स्वत्त्व अन् आरोग्याची काळजी

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

चूल आणि मूल या संकल्पना कधीच कालबाह्य झालेल्या आहेत आणि आजची स्त्री उंबरठा ओलांडून कधीच घराबाहेर पडली आहे. स्त्री आणि पुरुषात आज सामाजिक बदल फार कमी राहिलेला आहे. दोघेही शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात बरोबरी करत आहेत. पूर्वी केवळ पुरुषांची मक्तेदारी म्हणून मान्यता पावलेले व्यवसायदेखील स्त्रिया यशस्वीरीत्या करून दाखवत आहेत.

स्त्रीने घराबाहेर पडावे आणि कामे करावीत यात अनेक हेतू असू शकतील. पैसे मिळवून पतीला हातभार लावणे हा एक भाग असला तरी त्याहीपेक्षा जास्त स्वतःचे स्वत्व जपणे हा प्रमुख भाग बनत चालला आहे असे मला वाटते. केवळ गृहिणी, माता आणि कोणाची पत्नी अशी आपली ओळख यात आजची स्त्री समाधानी नाही. तिला स्वतःला शोधायचे आहे.

आजची स्त्री जी बाहेर काही तरी करू इच्छिते, पण तिचे लक्ष मात्र आपल्या घरटय़ाकडे आणि पिलांकडे लागलेले असते. या तारेवरच्या कसरतीत बरेचदा इतरांची काळजी घेता घेता मात्र ती हवालदिल होऊन जाते. तिच्या अनेक हौशी मौजी, आराम करणे, मनात कधीतरी ठरवून ठेवलेले शॉपिंग करणे, एखादे मनात दडलेले पुस्तक वाचणे, जुन्या मैत्रिणींना भेटायचे राहून जाते. खूप काही मनातच दडवून ती हसतमुखाने अनेक बाबींना तोंड देत असते. अनेकदा स्त्री या सर्व गोष्टी खूप सकारात्मक पद्धतीने हाताळते असे मला वाटते.

या सर्व व्यवस्थापनामध्ये तिचे आरोग्य व्यवस्थापन मात्र ढासळू शकते. अनेकदा स्त्रिया आपले शल्य मनातच ठेवतात, कुणालाही काही सांगत नाही. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर नक्कीच होत असतो. काहीही त्रास होत नसताना, अगदी मेडिकल तपासणी होऊनही सर्व काही ठीक असताना काही बायका अचानक हृदयविकारच्या तीव्र झटक्याच्या शिकार होतात. काही वेळा अचानक पडलेले काम, तणाव, जीवनात झालेला बदल यामुळे थायरॉईडसारख्या व्याधी होतात. सगळय़ात कहर होतो तो म्हणजे ज्या वेळी घरातील पुरुषाला मधुमेह, रक्तदाब अशा व्याधी होतात त्यावेळी त्याच्या दवापाण्याची, आहाराची काळजी  स्त्रीने घेणे अपेक्षित असते तेच उलट झाले तर तिची काळजी मात्र तिलाच घ्यावी लागते. घर आणि बाहेर यात अनेकदा भरडली गेल्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ ती कधीच काढू शकत नाही.

स्त्रीने जर मनावर घेतले तर यातून उत्तम मार्ग निघू शकतात. स्त्रीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता व्हायला हवी.  स्रियांमध्ये  आपले आरोग्य हे आपला हक्क आहे, अशी योग्य भावना जागरूक व्हायला पाहिजे.

आपले घर आणि काम सांभाळताना

स्त्रीने काही गोष्टी नक्की रुजवायला हव्यात

  1. वेळेचे योग्य नियमन करणे.
  2. सकारात्मक भूमिका ठेवणे.
  3. नकारात्मक भावना जसे की राग, मत्सर यांना आयुष्यात थारा न देणे.
  4. घरातील इतर लोकांना घरातील छोटय़ा मोठय़ा कामात सामील करणे, मुख्य म्हणजे त्यांच्यावर विश्वास दाखवणे, जेणेकरून आपला भार तर हलका होईल आणि तेही स्वतंत्र बनतील.
  5. घरातील सर्वांनाच योग्य आहार आणि व्यायाम याचे बाळकडू जर लहानपणीच पाजले तर केवळ घरातील तिच्यासकट सर्वांचेच आरोग्य उत्तम राहायला मदत होईल.
  6. स्वतः तिने योग्य व्यायाम आणि आहार याची जोड आयुष्यात ठेवायला हवी, यासाठी वाचनातून माहिती मिळविणे, तज्ञ लोकांची मदत घेणे असे उपाय करता येतील.
  7. रोज 10-15 मिनिटे प्राणायाम, ध्यान याने मन खूप शांत राहू शकते.
  8. महत्त्वाचे म्हणजे आपला आत्मविश्वास जागरूक ठेवा आणि आपले म्हणणे, आपल्या योग्य गरजा आपल्या वरिष्ठ लोकांसमोर आणि घरातील लोकांसमोर मांडायला मागे पुढे पाहू नका.
  9. जोपर्यंत आपले काम आणि घर यामध्ये योग्य समतोल ठेवून आपले स्वत्व आणि आरोग्य याची काळजी स्त्राrला स्वतःलाच घ्यायला हवी.