लेख – चीनला रोखण्यासाठी तैवान महत्त्वाचा सहकारी

ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

चीनच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी हिंदुस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान ‘क्वाड’द्वारे एकत्र आले आहेत. चीनचे शत्रू हे आपले मित्र आहेत. म्हणून आपण व्हिएतनाम, तैवान, फिलीपिन्स, मंगोलिया यांच्याशी सामरिक संबंध आणि लष्करी सहकार्य वाढवले पाहिजे, जेणेकरून चिनी सैन्याला वेगवेगळय़ा आघाडय़ांवर लक्ष द्यावे लागेल. चीनला रोखण्याकरता तैवान महत्त्वाचा सहकारी आहे. आपण तैवानशी आर्थिक व व्यूहात्मक संबंध, सामरिक आणि लष्करी सहकार्य वाढविले पाहिजे.

तैवानचा राष्ट्रीय दिन 10 ऑक्टोबरला साजरा झाला, त्याच्या आधी चीनच्या हिंदुस्थानातील दूतावासाने हिंदुस्थानीय प्रसारमाध्यमांना इशारा दिला. “जगात फक्त एक चीन आहे व ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ संपूर्ण चीनचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव सरकार आहे. तैवान चीनचा अविभाज्य घटक असून चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेल्या सर्व देशांनी ‘वन चायना पॉलिसी’बाबतच्या आपल्या कटिबद्धतेचा दृढतेने सन्मान केला पाहिजे.’’ यामागे मुख्य कारण होते की, हिंदुस्थानातील अनेक प्रसारमाध्यमांनी तैवानच्या राष्ट्रीय दिनाचे विशेष वार्तांकन करण्याचे व विशेष कार्यक्रम प्रसारित करण्याचे ठरवले होते.

तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आपल्या भाषणात त्या देशाच्या राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी चीनवर जोरदार हल्ला केला. जगभरातील लोकशाहीसाठी चीन हा एक धोका आणि आव्हान बनले आहे आणि हिंदुस्थान-चीन सीमेवरचा संघर्ष हे त्याचेच उदाहरण आहे, असे म्हटले. राष्ट्रपती वेन आपल्या भाषणात म्हणाल्या, “दक्षिण चीन समुद्रातील विवाद, चीन-हिंदुस्थानी सीमेवर संघर्ष, हाँगकाँगमधील चीनचे दडपशाहीचे धोरण स्पष्टपणे दर्शवते की, इंडो-पॅसिफिक प्रदेशात लोकशाही, शांतता आणि समृद्धी गंभीर आव्हानांना सामोरे जात आहेत.

तैवानने चीनच्या धमक्यांना न घाबरता चीनला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. आपल्या देशात प्रसारमाध्यमांना कधीही अभिव्यक्तिस्वातंत्र्य न देणाऱया चिनी कम्युनिस्ट सरकारने आता हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांवरही सेन्सॉरशिप लादण्याचे ठरवले की काय असे वाटते. चिनी दूतावासाने हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांना नसते सल्ले देण्यापेक्षा आपला देश हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो की उल्लंघन याचा विचार करावा. “हिंदुस्थान जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून तिथे माध्यमांचा जिवंतपणा, स्वातंत्र्य जपणारे नागरिक राहतात. तैवान चीनच्या इशारे वा धमक्यांना अजिबात भीक घालत नसल्याचे स्पष्ट होते. तैवानने गेली 70 वर्षे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलेच आणि तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच ‘वन चायना पॉलिसी’ला कसून विरोध केला.

चीन अजूनही लडाखच्या केंद्रशासित प्रदेश करण्याला अवैध, बेकायदेशीर मानतो. इतकेच नव्हे तर, चीन हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेशलादेखील ‘दक्षिण तिबेट’ मानतो. चीनची जम्मू-कश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशाबाबतची भूमिका हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा व एकता-अखंडतेचा अपमान करणारी, उल्लंघन करणारी आहे. तेव्हा चीनने हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’चा सन्मान करावा अशी अपेक्षा बाळगण्यात काहीही अर्थ नाही.

