सिनेमा : प्यारे दुनिया ये सर्कस है…

>> प्रा. अनिल कवठेकर

काही दिग्दर्शकांना चित्रपट निर्माण करण्यापूर्वीच पडद्यावर दिसलेला असतो. अशा नामवंत जागतिक दिग्दर्शकांपैकी एक आहेत, शो मॅन राज कपूर. जशी ऑर्केस्ट्रामधल्या अनेक वाद्यांच्या ध्वनीमधून एक सुंदर सुरावट तयार होते. तसेच राज कपूर यांच्या चित्रपटातले दृश्य, गाणी, संवाद, संगीत, अभिनय… या सगळ्यांच्या विशिष्ट रचनेमधून एक परिणामकारक सुंदर चित्रपट तयार होतो. ‘मेरा नाम जोकर’ हा त्या पैकीच एक. त्यातल्या गाण्यातल्या शब्दांचे अर्थ, भावना, विचार… या सगळय़ांचा नव्याने विचार करून त्यातल्या सौंदर्याचा घेतलेला हा एक विलक्षण अनुभव…

प्रत्येक दिग्दर्शकाचे एक भव्य दिव्य जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा चित्रपट निर्माण करण्याचे स्वप्न असते. राज कपूरसाहेबांचेही होते. त्यांच्या स्वप्नातला चित्रपट होता ‘मेरा नाम जोकर’! मल्टीस्टारकास्ट आणि अप्रतिम गाणी… सर्व काही सुंदर असूनही तो चित्रपट प्रेक्षकांना समजला नाही अन् चाललाही नाही. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सौंदर्य समजण्यासाठी मनाच्या विचारांची जी बैठक हवी असते ती बैठक जर तयार नसेल, तर ते सौंदर्य प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही.

मानवी सौंदर्याला काळाचा शाप असतो. पण साहित्यातल्या सौंदर्याला काळाची कोणतीच मर्यादा नसते. नंतर हळूहळू ‘मेरा नाम जोकर’ लोकांना कळला. समीक्षकांनी उचलून धरला आणि तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. यातले प्रत्येक गाणे हे जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारे गाणे आहे. त्यातल्या एका गाण्यावर मांडलेले हे विचार…

‘‘ए भाई जरा देख के चलो
आगे ही नही पीछे भी
दाये ही नही बाये भी
उपर ही नही नीचे भी…’’

सर्कशीच्या रिंगणात नाना करामती करून प्रेक्षकांना हसवणारा जोकर, जेव्हा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतो, तेव्हा त्याच्या एकंदर पेहराव आणि विनोद बुद्धीमुळे त्याचे म्हणणे फारसे मनावर घेतले जात नाही. पण तो जे काही या गाण्यातून सांगतो ते काल सत्य होते. आज सत्य आहे आणि भविष्यातही सत्यच असणार आहे.

संतांनी म्हटल्याप्रमाणे ‘‘सदा सावध तो सदा सुखी.’’ जो कायम सावध असतो तोच सुखी असतो. कारण आपल्याला शत्रूपेक्षा हितशत्रूंपासून अधिक धोका असतो. आपल्या भोवती कोण आहे, पुढे आणि मागे कोण आहे, वर आणि खाली कोण आहे, हे पाहून पुढे जायला जोकर सांगतो. आपल्याभोवती असलेली जयजयकार करणारी मंडळी fिवश्वासघाताचा खंजीर घेऊन तर वागत नाहीत ना. हे लक्षात घ्यायला हवे.

‘‘तू जहा आया है, वो तेरा घर नही, गली नही, गांव नही, कुचा नही, बस्ती नही, रस्ता नही, दुनिया है और प्यारे दुनिया ये सर्कस है…’’

