
>> अंजली सतीश केऱहाळकर
मी आदिमाया… जगदंबरूपा… पार्वती… आज माझ्यातून मी बाहेर पडतेय एक वसा घेऊन! उंबरठय़ातून पाऊल पहिलं आत टाकते अन् समृद्धीचं माप ओलांडते. कुंकवाच्या पाऊलखुणा घेऊन आत घरात प्रवेशते. त्या लाल पाऊलठशांनी घरभर फिरते. आता मी त्या घरातली लक्ष्मी असते. सगळीकडे वावरत त्या घरातलीच एक होते. सभोवती अनेक नात्यांचा गोतावळा घेऊन, मेंदीभरल्या तळव्यात आयुष्याचा हिशेब घेत घेत फुलारत जाते. हसण्या-बोलण्याचे तोल सांभाळत सांभाळत सगळय़ांना आपलंसं करते. सांभाळताना कितीतरी ऋतू न्याहाळते. प्रत्येक महिन्यातले सण, उत्सव साजरे करते अन् करेन… कारण मीच हा चेहरा दिलाय प्रत्येक स्त्रीला!
प्रत्येक मासातला उत्सव हरप्रकारे वेगळाच. माझ्यावर मात्र जबाबदारीच. एक यात्राच सुरू होते म्हणा ना! चैत्र झंकारत येतो प्रतिपदेपासून. साऱया उत्साहाची, वसंतासवे कोकीळकुजनाची पहिली साद आली की मग उधाणत येतो नूतन पालवीचा छान कोवळ सोहळा! घमघमत राहतो मनामनात. श्रीरामांची निष्ठातपाची, आदर्शाची मांडणी रचतच हा उत्सव प्रारंभ होतो. माझ्यातली जानकी सुखावली! मीही जानकी होऊन रमून जातेय साऱयात. तोवर उन्हाची काहिली वाढतेय न् वाढतेय तोच ज्येष्ठात सावित्रीचा वसा उभारतो. जन्मसावित्री होऊन वट पुजते… मी सावित्री होऊन दीर्घायुष्य देते पतीला अन् मग चाहुल देतो आषाढ. तो जन्मतो आणि सुरू होतात जलधारांचे तुडुंब संवाद. या वर्षासंवादातल्या मेघशामल पाऊस अन् वादळवाऱयाच्या पलीकडून हलकासा हिरव्या छटेतला दिलासा मिळतो तो श्रावणाचा हसरा नाचरा आविर्भाव सळसळत राहतो. मग मात्र माझी तारांबळ उडते.
श्रावणी सोमवारची महादेवाची विल्वा होऊन आसमंतात फिरत नाही तोच माझा आवडता सोहळा समोर येतो. मी गौरी होते. सर्व सख्यांची मी मंगळागौर होते. पुनः पुन्हा घरातल्या मायेच्या माणसांसमवेत पैंजणांची नाजूक बोली घरभर फिरत राहते. घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ होतो. आदल्या रात्रीच तळव्यावर मखमल मेंदी रेखली जाते. कौतुकाची नक्षी, नक्षीत नाजूकपणे लिहिलेलं पतीचं नाव… सारं कसं सुख लपेटलं जातं. खरं तर या सोहळय़ाची सुरुवात खूप आधीपासूनच झालेली असते. माझ्यासमवेत पूजेला बसणाऱया नवविवाहित सवाष्णींना आषाढातच आमंत्रण देऊन बांधून घेतलेलं असतं. नात्यातल्या सर्व स्त्रियांच्या लगबगीला उधाण आलेलं असतं. मी त्याच उत्साहात मग्न असते. माहेरचं मातृसुख आदल्या दिवसापासूनच माझ्या ताब्यात असतं. तिच्या कौतुकाच्या नजरेत माझ्या सुखासाठी भरती आलेली असते. मंगळागौर पूजनाचे सगळे टप्पे यथासांगपणे अनुभवायचे असतात; पण या पूजनाचं मर्म हेच की, महादेव अन् पार्वतीचं प्रगाढ नातं सर्वच आदर्श मानतात. त्या आदर्शाचं स्मरण या समस्त स्त्रीजातीला करवून देणे, दांपत्य जीवन सुखी होणे, त्या सुखी जीवनातले सारेच चढउतार सहजीवनाने, साहचर्याने पार पडावेत म्हणून बळ, धैर्य मागणे हेच हेतू असतात. सलग पाच वर्षे श्रावण मंगळवारी प्रत्येक सुवासिनीने हे व्रत करायला हवं. त्यानंतर उद्यापन करून आईला हे वाण द्यायचं. या रिवाजामुळे मंगळागौर सासर-माहेर जोडून ठेवते. इथे माझ्यातली उमा वैभवी होते.
