, पण भेटीचा योग आला नव्हता… आणि तो अचानक आला. या भेटीचे वर्णन सुधीर मोघे यांच्या शब्दांत.

स्त्री सौंदर्याचा मोह, आकर्षण कुणा पुरुषाला नसतं? सौंदर्याच्या मालकिणीला प्रथम दृष्टिभेटीतच रसिक पुरुष मनोमन हृदयाच्या सिंहासनावर विराजमान करत असतो. याचं यथार्थ वर्णन ग. दि. माडगूळकरांनी `राज्याभिषेक’ या कवितेत केलं आहे. तर `मुंबईचा जावई’मधील चित्रपट गीतात प्रथमदर्शनी प्रेमाविषयी त्यांनी लिहिलंय…

`प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला ।।
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटूनी तू घेतला ।।
जाग धुंदीतुनी तुजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला ।।’

गदिमा म्हणजे अनेक रसिकांचे, कवींचे आदरस्थान! कविवर्य सुधीर मोघे यांचेही. आपल्या आवडत्या माणसाला भेटण्याची आस स्वाभाविक, पण भेटीचा योग आला नव्हता… आणि तो अचानक आला. त्याचं वर्णन सुधीर मोघेंच्या लेखणीतून. ते लिहितात…

“आमच्या गावात, किर्लोस्करवाडीला द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि ग. दि. माडगूळकर यांच्या कथाकथनाचा कार्पाम ठरला. हे कळल्यापासून प्रत्यक्ष कार्पामाच्या वेळेपर्यंत आपण केवळ उड्या मारणे एवढेच हातात होते. पण त्याआधी एक दुर्लभ संधी अगदी अनपेक्षितपणे माझ्याकडे चालून आली. त्या चौघांना आणण्यासाठी एक अँबेसॅडर मोटार ड्रायव्हरसह पाठवायची होती. त्याबरोबर वाटेत काही लागल्यास एखादा उत्साही कार्यकर्ता सोबत पाठवावा असं कुणाला तरी वाटलं आणि तिथे माझी वर्णी लागली. प्रथम द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर या दोघांना घेऊन आम्ही `पंचवटी’मध्ये कविराजांकडे गेलो. प्रथमदर्शनीच भारावून जावं असाच तो परिसर होता. घराभोवती मोठं कंपाऊंड, त्याला भलामोठा प्रशस्त लोखंडी दरवाजा… विस्तीर्ण अंगण… अंगणात एक भलामोठा डेरेदार वृक्ष… त्याच्याभोवती प्रशस्त पार… एक सुंदर तुळशी वृंदावन… दगडी बंगला… प्रथमदर्शनी प्रेमात पडावं असा. मुख्य घरात प्रवेश करण्याआधी एक बंद जाळीची छोटीशी, पण पसरलेली पडवी… त्या पडवीतच बैठक आणि तिथल्या सन्मुख असलेल्या प्रशस्त कोचावर साक्षात कविराज ग. दि. माडगूळकर. माझं सर्वांग कुणीतरी चिमटे काढावेत तसं हुळहुळत होतं आणि अविश्वसनीय छान वाटत होतं. एकच गोष्ट गोंधळात टाकणारी होती. गदिमा निवांत घरगुती पोषाखात म्हणजे धोतर, गंजीफ्रॉक असे बसले होते. कसलीही घाई नसल्यासारखे! क्षणात त्या निवांतपणाचा उलगडा झाला. त्यांना बसलेली बैठक मोडून कपडेबिपडे करून कसलीही हालचाल करावी ही कल्पनाच नको होती. मग मोटारीत बसून कुठल्या तरी गावी जाऊन कथाकथन वगैरे करणं ही गोष्ट तर दूरच!

“मला नको रे ..तुम्ही जा बरे ….कुठे बाहेर पडायचं या उन्हात ?” कविराज म्हणत होते. मला तर धरणी दुभंगते आहे असं वाटू लागलं. मग बरेच आग्रहाचे संवाद… त्यात माझाही जरा आगाऊ, पण अगदी बेंबीच्या गाभ्यापासून सहभाग. कशाचा परिणाम नक्की झाला सांगता येणार नाही पण स्वारी उठली आणि हालचाली सुरू झाल्या. माझ्याच वयाच्या आसपासची दोन-तीन मुले हालचाल करू लागली. परीटघडीचे शुभ्र कपडे आणले गेले. एक छोटीशी बॅग पुढे आणली गेली. बघता बघता नवरदेव सजावा तसे गदिमा सजले. विद्या वहिनींनी परीट घडीचा रुमाल आणून त्यांच्या जाकिटाच्या खिशात सरकवला आणि जेहत्ते कालाचे ठायी आमची गाडी `पंचवटी’च्या प्रांगणातून बाहेर पडून रस्त्यावर धावू लागली. त्या दिवशीचा तो पुणे-किर्लोस्करवाडी प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही.

गप्पांचा महापूर सर्वांगावरून वाहत होता. सगळी नामांकित मंडळी, पण कुणीही आचार्यांपुढे कसलंच उल्लंघन करत नव्हते. आचार्यांनीही शिष्यवर्गाची प्रेमाने खेचाखेच चालवली होती. साहित्य क्षेत्रातल्या उखाळ्यापाखाळ्या काढून झाल्या, पण त्या जोडीला मराठी, संस्कृत काव्याची अमोघ रसवंतीही चालली होती. थोडी संधी मिळताच मीही मला पाठ असलेल्या त्यांच्याच काव्यपंक्ती त्यांच्यावर फेकून वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. त्यांनी जरा साश्चर्य कौतुकाने माझ्याकडे पाहिलं.

हा मुलगा बराच उचापत्या दिसतोय या अर्थाने. गाडी कराड सोडल्यावर वाडीच्या फाट्यावर वळली. मग गदिमा एकदम बालपणाच्या आठवणीत शिरले. त्याच गप्पांमध्ये गदिमांनी राम गणेश मोघे म्हणजे माझ्या वडिलांची आठवण काढली. त्यांची कीर्तने, नाटकांतील कामे याबद्दल बोलताना ते म्हणाले, “हे राम गणेश मोघे म्हणजे आपले श्रीकांत मोघे आहेत ना त्यांचे वडील.” त्यावर द. मा. मिरासदार म्हणाले, “म्हणजे याचेही वडील. हा सुधीर… श्रीकांतचा धाकटा भाऊ.” “असं होय! तरीच…” माझ्याकडे कौतुकाने पाहत म्हणाले, “मी म्हटलंच, पोरगं बेनं दिसतंय.”

हाच सुधीर पुढे कविता लिहू लागला. `सह्याद्री’वरच्या `अधांतरी’ या मालिकेसाठी श्रीकांत पारगावकर यांनी गायिलेलं गीत सुधीर मोघेंनी लिहिलं होतं. शब्द होते…
`भेटशील केव्हा, माझिया जिवलगा
उतावीळ मन तुझिया भेटी’

[email protected]