जोकर किती सहजपणे त्याच्या विश्वाला मूळ विश्वाशी जोडतो, ते या कडव्यातून लक्षात येते. या मायावी जगात हे माझे घर, माझी गाडी, माझा गाव… सर्व माझे असल्याच्या भ्रमातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. हे विश्व म्हणजे एक सर्कस आहे. या ‘‘दुनिया’’ नावाच्या सर्कशीत प्रत्येकाला यायचे आणि जायचेही आहे. जीवन आहे तसा मृत्यूही ठरलेला आहे. गरीब, श्रीमंत, मोठा वा छोटा कोणीही असला तरी येणे आणि जाणे हे चालूच राहणार आहे. जीवनाच्या सर्कशीत चाबूक घेऊन उभेअसते ते नशीब! तो चाबुक भुकेचा आहे, पैशाचा आहे आणि नशीब बदलणाराही आहे. अनुभवाचे तडाखे सहन करत भुकेसाठी धावताना, पैशासाठी कष्टाच्या चाबकाचे फटके सहन करताना तुमचे नशीब नाचायला, हसायला, गायला आणि रडायलाही भाग पाडते. मोठय़ा पदावरून छोटय़ा पदावर जाण्याची वेळ आणते. तर कधी श्रीमंताला गरीब व्हायची वेळ आणते. गाणे जीवनाच्या खरेपणाचा आरसा आपल्याला दाखवते. आरशातील आपले प्रतिबिंब पाहून आपण शहाणे व्हायला हवे. असे कोणी शिकवत नसले तरी गाण्यातून नेमके काय घ्यायचे हा प्रत्येकाच्या वैचारिक क्षमतेचा भाग आहे. परंतु स्वतःची दृष्टी विशाल असेल तर दुसऱयांकडे पाहून ती दृष्टी विकसित करता येते.

‘‘क्या है करिष्मा पैसा खिलवाड है
जानवर आदमी से ज्यादा वफादार है…’’

माणसापेक्षा जनावर अधिक प्रामाणिक आहे. उपाशी राहील पण आपल्या मालकाशी गद्दारी करणार नाही. पण माणूस ज्याचे खातो, सत्ता, मानसन्मान मिळवतो त्याच्याच छातीत कटय़ार खुपसतो. किती सहजपणे वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळातील अनेक घटनांचा उल्लेख या कडव्यामध्ये सहजपणे येऊन जातो. गाण्याचे सौंदर्य असे असते की ते नायकाचे उरत नाही तर पाहणाऱयाच्या आयुष्यात घडणारे काव्य बनते.

‘‘हा बाबू ए सर्कस है, शो तीन घंटे का,
पहिला घंटा बचपन है
दुसरा जवानी है, तिसरा बुढापा है
और उसके बाद मां नही, बाप नही, बेटा नही, बेटी नही, तू नही, मै नही, ये नही, वो नही, कुछ भी नही रहता है…’’

सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये जोकरने सांगितल्याप्रमाणे हे तीन टप्पे आहेत. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य. संपूर्ण जीवनाला तीन तासांत बसवणारा हा कवी नीरज खऱया अर्थाने मोठा तत्त्ववेत्ताच आहे. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचा (तासाचा) आपल्याला मनमुराद आनंद घेता आला तरच या जीवनातल्या या तिन्ही तासांना महत्व, सौंदर्य व अर्थ प्राप्त होईल. सर्कशीचा खेळ जसा संपतो आणि प्रेक्षक निघून जातात. तशीच आपली नातीसुद्धा संपतात. हे संपूर्ण गीत विलक्षण आहे. विचार करायला भाग पाडणारे आहे. सुन्न करणारे आहे तसेच मनाला जागे करणारेही आहे.

‘‘गिरने से डरता है क्यो,
मरने से डरता है क्यो,
ठोकर तू जब तक ना खायेगा,
पास किसी गम को ना जब तक बुलाएगा
जिंदगी है चीज क्या नही जान पायेगा
रोता हुआ आया है रोता चला जायेगा
ये भाई…’’

बालपणी पडण्यातूनच आपण चालायला शिकलो. धावायला शिकलो. मग पडण्याला का घाबरतोस? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अरे, या पृथ्वीवर कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. इथे आलेल्याला केव्हा ना केव्हा जायचे आहे. वास्तवाचा स्वीकार कर. मृत्यूला समजून घे. ज्याला आयुष्य समजून घ्यायचे आहे त्याने दुःखाला मिठी मारायला हवी. जोपर्यंत दुःखाला जवळ बोलावणार नाहीस. तोपर्यंत जीवनाचा खरा अर्थ तुला समजणार नाही. नाहीतर तू रडत जन्माला येशील आणि रडतच निघून जाशील. गौतम बुद्ध म्हणतात जन्माचा जसा उत्सव आपण करतो तसा मृत्यूचाही उत्सव साजरा करता यायला हवा.

प्रत्यक्षात हे खूप अवघड असले तरी या गाण्यातल्या शब्दांचे अर्थ, भावना याचा वारंवार नव्याने विचार करून त्यातले सौंदर्य जाणून घेऊया.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)