मांगल्य व पावित्र्याचा आविष्कार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण मळेकर

महाराष्ट्रात मंदिर वास्तूमधील दीपमाळ एक प्रचालित बांधकाम घटक. दीपोत्सव साध्य करण्यासाठी उभारलेले हे स्तंभच. वास्तविक त्याला कलापूर्ण स्थान नाहीच…

मंदिर वास्तूचे दर्शन घेताना त्यातील मूर्ती, बांधकाम, कलाकुसरीचे शिल्पकाम, प्रांगण यावरच आपले लक्ष केंद्रित होते, पण मंदिर वास्तू चित्ताकर्षक करून त्याच्या सौंदर्यासह मांगल्यात भर टाकणाऱया मंदिराच्या दर्शनी भागी उभारलेल्या दीपमाळेकडे आपण हवे तसे लक्ष देत नाही, पण दीपमाळ हासुद्धा मंदिर वास्तूचा एक अविभाज्य घटक असल्याने त्याला इतिहासाबरोबर सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असे अनन्यसाधारण मोल आहे…

आपल्या देशाला इ. स. पूर्वकाळापासूनची प्राचीन संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. त्याच्या पाऊलखुणा तथा मापदंड दर्शवणारे जे घटक आहेत त्यात विविध प्रकारच्या वारसा वास्तूंची संख्या खूपच मोठी आहे. त्यातील सर्वाधिक वास्तूंना धार्मिक अधिष्ठानाचे कोंदण आहे. देशातील बऱयाच मंदिरे, प्रार्थनास्थळ वास्तूंवर त्या त्या प्रांताच्या संस्कृतीची मोहर उमटलीय. त्यामधील काही मंदिर वास्तूंवर जागतिक पातळीवरील वारसा वास्तूची मोहोर उमटली आहे.

दर्शक, भाविक कोणत्याही मंदिर वास्तूचं दर्शन घेताना त्यातील मूर्ती, गाभारा, प्रांगण, सभोवतालचे शिल्पकाम हे पाहूनच समाधान मानतो, परंतु कोणत्याही मंदिरात प्रवेश करताना त्या मंदिराच्या उपजत वास्तू वैभवात भर घालून आपलं स्वतंत्र अस्तित्व जोपासणाऱया दर्शनी तथा प्रवेशद्वारी उभ्या असलेल्या दीपमाळेकडे फारसे लक्ष जात नाही, पण भाविकांचं मूकपणे स्वागत करणाऱया प्रवेशद्वारातील दीपमाळा हा तर मंदिर वास्तूच्या सौंदर्याचाच एक प्रमुख घटक आहे आणि त्याला इतिहासाबरोबर प्राचीन सांस्कृतिक मोलही आहेच.

आपल्याकडे मंदिरातील दीपप्रज्वलनाला पावित्र्याबरोबर मानवी जीवनातील अंधःकार नाहीसा करणारा हा विचार अभिप्रेत आहे. याच हेतूने मंदिरातील दीपमाळेला पावित्र्याचं स्थान देण्याचा प्रयत्न पूर्वापार चालत आलाय. म्हणूनच दिव्याची आरास उभारण्यासाठी या दीपमाळा मंदिर वास्तू कलाकृतीतील स्थापत्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. देशातील सर्वच प्राचीन मंदिरात दीपमाळा आढळतात. त्यांचे बांधकाम दगडी, दंडगोलाकार असून जमिनीकडील भाग रुंदीला विस्तृत असून वरील भागी निमुळता होत गेलेला आढळतो. या बांधकामावर दिवे, पणत्या, मेणबत्त्या लावण्यासाठी सर्व बाजूंनी ठरावीक अंतरावर हस्त निर्माण केले जातात.

कोणत्याही मंदिराच्या आवारातील प्रवेशद्वारी दीपमाळा आपलं लक्ष वेधून घेतात, पण त्याचे प्रभावी अस्तित्व जाणवते ते तर रात्रीच्या प्रहरी. जणू काही आमच्या जीवनातील अंधकार नाहीसा करून प्रसन्न वातावरणाची भाविक, दर्शकांवर अनामिक मोहिनीच पडते.

पुणे जिल्हय़ातील चास गावातील सोमेश्वर मंदिर प्रांगणातील भलीमोठी दीपमाळ हे त्याचे बोलके उदाहरण आहे. सुमारे दोनशे पन्नास दिवे लावण्याची व्यवस्था या दीपमाळेवर साकारली गेली आहे. दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री ही दीपमाळ जेव्हा शेकडो दिव्यांनी उजळून निघते तेव्हा दूरवरूनसुद्धा हा अलौकिक दीपोत्सवाचा नजारा नेत्रदीपक भासतो.

