लेख – इंडिया आणि भारत

>> अनिल वैद्य

भारताच्या संविधान सभेतील आपल्या देशाच्या नावाबाबतीत झालेली चर्चा वाचली तर ‘भारत’ व ‘इंडिया’ नावाला कोणत्याही सदस्यांनी विरोध केला नाही की ‘हिंदुस्थान’ नावाचा आग्रह धरला नाही, हे लक्षात येते. खरे तर ग्रीकांनी ‘इंडिया’ नाव दिले. सिंधू नदीच्या खोऱयात राहणाऱ्या लोकांचे ‘इंडोई’ (इंडस नदीच्या खोऱयातील लोक) असे नामकरण केले आणि म्हणून या हडप्पा संस्कृतीला नाव पडले ‘इंडस सिव्हिलायझेशन’. त्यावरूनच ‘इंडिया’ झाले. ब्रिटिशांनी हिणकसपणे ‘इंडिया’ नाव दिले हे म्हणणे बरोबर नाही.

भारताच्या राज्यघटनेच्या ‘अनुच्छेद एक’मध्ये देशाचे नाव ‘इंडिया’ म्हणजे ‘भारत’ असे नमूद केले आहे. संविधान सभेत विद्वान सदस्य होते. त्यांच्याच दूरदृष्टीने संविधान निर्माण झाले. म्हणून जगात लोकशाहीप्रधान देश म्हणून भारत ओळखला जातो. याच विद्वान सदस्यांनी ‘इंडिया’ हा शब्द दिला आहे. ब्रिटिशांनी वाईट अर्थाने वापरला असता तर संविधान समितीने हा शब्द स्वीकारलाच नसता, पण आज ‘इंडिया’ हा शब्द मागासलेले लोक म्हणून ब्रिटिश वापरत होते, असा चुकीचा प्रचार केला जात आहे.

‘इंडिया’ नावाच्या मुळाशी जाण्यासाठी सिंधू संस्कृतीबाबत थोडक्यात माहिती समजून घेऊ. सिंधू नदीच्या खोऱयात निर्माण झालेली सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. सर जॉन मार्शल यांनी याला हडप्पा संस्कृती असे संबोधले. इ.सन पूर्व 2500 मध्ये ही सभ्यता शिखरावर पोहोचली होती. सिंधू संस्कृती ही चीन संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृतीपेक्षा विकसित होती, असे मानले जाते. भारताच्या पुरातत्त्व विभागाला 1920 मध्ये सिंधू खोऱयातील उत्खननादरम्यान मोहेंजोदारो आणि हडप्पासारखी प्राचीन शहरे सापडली.

ही संस्कृती मूळ निवासी भारतीयांची संस्कृती आहे हे आधी लक्षात घेणे गरजेचे आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांचे म्हणणे की, ही संस्कृती मूळ निवासी भारतीयांची आहे. सिंधू नदीच्या काठी असलेल्या भागाला ब्रिटिश ‘इंडस व्हॅली’ म्हणत व आजही म्हणतात ‘इंडस’ हा लॅटिन शब्द आहे. त्यावरून ‘इंडिया’ नाव पडले.

‘भारत’ नावाबद्दल असे सांगता येईल की, ब्रिटिशांनी या देशावर राज्य केले. मात्र आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या आधीही पूर्वापार या देशाचे नाव ‘भारत’ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण?’ या प्रसिद्ध ग्रंथात लिहितात की, देशाला ‘भारतभूमी’ हे नाव पडले ते वैदिक काळातील ‘भारत’ लोकांमुळे.

या नावात विशिष्ट धर्म किंवा वंश यांचा देश म्हणून निर्देश होत नाही. अरब व युरोपियन लोकांनी सिंधू नदीच्या नावाचा उच्चार ‘इंडस’ केला व पुढे तो ‘इंडिया’ (India) झाला. हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते व युनोमध्येही इंडिया नावाची नोंद आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये या देशाला ‘भारत’ व ‘इंडिया’ (India) नाव दिले आहे. हे नाव ठरविताना संविधान सभेत चर्चा झाली, पण ‘इंडिया’ व ‘भारत’ नावाला कुणीही विरोध केला नाही. ‘हिंदुस्थान’ नावासाठी आग्रह धरला नाही. याबाबत संविधान सभेत झालेल्या चर्चेचा मागोवा घेऊ तो असा.

