निसर्गभान – ऋतुबदलांचा निसर्ग सोहळा

>> अरुणा सरनाईक

उत्सवाचा आनंद प्रत्येक ऋतूच्या सरत्या काळामध्ये आणि प्रारंभीच्या काळामध्ये अनुभवावा. हा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा निश्चितपणे मोठा असतो. तो आपल्याला निरागस, निर्मळ सुख देतोच; शिवाय जीवनसत्त्वाची ऊब देत असतो. सरत्या आणि उभरत्या प्रत्येक ऋतूचा एक एक दिवस आपल्या मनाशी जपा आणि मग बघा, त्याच्या निरोप घेण्यामध्ये आणि आपल्या आयुष्यात तो येण्यामध्ये फारसा फरक नसतो. तो एकसारखा असतो. निरोप घेताना जितका आनंदी, तितकाच स्वागत करतानाही तो आनंदी असतो. कुठेतरी तो कृष्णाच्या गीतेशी संलग्न आहे. तो आपल्याला वारंवार सांगत असतो ‘देता किती घेशील दो करांनी’ असा त्याचा अविर्भाव असतो.

एवढय़ातच पौष संपला. तेसुद्धा निसर्गाकडूनच कळतं. जोरदार असलेल्या वाऱ्याचा वेग आता हळूहळू मंदावतो, पण त्याच्यात असलेला नाचरेपणा मात्र मंद झाला तरी तिथेच असतो. अंगणातल्या पिकल्या पानांचा निरोप घेणं आता संपायच्या मार्गावर आहे. कारण झाडाच्या टोकांवर आता लय दिसू लागली आहे. कोवळी पोपटी रंगाची पालवी झाडांच्या टोकाशी बिलगलेली दिसून येते. तिच्याकडे पाहून एखाद्या नवजात शिशूच्या कोवळय़ा जावळाची आठवण येते. हे सारं सरत्या पौषाचं वैभव देखणं असतं.

निवांत दुपारच्या वेळी शांतपणे बसावं आणि आजूबाजूचा निसर्ग निरखावा. निसर्ग किती बोलका आहे याची प्रचीती घ्यावी. हा उत्सवाचा आनंद प्रत्येक ऋतूच्या सरत्या काळामध्ये आणि प्रारंभीच्या काळामध्ये अनुभवावा. हा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा निश्चितपणे मोठा असतो. तो आपल्याला निरागस, निर्मळ सुख देतो. शिवाय जीवनसत्त्वाची ऊब देत असतो. एखाद्या कलत्या दुपारी म्हणजे दुपार जेव्हा संध्याकाळमध्ये परावर्तित होते तो काळ अतिशय अलवार असतो. वातावरणात सगळीकडे एक निशब्द भाव थांबलेला असतो. कोणाची तरी वाट बघण्याचा हा काळ असतो. तो कोणाची वाट बघतो, हा प्रश्न तुम्ही स्वतलाच विचारा. येणाऱ्या ऋतूच्या स्वागतासाठी तो थांबलेला असतो. जणू आपल्या खांद्यावरील पालखी त्याच्या खांद्यावर सोपवून पुढच्या मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी तो खोळंबलेला असतो, पण खोळंबलेपणातही तो आपले कर्तव्य विसरत नाही. जाई जाईतो आपल्या विहित कामाशी बांधलेला असतो. त्याच्यामध्ये दुजाभाव नाही.

म्हणूनच म्हणतो, आपण अरे पांत झाली, आता ऊन वाढीला लागेल. त्याचबरोबर उरलेल्या ऋतूंचे प्रहर आपण असोशीने उपभोगून घेत असतो. हा सृष्टीबदलाचा काळ तुम्हाला तुमच्या भूतकाळात फिरवून आणतो. अजूनही अगदी मार्च महिन्याच्या उन्हात एखादी शीतलहर तुमच्या अंगावर शिरशिरी उमटवते ना! मग हे काय असतं? ही सगळी जादू पौषाची आहे, त्यात वाढवणाऱया वाऱयाची. या ऋतूचे वारे पायाला भिंगरी लागल्यासारखे नाचणारे, हुंदडणारे आणि झाडांसकट आपल्यालासुद्धा बिलगणारे असतात.

