स्नेहबंध – वानप्रस्थ होताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अरुणा सरनाईक

साठी म्हणजे जीवनाचा थांबा नाही; तर पुन्हा नव्याने सुरुवात होय. फक्त त्याचा स्वीकार सकारात्मक असावा. फरक एवढाच असतो, आपण पहिल्या बेंचवरून मागच्या बेंचवर जातो, पण त्यातही मानला तर खूप आनंद असतो. आपणच वाढविलेल्या मुलांचे पालकत्व, जबाबदारीने पूर्ण केलेली कर्तव्ये याचा सार्थ अभिमान असावा, अहंकार नाही.

ज्येष्ठ नागरिक म्हणजे सीनियर सिटिझन. आज त्यांच्यासाठी बऱयाच सुविधा आपल्या सरकारने केलेल्या आहेत. तसाच समाजातही त्यांना मानसन्मान, आदर आहे. रोजचे जीवन जगत असताना एकदम एखाद्या दिवशी तुम्ही सेवानिवृत्त होता. हारतुरे, चांगल्या कार्याचा गौरव घेऊन स्वत:ची तारीफ, सोबत्यांची आपल्याविषयीची चांगली मते, थोडासा गहिवर, क्वचित तरळणारे डोळ्यांतले पाणी पापणीआड करून घरी येता. घरीही चांगले स्वागत होते. बायकोकडून डोळाभर कौतुक होतं. बाबा, आता आराम करा. खूप कष्ट घेतले. आता मनासारखे जगा. निवांत उठा, आरामात पेपर वाचा. वगैरे वगैरे.

किती आनंदाने आपण झोपी जातो. उद्याचा सूर्य वेगळा असेल. उद्याची पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र वेगळी राहील. मनावरचं दडपण नाहीसं झालंय. स्वप्नं रंगवत आपण झोपेच्या अधीन होतो. घरातील सकाळ नेहमीसारखीच धावपळीची. आपण तेवढे निवांत. स्वयंपाकघरात सुनेची, बायकोची गडबड, धांदल सुरू असते. नातवाचा किंवा नातीचा डबा तयार होत असतो. मुलाची घाईगडबड सुरू असते. मध्येच बायकोच्या नावाचा पुकारा होतो. आपली बायको तशीच असते… घाईत. “आजी?” असा नातवाचा पुकारा होताच “आले…” हा स्वर उंच टिपेला लावत धावत असते. सुनेच्या सूचना तिच्या मुलाला आणि सासूच्या मुलाला सारख्याच आवाजात सुरू असतात.

काहीच सुचत नाही. आतबाहेर चकरा मारून काय करावं हे कळत नाही. बायको गालातल्या गालात हसत राहते. सुनेकडे पाहून डोळे मिचकावते. सूनही गालात हसतेय. मुलगा जरा विचारतो, “बाबा, तुम्ही पेपर नंतर वाचाल का? मी फक्त हेडलाइन्स पाहतो,” असं म्हणत हातातून पेपर घेऊन जातो. अशा वेळी काय करावं? थोडय़ाच वेळात घर शांत होतं. बायको ओशाळी होत चहाचा कप हातात देते. शेजारी बसल्यासारखी करत विचारते, “अहो, स्वयंपाकघरात येता का? तुम्ही चहा घ्या. मी तोवर भाजीची तयारी करते.” चहा होतो, वेळ जात नाही. ऑफिसमधल्या सहकाऱयांची आठवण यायला लागते. दिवसाचा हा वेळ ऑफिसात किती घाईगर्दीचा असतो. अरेच्चा, आता हा रिकामा वेळ आपला पूर्ण दिवस, थोडय़ा थोडय़ा वेळाने भेटणारच. दिवस संपतो. रात्रीची जेवणं होतात. झोपेची वेळ होते.

इतक्या वर्षांच्या व्यस्त जीवनाची सवय आता बदलणार. कोणत्याही बदलासाठी तयारीचा हा वेळ व्यक्तीपरत्वे भिन्न असतो, पण नंतर सर्वच छान होते. माझ्यावर विश्वास ठेवा! दिवसभराची तगमग संपलेली आहे. शांतपणे झोपेच्या अधीन झालेलो असतो. खरंय, कोणताही बदल स्वीकारणे कठीणच असते. कालाय तस्मै नम:।

आज एकल कुटुंबपद्धती आहे. नवराबायको, मुलं! वाढत्या महागाईच्या काळात दोघांनी काम करणं गरजेचं. अशा वेळी मुलांना पाळणाघरात ठेवलं जातं किंवा मुलं साभाळायला बाई ठेवणं हा पर्याय निवडला जातो. आज जग झपाटय़ाने बदलतंय. लहान वयात निरनिराळी प्रलोभनं, मोबाइल यामुळे मुलांचं लहानपण फार लवकरं संपतं. अशा वेळी वडीलकीचा आश्वासक हात खूप आधाराचा ठरतो. जशी कुटुंबात तशी समाजातही ज्येष्ठ नागरिकांची निकड आहे. अशा वेळी समाज, सरकारने सुसंस्कारित होण्यासाठी नव्या, उमलत्या पिढीवर संस्कार घडविण्याचे काम अनुभवी हातांनी हातात घेतले तर देशाचे भवितव्य सुरक्षित सुसंस्करित होण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही.

आपल्या धर्मात चार आश्रम सांगितलेले आहेत. जीवनमान, कार्याची अनुभविता आणि शारीरिक क्षमता यांचा विचार करूनच आपल्याकडील ज्ञानी लोकांनी त्यांची विभागणी केलेली होती. आजचे वृद्धाश्रम हे वानप्रस्थाश्रमाचे आधुनिक रूप मानले तर त्यात वावगे काही ठरणार नाही.