मुद्दा : शिक्षक संयमी नक्कीच असावा

63

>> अंकुश शिंगाडे

दिवसेंदिवस मराठी शाळेला उतरती कळा लागलेली आहे. त्यातच बहुतांश लोक त्यासाठी शिक्षकाला दोष देऊन मोकळे होताना दिसतात. वास्तविक विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी योजलेले सारे उपाय फोल ठरत आहेत. त्यासाठी सगळेच दोषी आहेत. त्यात शिक्षकही आलेच. मात्र त्यांना कोणी काही बोलले तर राग येतो, पण आपल्याला लोक तसे का बोलतात याचा विचार मात्र ते करीत नाही. मुळात हा शिक्षकी पेशा चांगला असला तरी या पेशाला काही लोकांनी बदनाम केले आहे. या गुणवान शिक्षकाला लाचार बनवले आहे. चांगल्या शिक्षकाची आज इज्जत नाही, मात्र जे चापलूस असतात त्यांची मात्र आज इभ्रत आहे.

शिक्षक कसा असावा? या दृष्टिकोनातून आपण विचार केल्यास सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक संयमी नक्कीच असावा. कारण संयम ही शिक्षकांना आनंद देणारी महत्त्वाची गोष्ट आहे. खऱया शिक्षकाला पदोपदी जो त्रास होत असतो तो त्रास एवढा मोठा असतो की, त्या शिक्षकाचा तोलही जाऊ शकतो. अशा वेळी शिक्षकाला वाचवू शकतो तो त्याने संयमच. तसेच विद्यार्थांप्रति कर्तव्यनिष्ठ असलेच पाहिजे.

मी बरेच शिक्षक असे पाहिले की, शाळेची वेळ जर साडेदहाची असेल तर ते शिक्षक साडेअकराला येतात. त्यांना वेळेचं तारतम्य नसतं. पण हे लक्षात ठेवायला हवं की, एखादा मुलगा जर रोज शाळेत उशिरा येत असेल तर आपण टोकतोच ना. मग शिक्षकांनी वेळा का पाळू नयेत? त्या वेळाही पाळायलाच हव्या. चोरी करू नये, सत्य बोलावे, हिंसा करू नये, दारू पिऊ नये, गुलामी सहन करू नये, विडय़ा फुंकू नयेत, पानठेल्यावर जाऊ नये, वडीलधाऱयांचा अपमान करू नये हे आपण सतत विद्यार्थीवर्गाला सांगत असतो. स्वतः मात्र कोरडय़ा पाषाणागत खोटे बोलतो. विद्यार्थी पावसाच्या काळात गैरहजर असेल तरीही खिचडीचं बिल जास्त निघावं म्हणून विद्यार्थी शाळेत न येऊनही त्याची हजेरी लावली जाते. आमचं लहानपण आम्हाला जेव्हा आठवतं, आमच्या लहाणपणी शिक्षक नक्कीच होते. पण त्यांचं विद्यार्थ्यावर अतोनात प्रेमही होते. ते आमच्यावर आपल्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करायचे. स्वतःच्या मुलांना जास्त शिकविणार नाहीत. पण त्याहीपेक्षा ते जास्त आम्हाला शिकवीत होते. आमच्यासाठी राबत होते. आमच्यापैकीच काही आजही ऑफिसर बनलेत. आज मात्र तसे होत नाही. आज शाळेतील मुले कारकुनी करतात आणि आमची मुले ऑफिसर बनतात. मग आम्ही आदर्श कशावरून? खरं पाहिल्यास ते आदर्श होते म्हणून शिक्षक आज आदर्श आहेत. कारण त्यांच्यात स्वार्थ नव्हता. आम्ही मात्र स्वार्थी आहोत. आम्हाला फक्त वेतन घेणं समजतं, पगारवाढ झाली पाहिजे हेही समजते, पण विद्यार्थ्यांना शिकवणं समजत नाही हे आजच्या आमच्या विद्यार्थ्यांवरून दिसून येते. आजचे आमचे विद्यार्थी हमखास शिकवणी वर्गाला जातात. शाळेत शिकविण्याची सोय असून तसेच शाळेत इंग्रजी विषय पहिलीपासून असूनही.

खरं म्हणजे सर्वच शिक्षक वाईट नाहीत. अनेक चांगले आहेत. मुळात शिक्षकांत चांगुलपणा असतोच. शिक्षक जेव्हा कामावर रुजू होतो तेव्हा आदर्श विद्यार्थी घडवू याच उद्देशाने रुजू होतो. पण शिक्षकांनाही जगण्यासाठी जी वीतभर पोटाची खळगी दिली आहे त्यासाठी शिक्षकांना अनेकदा विवश होऊन अनेक शिक्षणबाह्य गोष्टी कराव्या लागतात. अपवाद वगळता शिक्षक बिघडलेले नसतातच मुळी. त्यांना बिघडवले जाते. त्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. मजबुरीमुळे व पोटाच्या वीतभर खळगीसाठी शिक्षक शाळेतल्या सत्ताधाऱयांचे गुलाम होतो. राष्ट्राच्या उभारणीसाठी चांगल्या शीलवान, चारित्र्यवान शिक्षकांची गरज आहे. अशा शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडेल आणि विद्यार्थ्यांसोबत देशही घडेल. अर्थात त्यासाठी शिक्षकाने स्वतः संयम कसा ठेवावा हे शिकणे आणि शिकवणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या