संविधान सभेत 15 नोव्हेंबर 1948 ला चर्चा झाली. संविधान सभेच्या विविध सदस्यांनी देशाला कोणते नाव द्यावे याबाबत प्रस्ताव मांडले. मौलाना हसरत मोहिनी यांनी ‘सार्वभौम स्वतंत्र गणराज्य’ किंवा ‘सार्वभौम लोकशाही गणराज्य’ असे वाक्य देशाच्या नावाला जोडण्याची सूचना केली. एम. अय्यंगार (मद्रास) यांनी ‘भारतवर्ष’ आणि ‘हिंदुस्थान’ हे नाव देण्यासाठी विचार करावा असे सुचविले. प्रो. के. टी. शाह (बिहार) म्हणाले की, ‘धर्मनिरपेक्ष’, ‘संघीय समाजवादी’ असे शब्द देशाच्या नावाला जोडा. प्रो. शिवनलाल सक्सेना यांनी देशाचे नाव ‘भारत’ असावे असा प्रस्ताव मांडला.

सर्व प्रस्ताव ऐकल्यावर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले मत मांडले ते असे. “महोदय, मी या सर्वच संशोधनांचा विरोध करतो. जोपर्यंत प्रथम संशोधनाचा संबंध आहे, त्याचा उद्देश असा आहे की, भारताला ‘संयुक्त राज्य भारत’ म्हणण्यात यावे. माझे मित्र कामत जे बोलले ते तर्कसंगत आहे आणि मी त्याचा सहर्ष स्वीकार करतो. मी ‘Union’ (संघ) शब्दाचा प्रयोग का केला आहे आणि ‘Federation’ (संघीय) शब्द का सोडून दिला यासंबंधात आपले विचार व्यक्त केले आहेत.’’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणाले की, “दुसऱया संशोधनासंबंधात, ज्याचा उद्देश असा आहे की, ‘India’ इंडिया (भारत)ला ‘Union of india’ इंडिया (भारताचा संघ) म्हणण्यात यावे.’’
संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य म्हणून याला इंडिया ‘India’ (भारत) म्हणूनच ओळखले जाते आणि सर्वच करारांवर याच नावाने हस्ताक्षर केले जाते.

भारताच्या संविधान सभेतील आपल्या देशाच्या नावाबाबतीत झालेली चर्चा वाचली तर ‘भारत’ व ‘इंडिया’ नावाला कोणत्याही सदस्यांनी विरोध केला नाही की ‘हिंदुस्थान’ नावाचा आग्रह धरला नाही, हे लक्षात येते. फक्त कुणी म्हटले ‘समाजवादी भारत’ म्हणा तर कुणी म्हणाले, ‘सार्वभौम भारत’ म्हणा एवढेच.

‘इंडिका’ ग्रंथ लिहिणारा मेगॅस्थेनिस हा एक ग्रीक इतिहासकार आणि मुत्सद्दी होता. (इ.सन पूर्व चौथ्या आणि तिसऱया शतकात) मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेला प्राचीन भारतातील प्रवास आणि निरीक्षणे यांचे तपशीलवार वर्णन असलेला ‘इंडिका’ या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृती, समाज आणि भूगोल याविषयी माहिती देणारा मेगॅस्थेनिसचा ‘इंडिका’ हा महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. ‘इंडिका’मध्ये इंडस व्हॅलीत राहणाऱया लोकांची म्हणजे सिंधू नदी व संस्कृतीच्या लोकांची माहिती मिळते. ‘इंडिका’वरून ‘इंडिया’ झाले आहे. ‘इंडिया’ शब्दालाही ऐतिहसिक महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहेजे. ‘इंडिया’ या नावात सिंधू संस्कृतीचा अभिमान दडलेला आहे. तेव्हा ‘भारत’ व ‘इंडिया’ दोन्हींचे महत्त्व सारखेच आहे.

खरे तर ग्रीकांनी ‘इंडिया’ नाव दिले. सिंधू नदीच्या खोऱयात राहणाऱया लोकांचे ‘इंडोई’ (इंडस नदीच्या खोऱयातील लोक) असे नामकरण केले आणि म्हणून या हडप्पा संस्कृतीला नाव पडले ‘इंडस सिव्हिलायझेशन’. त्यावरूनच ‘इंडिया’ झाले. ब्रिटिशांनी हिणकसपणें ‘इंडिया’ नाव दिले हे म्हणणे बरोबर नाही.

(लेखक निवृत्त न्यायाधीश आहेत.)