नवलच! शब्द : छोटे-मोठे!

>> अरुण

सूक्ष्म आणि विराट, मायक्रो आणि मॅक्रो, लघुतम आणि महत्तम. काहीही म्हटलं तरी अर्थ एकच. विश्वात अनेक गोष्टी अतिसूक्ष्म आहेत तर काही अतिविराट! सर्न पर्टिकल कोलाडरमध्ये निमिषार्धापुरता आढळलेला सूक्ष्म कण ‘हिग्ज बोसॉन’ आणि विश्वाची विराटता नेमकी किती याचा अथांग पसारा. सूक्ष्मातूनच विराटता जन्मते असं आपल्या सूर्य-पृथ्वीसकट सर्वांच्या आणि विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत ‘बिग बॅन्ग’ सांगतो.

…आणि या सूक्ष्म-विराटतेचं प्रतिबिंब पृथ्वीवरच्या सजीव-निर्जीव सृष्टीतही दिसतं. त्यात आपलाही समावेश असतो. अशा काही नैसर्गिक, कृत्रिम आणि जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमधली भन्नाट गंमत जाणून घ्यायचा प्रयत्न करू या. या गोष्टींपैकी अनेक ‘आक्रीत’ (वैचित्र्यपूर्ण आश्चर्य) वाटाव्या अशा असतील. पण गेल्या 50 वर्षांत वाचता वाचता नजरेत आलेल्या आणि वैशिष्टय़पूर्णतेमुळेच लक्षात राहिलेल्या अशा अनेक गोष्टींमध्ये काही आशयही दडला असल्याचं लक्षात येईल.

जगातल्या सर्व भाषा हे मानवी समूहांचं परस्परांशी संपर्क साधण्याचं एक महत्त्वाचं साधन. तसं तर खाणाखुणांच्या भाषेतूनही संदेश पोहोचवता येतो. मूकबधिरांसाठीची वेगळी भाषा विकसितही झालेली आहे. परंतु सर्वसामान्य लोक आपापल्या भाषेत जीवनाचे थोडय़ाफार फरकाने तसेच व्यवहार करत असतात. फक्त शाब्दिक अभिव्यक्ती वेगळी. आता अगदी छोटे नि मोठे शब्द कसे, तर मराठीतला ‘श्री’ हा एकाक्षरी शब्द. त्याचा अर्थ गणपती किंवा विद्या, संपत्ती, आरंभ इत्यादी. शिवाय ‘भू’ म्हणजे जमीन. ‘ख’ म्हणजे विराट अवकाश. मोठे शब्द म्हणजे अनेक शब्दांचा संधी. जसं- कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ म्हणजे कृतान्त अर्थात यमाच्या कटक म्हणजे सैन्याच्या, ‘अमल ध्वजा’ म्हणजे शुभ्र निशाण आणि ‘जरा’चा अर्थ म्हातारपण. डोक्यावरचे केस पिकून वृद्धत्व आलं असा सोपा आशय. इंग्लिशमधला ‘आय’ म्हणजे मी हा एकाक्षरी लहान शब्द तर फुप्फुसाच्या दाहाविषयीचा आजार म्हणजे ‘न्यूमोनो अल्ट्रामायक्रोस्कोपिक सिलिकीव्होल्कॅनो कॉनिऑसिस’ यात 45 अक्षरे आहेत आणि 1935 मध्ये एका वैद्यकीय परिषदेत हा शब्द तयार केलेला आहे.

(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)