महाराष्ट्रात मंदिर वास्तूमधील दीपमाळ एक प्रचालित बांधकाम घटक. दीपोत्सव साध्य करण्यासाठी उभारलेले हे स्तंभच. वास्तविक त्याला कलापूर्ण स्थान नाहीच, त्यांच्या बांधकामातून कोणतीही कलाकृती साकारण्याला वावही नाही. आपल्याकडे बऱयाच दीपमाळा दहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत. त्यांच्या आकारमानातही एकसूत्रीपणा जाणवतो. दीपमाळ बांधकामात लंबगोलाकारपणासह वरचा भाग निमुळता होत जाणारा आढळतो.

परंतु काही मंदिरांतील दीपमाळा षटकोनी व अष्टकोनी आढळतात. हे वैशिष्टय़ साधताना प्राचीन वास्तुरचनाकारांनी निश्चितच भूमिती शास्त्र्ााचा आधार घेतलाय. बऱयाच दीपमाळा जमिनीच्या पृष्ठभागावर उभारण्यात तर काही दीपमाळांचे बांधकाम उंची साधण्यासाठी भक्कम चौथऱयावर त्यांची उभारणी केली गेली. दीपमाळ हा बांधकाम प्रकार अस्तित्वात येण्याआधी मंदिराच्या प्रवेशद्वारी उंच जागी दिवे प्रज्वलित केले जायचे. त्यासाठी मजबूत दगडी खांब उभारून ठरावीक अंतरावरील खाचेत कापूर तसेच अन्य ज्वालाग्रही पदार्थांच्या सहाय्याने दीप प्रज्वलित केले जात. अशा प्रकारचे दगडी स्तंभ दक्षिण प्रदेशातील प्राचीन मंदिरात आजही आढळतात. असल्या स्तंभांनाच ‘दीपदंड’ नावाने संबोधतात.

दीपमाळ बांधकाम निर्माण होण्याआधीपासून दक्षिणेत प्राचीन मंदिरातून दीपलक्ष्मीचे अनेक प्रकार आजही आपले स्थान राखून आहेत. त्यातील काही धातूच्या असून तर काहींची निर्मिती दगडातील कोरीवकामातून साकारली आहे. याशिवाय दक्षिण प्रदेशात दीपप्रज्वलनासाठी धातू आणि दगडांच्या समया म्हणजे दीपमाळ प्रकार अस्तित्वात येण्याआधीचा प्रकार समजला जातो. यातील काही समया दहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या असून तर काही समयांना वृक्षांच्या आकारात साकारून त्यांचे सौंदर्य खुलवले आहे.

आपल्याकडे शिलाहार – यादवकालीन निर्माण झालेल्या मंदिरातून दीपमाळ प्रकार आढळत नाही. इतिहासाचा मागोवा घेताना तेराव्या शतकानंतर इस्लामी आक्रमणामुळे त्यांच्या प्रार्थनास्थळातील ‘मिनार’ वास्तुशिल्पाच्या प्रभावातून दीपमाळेचे बांधकाम, स्थित्यंतरातून अस्तित्वात आले असावे असेही समजले जाते.

महाराष्ट्रातील शिवाच्या तसेच देवी मंदिरासमोर दीपमाळा आढळणारच. पुणे जिल्हय़ातील प्रख्यात जेजुरी खंडोबा मंदिराकडे दोन्ही बाजूकडील शेकडो दीपमाळांची मानवंदना घेत घेत आपण मंदिर प्रांगणात पोहोचतो. महाराष्ट्रात पेशव्यांच्या अमलाआधी दगडी दीपमाळाबरोबर विटांच्याही बांधकामाच्या दीपमाळा आढळतात. त्याची रचनाही पूर्वापारच्या दीपमाळांसारखी आहे. मात्र या दीपमाळेचे बांधकाम साकारताना त्या आतून पोकळ असून वरील भागाकडे जाण्यासाठी नागमोडी स्वरूपाचा जिना ठेवत, पण असले दीपमाळ बांधकाम अगदीच अत्यल्प आहे.

प्राचीन दगडी मंदिर वास्तूंसाठी मराठवाडा भूमी मशहूर आहे. येथील मंदिर वास्तू प्रांगणातील दीपमाळांनी मंदिर शिल्प वैभवात भर घातली आहे.

मंदिर वास्तू प्रांगणातील सभोवतालची भक्कम तटबंदी, त्याच्या भिंतीवर चितारलेली धार्मिक अधिष्ठानाची चित्राकृती, शिल्पकला, वेगवेगळय़ा कलापूर्ण मूर्ती, त्याला लाभलेले देवालय स्वरूपाचे कलाकृतीपूर्ण कोंदण हे जसे मंदिराचे सौंदर्य, वैभव वृद्धिंगत करतय तसेच स्थान खचितच दीपमाळ बांधकामाला आहे. इतकेच नव्हे तर दीपमाळ ही त्या त्या मंदिराचा अविभाज्य घटक आहे, पण हे पाहण्याची एक नजर लागते.

– [email protected]