चीन जर स्वतःला महासत्ता समजतो तर त्याने हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकन वा कार्यक्रमांना का घाबरावे? हिंदुस्थानातील प्रसारणामुळे जगातील अन्य देशांतूनही तैवानला समर्थन मिळण्याची भीती वाटल्यामुळे प्रसारण करू नका असा सल्ला चीन देत होता. गेल्या काही महिन्यांत तैवानचा चीनबरोबरील संघर्ष वाढला आहे. मध्यंतरी चीनने तर तैवानी अवकाशात स्वतःची लढाऊ विमाने पाठवूनही तैवानला ताब्यात घेण्याची रंगीत तालीम असल्याचे म्हटले होते. तरीही तैवान मागे हटला नाही .आता अमेरिकेसह इतरही देश तैवानला पाठिंबा देत आहेत. तैवानची स्वतःची पण इच्छाशक्ती प्रबळ आहे.

तैवान आपली संरक्षण क्षमता वाढवत आहोत. लष्कर मजबूत करीत आहे. निरंतर आधुनिक शस्त्र्ाs आणि पाणबुडय़ा बनवीत आहे. उच्च प्रशिक्षित कर्मचारी तयार करीत आहे. तैवानच्या राष्ट्रीय दिनी चीनने आपली लढाऊ विमाने तैवानच्या सीमेजवळ पाठविली. तैवानच्या सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत त्यांना तातडीने तेथून हुसकावून लावले. चीनने या वर्षी तब्बल 2972 पेक्षा जास्त वेळा तैवान सीमेवर आपली लढाऊ विमाने पाठवली आहेत. तैवानचे उपराष्ट्रपती लाई चिंग ताए यांनी सांगितले की, आम्ही आमच्या राष्ट्रीय दिनाचा उत्सव थांबवणार नाही. यापूर्वी तैवानचे संरक्षणमंत्री म्हणाले, आम्हाला प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेचे संरक्षण करण्यास कोणीही प्रतिबंधित करू शकणार नाही. तैवान सैन्याचं खच्चीकरण करण्यासाठी चीन सातत्यानं आपली लढाऊ विमाने तैवानच्या समुद्राकडे पाठवत आहे. याचदरम्यान तैवानने आपल्या क्षेत्रात घुसखोरी करणाऱया चीनच्या सुखोई-35 या लढाऊ विमानाला पाडलं आहे. तैवानने या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टमचा उपयोग केला होता. चीनकडून होणाऱया कोणत्याही आक्रमक कृतीचा सामना करण्यासाठी तैवानने आपल्या हवाई दल आणि नौदलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नुकतेच अमेरिकेचे यूएस बी वन बी बॉम्बर युद्ध विमान तैवानवर फिरताना दिसले आहे. अमेरिका संभाव्य युद्ध क्षेत्रात चीनच्या सैन्याची गुप्त माहिती गोळा करत आहेत. चीनच्या संरक्षण तज्ञांनी म्हटलं आहे की, अमेरिकेने मागील 2 वर्षांमध्ये 1000 पेक्षा अधिक वेळा आपल्या बॉम्बर आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स एअरक्राफ्टला ( ADIZ) दक्षिण चीन महासागराजवळ पाठवलं आहे. आता या भागात तणाव तयार व्हावा असं अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेने पाठवलेली सर्वाधिक युद्ध विमाने टेहळणी करणारी आहेत. अर्थात, अमेरिकेने चीनच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केलेला नाही.

चीनचे कुणी ‘खरे’ मित्र नाहीत. चीनच्या वाढत्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणांविरुद्ध प्रमुख आशियाई राष्ट्रे एकत्र येताना दिसत आहेत. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेला चीनकडून सर्वाधिक धोका असल्यामुळे चीनविरुद्धची ही आशियाई राष्ट्रांची युती हिंदुस्थानसाठी निश्चितच उपकारक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या