
>> भावेश ब्राह्मणकर
भारतात हवामान बदलाचा गंभीर परिणाम होताना आता समुद्र आम्लीकरणाची प्रक्रियाही वेगाने घडत आहे. याचा थेट परिणाम इथल्या सागरी जैवविविधतेवर होत असून लाखो मच्छीमारांवर उपासमारीचे संकट येऊ घातले आहे.
जागतिक तापमानवाढ, हिमनग वितळणे, पीवादळांची तीव्रता वाया हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा मोठय़ा प्रमाणावर सतत होत असते. मात्र याच हवामान बदलाशी निगडित असलेला एक अत्यंत गंभीर मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे समुद्र आम्लीकरण. याला इंग्रजीत ओशन अॅसिडीफिकेशन असे म्हणतात. समुद्रात अॅसिडचे प्रमाण वाढत असल्याचे आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही. मात्र त्याचे परिणाम भारताच्या किनारपट्टी, सागरी परिसंस्था आणि कोटय़वधी लोकांच्या उपजीविकेवर खोलवर होत आहे.
सर्वप्रथम हे जाणून घेऊ की, समुद्र आम्लीकरण म्हणजे नक्की काय? औद्योगिकीकरणानंतर कोळसा, तेल किंवा वायू यांचे ज्वलन वाआहे. यामुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. या कार्बन डायऑक्साईडपैकी जवळपास 30 टक्के वायू महासागर शोषून घेतात. समुद्राच्या पाण्यात मिसळल्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर कार्बोनिक आम्लात होते. परिणामी समुद्राच्या पाण्याची क्षारता (पीएच) कमी होते. म्हणजेच पाणी अधिक आम्लीय बनते. याच प्रािढयेला समुद्र आम्लीकरण असे म्हणतात.
समुद्र आम्लीकरणाचा सर्वात मोठा फटका कॅल्शियम कार्बोनेटवर अवलंबून असलेल्या सागरी जिवांना बसतो. प्रवाळभित्ती, शंख-शिंपले, सिप, खेकडे, कोळंबी यांसारखे जीव आपले कवच किंवा सांगाडा कॅल्शियमपासून तयार करतात. आम्लीय पाण्यात हे कवच तयार होणे कठीण होते, तसेच विद्यमान कवचही कमकुवत होते. प्रवाळभित्ती या सागरी परिसंस्थेचा कणा मानल्या जातात. त्या माशांचे निवासस्थान, प्रजनन क्षेत्र आणि किनाऱयांचे संरक्षण करतात. मात्र आम्लता आणि तापमानामुळे प्रवाळभित्तींची वाढ खुंटत आहे, अनेक ठिकाणी त्यांचा ऱहास सुरू आहे. याचा थेट परिणाम सागरी जैवविविधतेवर होत आहे.
भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. कोटय़वधी लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे समुद्रावर अवलंबून आहेत. मासेमारी, मत्स्यप्रािढया, वाहतूक आणि पर्यटन हे सर्वच क्षेत्र समुद्राशी जोडलेले आहेत. विशेषत लहान मच्छीमार समाज आर्थिकदृष्टय़ा आधीच असुरक्षित आहे. त्यांच्यासाठी समुद्र आम्लीकरण हा दुहेरी संकटाचा विषय आहे. कारण एकीकडे उत्पादन घटत आहे, तर दुसरीकडे उत्पन्नाची शाश्वती नाहीशी होत आहे. लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारसारख्या बेटांवरील प्रवाळ कट्टे (कोरल रिफ्स) हे `समुद्रातील वर्षावने’ मानले जातात. हे प्रवाळ माशांच्या अनेक प्रजातींचे प्रजनन स्थळ असतात. वाढत्या आम्लतेमुळे प्रवाळांचे `ब्लीचिंग’ (धुळीकरण) होत असून ते नष्ट होत आहेत. प्रवाळ नष्ट झाले की, त्यावर अवलंबून असलेली संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होते.
भारताच्या दोन प्रमुख सागरी विभागांमध्ये समुद्र आम्लीकरणाचे स्वरूप वेगवेगळे आहे. अरबी समुद्रात खोल समुद्रातून कार्बन डायऑक्साईडयुक्त पाणी वर येते. त्यामुळे येथे पाण्याचा पीएच जलद गतीने कमी होत असल्याचे आआले आहे. बंगालच्या उपसागरात मोठय़ा प्रमाणावर नद्यांमधून येणारे गोडे पाणी आणि गाळ यामुळे समुद्राच्या रासायनिक स्थितीवर परिणाम होतो. येथे पाण्याचे थर तयार होतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड अधिक काळ पृष्ठभागाजवळ अडकून राहतो. धक्कादायक बाब म्हणजे भारतात अद्याप समुद्र आम्लीकरणासाठी स्वतंत्र राष्ट्रीय मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित नाही. हवामान बदलाच्या चर्चेत समुद्र तापमानवाढ आणि पीवादळांवर भर दिला जातो. मात्र आम्लतेकडे तुलनेने दुर्लक्ष होते. समुद्रातील प्लँक्टन (लहान जीव जे माशांचे अन्न आहे) आम्लतेमुळे नष्ट होत आहेत. अन्न नसल्यामुळे माशांचे स्थलांतर होत आहे किंवा त्यांची संख्या घटत आहे. विशेषत भारतीय किनारपट्टीवर बांगडा, पापलेट आणि कोळंबी या माशांच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. मत्स्य उत्पादन कमी झाल्यामुळे माशांच्या किमती वाढत आहेत अन् कोळी बांधवांचे उत्पन्न घटत आहे.
समुद्र आम्लीकरण ही जागतिक समस्या असली तरी त्याचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर पावले उचलता येऊ शकतात. पहिले म्हणजे समुद्राच्या पीएच, कार्बोनेट पातळी आणि जैविक परिणामांचे सातत्याने मापन करणारे नेटवर्क उभे करणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे मॅनग्रुव्ह, सीग्रास आणि प्रवाळभित्ती यांसारख्या नैसर्गिक कार्बन शोषक परिसंस्थांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरे म्हणजे मच्छीमार समुदायांना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि पर्यायी उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान धोरणांमध्ये समुद्र आम्लीकरणाला स्वतंत्र मुद्दा म्हणून स्थान देणे आवश्यक आहे. केवळ कार्बन डायऑक्साईडच नाही, तर जमिनीवरून समुद्रात वाहून जाणारी रासायनिक खते आणि सांडपाणी यामुळेही समुद्रात नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण वायामुळे `युट्रोफिकेशन’ची प्रािढया घडते, जी पाण्याची आम्लता वाढण्यास मदत करते.
समुद्र आम्लीकरण हे एक अदृश्य पण घातक संकट आहे. ते हळूहळू वाआहे आणि त्याचे परिणाम दीर्घकालीन आहेत. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भारताच्या किनाऱयांवरील सागरी परिसंस्था, अन्नसुरक्षा आणि लाखो लोकांची उपजीविका धोक्यात येऊ शकते. हवामान बदलाच्या लय़ात समुद्राला केंद्रस्थानी ठेवणे ही आजच्या काळाची अपरिहार्यता आहे. समुद्र निरोगी राहिला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)



























