वैभवी उमेच्या त्या माझ्या मखरात सुवर्णलक्ष्मी अंतर्भूत झाली आणि मंगळागौर आटोपत नाही तोच माझी आराधना सुरू झाली. ज्येष्ठ गौर म्हणून नामाभिधान झालं. घराघरात स्वागताची तयारी सुरू झाली. लगबग, गडबड, गृहलक्ष्मीची पावलं थिरकतात अशा वेळी! तयारीही किती निगुतीने होते. म्हणता म्हणता दिवस राहिले बोटावर मोजण्याइतके! महालक्ष्मीसाठी जरीकाठाच्या साडय़ांची खरेदी झाली, तिच्यासाठी दागिने काढून ठेवले. आजघर-माजघर स्वच्छ करून घेतलं. अन् मग फुलोरासाठीचे पक्वान्न करायला घेतले. सगळं मनासारखं व्हायला हवं यासाठी अन् या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी भगिनींना माहेराचं सुख लाभावं म्हणून जिवाची तगमग. विविध पदार्थांचा दरवळ सुटला घरात. सुगंधाच्या त्या लाटांवर स्वार होऊन अन्नपूर्णा पाठीशी उभी राहिली. लाडू, शंकरपाळे, सांजोऱया, करंज्या, तिखट पुऱया, गोड पुऱया, एक ना अनेक! करणारे हात मदतीत सढळपणे पुढे झालेले असतात. कौतुकाची ती गौर… तिच्यासाठी ही सगळी रचनाच मनाला उत्सर्जित करत असते.
हा सोहळा, हा उत्सव घराघराला नांदतं ठेवतो, लेकी-सुनांसहित बाळांना भरभरून आशीर्वाद देतो… आणि उजाडला तो दिवस. तिच्या स्वागताची जंगी तयारी. मखर, महिरप, फुलांच्या राशी, धान्याच्या राशी, चांदीची उपकरणं, अनेक भाज्या, फळं यांची हिरवी, रंगीत रांग. मी तर चहुबाजूंनी या उत्साहात लगडलेली होते. किती व्यापक स्वरूप आहे हिचं, मनातूनच एक शांत समई तेजाळत होती. उंबरठा धुतला. त्यावर कुंकू- हळद लावून ठेवलं. देवघरात चौरंगावर महालक्ष्मीचे मुखवटे.. प्रसन्नपणे बघत होते. घरातली लहान मुलं झांजा, टाळ घेऊन आपल्याच तालासुरात सिद्ध झाली. रांगोळीने पावलं रेखली, त्यात कुंकू मागे हळद पुढे घातली. शेजघरात चंदन उमटवलं. अन मग जेष्ठा-कनिष्ठा यांचे मुखवटे चांदीच्या ताम्हणात घेऊन बाहेरून प्रवेशत्या झाल्या. झांजा, टाळ यांचा खणखणाट अन् महालक्ष्मीचं स्वागत करायला सगळे कुटुंबीय उत्साहात समोर आले. आज्जे सासुबाई म्हणाल्याच, ‘माहेरवाशिणी येताहेत. त्यांनी समृद्धीचा वसा द्यायला हवाय ना? वर्षातून एकदाच येतात हो त्या. प्रसन्न ठेवा त्या लेकींना’ उंबऱयावर त्यांचं औक्षण केलं अन् मग हळदपावलांनी कुंकू रेखलेल्या तळव्यांनी दोघी दोन दिशांनी घरभर फिरल्या. प्रसन्नचित्त होऊन दंग झाल्या. तिने विचारलं, ‘इथे काय?’ मी म्हणाले ‘विद्या, धन, वस्त्र, अन्नपूर्णेचा वास सगळं आहे.’ ती म्हणाली ‘अजून उदंड होवो…’ दोघी पाटावर तांदळाचं माप ओलांडून बसल्या. समाधान पावल्या.
त्या दोघींना साडी नेसवली. दागिने चढवले साजशृंगारात रमून गेले. अन् मज थकल्या लेकींना रात्री शांतवत ‘निज गं आता’ म्हणून घर निद्राधीन झाले.
दुसऱया दिवशी पहाटेपासून पुरणावरणाचा स्वयंपाक, आंबील, सोळा भाज्या, सोळा चटण्या, कोशिंबिरी वडे, घारगे असा उत्तम सुग्रास पक्वानांनी स्वयंपाकघर दरवळत राहिलं. अन् गौरीची साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा केली. सोबत बाळं होतीच. अत्यंत तेजस्वीता मुखावर तिच्या झळकत राहिली. तिचं भोजन करवलं. सारं घर तृप्त झालं. गौरीने तोंडभरून आशीर्वाद दिले. ‘सगळं उदंड उदंड असो.’ मी तर लखलखत राहिले. माझ्यातली लक्ष्मी प्रसन्न झाली. हळदीकुंकू समारंभ कसा झोकात पार पडला. फुगडय़ा किती खेळल्या लेकी! प्रसन्न शिंपण करत करत. निघण्याची वेळ झाली अन् ग्लान मुखाने आम्ही म्हणालो, ‘पुढच्या वर्षी लवकर ये हो!’
ती निघाली… साऱयांना भरभरून आशीर्वाद देत, दहीभात ग्रहण करून! तिचं पाऊल उंबरठय़ावर टेकलं… हळदीकुंकवाची तिची पावलं मात्र तशीच राहिली, खुणा जोजवत. आमच्या डोळय़ात पाण्याचा थेंब उभा राहिला. मी लेक होते. माझ्यातली माहेरवाशीण समाधानाने हसत राहिली…




























