सरत्या थंडीची चाहूल आणि येणाऱया उष्ण उष्म्याची चाहूल याच्यामध्ये हे नाचरे वारे आपल्याला क्षणात भूतकाळात नेतात. क्षणात भविष्यकाळात डोकवायला भाग पडतात आणि वर्तमान काळात हसत नाचत राहायला शिकवतात. असा हा ऋतू इंग्रजी वर्षाच्या प्रारंभी येत असतो. याच महिन्यामध्ये सूर्यनारायणाची पूजा दर रविवारी घरोघरी केली जाते. सूर्यकिरणांमधला पिवळेपणा अधिक तेजस्वी असतो. संध्याकाळ देखणी असते. रस्त्यावर काळय़ा साडय़ा नेसलेल्या सुंदर ललना बाहेर चालताना दिसतात. पांतीचे सण, हळदीकुंकू आणि आनंदाचा पांमण असा हा महिना. सगळय़ांना एक उत्साहाचा, आनंदाचा स्पर्श करीत असतो. आंब्याच्या झाडावर मोहर फुललेला असतो, कडुलिंबाच्या झाडावरही मोहोर असतो. तमालपत्राचं झाडही पूर्णपणे बहरलेलं आणि कळय़ांनी भारलेलं असतं. आमच्या अंगणामध्ये तमालपत्राचं मोठं झाड आहे. त्या झाडाला बारीक बारीक कळय़ा येतात. थोडय़ाशा बारीक लवंगांसारख्या दिसणाऱया त्या कळय़ा या महिनाभर पूर्ण दिवसरात्र टपटपत असतात. रात्री तर पुष्कळदा पाऊस आला की काय असा भास त्या करवतात. अंगणभर विखुरलेल्या या कळय़ा आपल्याला ऋतू सरलांचा संदेश देतात.

असा हा निरोपाचा प्रसंग प्रत्येक ऋतूमध्ये कोणत्या ना कोणत्या झाडाच्या संदर्भात होत असतो. निसर्ग बदलत असतो. सूर्य बदलतो, चंद्र बदलतो, तारे बदलतात, रात्रीचे प्रहर बदलतात, आकाशाचे रंग बदलतात. खरंच वाटतं मनापासून एकदा तरी हा प्रत्येक ऋतूचा एक दिवस अनुभव घ्यावा आणि आपल्या मनाशी तो अनुभव जपून ठेवावा. कधी मन विषण्ण झालं, कधी दुखावलं तर तो आपल्याला निश्चितच सांत्वनाही देतो. निसर्गाचं निशब्द अबोल सांत्वन एक प्रभावी साधन आहे. म्हणून वाटतं सरत्या आणि उभरत्या प्रत्येक ऋतूचा एक एक दिवस आपल्या मनाशी जपा आणि मग बघा, त्याच्या निरोप घेण्यामध्ये आणि आपल्या आयुष्यात तो येण्यामध्ये फारसा फरक नसतो. तो एकसारखा असतो. निरोप घेताना जितका आनंदी, तितकाच स्वागत करतानाही तो आनंदी असतो. कुठेतरी तो कृष्णाच्या गीतेशी संलग्न आहे. तो आपल्याला वारंवार सांगत असतो ‘देता किती घेशील दो करांनी’ असा त्याचा अविर्भाव असतो. फक्त तो समजणं, उमजणं आणि आचरणात आणणं आपलं काम आहे, जे आपण कधीच करत नाही. अर्थात यामध्ये जीवनाची धडपड, स्पर्धेमध्ये सहभागी होऊन धावणे या गोष्टी आहेतच. पण ज्या वेळी हा निसर्ग आपल्याला सांगत असतो तेव्हा आपण लक्ष देत नाही आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्याची भाषा आपल्याला समजत नाही. हा विरोधाभास टाळण्यासाठी निश्चितच 24 तासांपैकी निदान दहा मिनिटं तरी आपण याच्याशी संवाद साधावा. त्याच्यापासून जीवनाची ऊर्जा घ्यावी आणि जीवन आनंददायी करावं.