लेख – चीनने बेपत्ता परराष्ट्रमंत्र्यांना का हटविले?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

चीनमध्ये कुठल्याही व्यक्तीची लोकप्रियता जर विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यापेक्षा जास्त होऊ लागली तर तिला गायब केले जाते, असे उघड बोलले जाते. जिनपिंग यांना हाताखाली काम करणाऱया विश्वासू व्यक्ती हव्या असतात, पण प्रतिस्पर्धी नको असतात. आधी बेपत्ता आणि आता पदावरून हटविलेले परराष्ट्रमंत्री किन गांग हेदेखील प्रतिस्पर्धी होण्याचा धोका जिनपिंग यांना वाटला असावा. त्यामुळे गांग यांची गच्छंती झाली असावी.

चीनमध्ये महिनाभरापासून बेपत्ता असलेले परराष्ट्रमंत्री किन गांग यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. किन गांग डिसेंबर 2022 मध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री झाले होते. गांग यांनी वांग यी यांची जागा घेतली, जे दहा वर्षे परराष्ट्रमंत्री होते. अमेरिकेत गेली अनेक वर्षे चीनचे राजदूत म्हणून काम केलेल्या गांग यांची गेल्या वर्षी तरुण वयात चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणून निवड झाली. अनेक वर्षे परराष्ट्रमंत्रीपदावर काम केलेल्या वांग यी यांना बाजूला सारून गांग यांची नियुक्ती, ते जास्त कर्तबदार होते म्हणून झाली. शी जिनपिंग यांनी नियुक्त केलेल्या गांग यांना फक्त सात महिन्यांच्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या कारकीर्दीनंतर बाजूला करण्यात आले.

मध्यंतरी गुप्तचर फुग्यावरून चीन आणि अमेरिकेत तणाव वाढला. चीनने हे फुगे हेरगिरीसाठी आपल्या सीमेवर पाठवल्याचा आरोप अमेरिकेने केला . किन गांग यांनी त्याला ‘वेदर रिकॉनिसन्स बलून’ म्हटले व म्हणाले, ‘‘त्याचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही.’’ या कारणास्तव अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्यावेळी चीनचा दौरा रद्द केला. त्याला गांग यांची यशस्वी मुत्सद्देगिरी म्हटले गेले. कारण त्यांनी झुकण्यास नकार दिला.

सौदी अरेबिया आणि इराणमध्ये शांतता करार झाला आहे याचे श्रेय किन गांग यांना देण्यात आले. त्यांच्या मध्यस्थीने दोन शत्रुदेश एकत्र आले. अमेरिकेला हा धक्काच होता. 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात मैत्री नव्हती. सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा मित्रदेश आहे. इराणला विरोध करण्यासाठी अमेरिका सौदीचा वापर करत होती. मात्र किन गांग यांनी हे समीकरण मोडीत काढले. त्यानंतर त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र यावेळी यश आले नाही. त्याच वेळी मार्च 2023 मध्ये चीनच्या दबावाखाली होंडुरासने तैवानची मान्यता काढून घेतली. हे गांग यांचे यश होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जूनमध्ये चीनला भेट दिली. किन गांग यांनीही यावेळी ब्लिंकन यांच्या सोबतच्या अनेक बैठकांमध्ये भाग घेतला.

25 जून रोजी रशियन, श्रीलंका आणि व्हिएतनामी अधिकाऱयांसोबत झालेल्या बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री गांग शेवटचे दिसले होते. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. म्हणजेच जवळपास महिनाभर किन गांग कुठे आहेत हे कोणालाच माहीत नव्हते.चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग हे 4 जुलै रोजी युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांची भेट घेणार होते, परंतु ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. बैठकीला आणखी मुदतवाढ देण्याचे कारण देण्यात आले नाही.

7 जुलै रोजी पत्रकारांनी प्रथमच चीनचे परराष्ट्रमंत्री गांग यांच्याबद्दल विचारले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले, आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. 10 आणि 11 जुलै रोजी गांग इंडोनेशियातील एका शिखर परिषदेत सहभागी होणार होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जाऊ शकणार नाहीत, असे नंतर सांगण्यात आले. यासोबतच गांग फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीतही दिसले नाहीत.

गांग बेपत्ता झाल्याची बातमी अमेरिकन नागरिक आणि पेंब्रिज शिक्षित रिपोर्टर आणि टीव्ही अँकर फू झियाओटियन यांच्या अफेअरच्या दरम्यान आली. गांगच्या विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांची चौकशी केली जात असावी. झियाओटियनने गेल्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. झियाओटियनने एक ट्विटमध्ये म्हटले की, तिला मुलगा झाला आहे. मात्र तिने मुलाच्या वडिलांबद्दल कोणतीही माहिती उघड केली नाही. फक्त एवढेच सांगितले की, मुलाचे वडील चिनी वंशाचे आहेत. चीन कम्युनिस्ट पक्षात अफेअरला सक्त मनाई आहे. एका पत्रकाराने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला किन गांग यांच्या अफेअरच्या बातम्यांबाबत विचारले असता मंत्रालयाने सांगितले की, या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत त्यांची कथित मैत्रीणही बेपत्ता होती. फू झियाओटियन ही डबल एजंट असावी. म्हणून शी जिनपिंग यांनी गांग यांना पदावरून हटवले असावे.

सॉफ्ट डिप्लोमसीला बगल देत 2022 मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी वुल्फ वॉरियर डिप्लोमसीला (आक्रमक डिप्लोमसी) महत्त्व दिले आणि किन गांग यांना परराष्ट्रमंत्री बनवले. परराष्ट्रमंत्री होण्यापूर्वी गांग यांच्या दोन लेखांची मोठी चर्चा झाली. डिसेंबर 2022 रोजी किन गांग यांनी अमेरिकन मासिकात लिहिले की, चीन आणि अमेरिका हा ‘झीरो सम गेम’ नाही. म्हणजेच कोणतीही बाजू दुसऱया देशाला हीन सिद्ध करून पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर ते चीनचे परराष्ट्रमंत्री झाले. त्यानंतर गांग यांनी जानेवारी 2023 मध्ये दुसरा एक लेख लिहिला. त्यात म्हटले, यावेळी अमेरिका-चीन संबंधांची दारे खुली आहेत. मला खात्री आहे की, अमेरिकन लोक चिनी लोकांसारखेच मनमोकळे, मैत्रीपूर्ण आणि मेहनती आहेत. जगाचे भविष्य हे चीन-अमेरिका संबंधांच्या चांगल्या आरोग्यावर आणि स्थिरतेवर अवलंबून आहे.

चीन कोणत्याही दबावाशिवाय अमेरिकेशी चर्चेचे दरवाजे उघडे ठेवणार आहे. त्यामुळे चीनमध्ये किन गांग यांची लोकप्रियता झपाटय़ाने वाढली, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची तुलना केली गेली. हे त्यांना महागात पडले असावे.

चीनमधील शक्तिशाली लोक गायब होणे ही नवीन बाब नाही. माओंच्या काळात हंड्रेड फ्लॉवर्स मोहीम सुरू झाली. याअंतर्गत लोकांना टीका करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. अनेकांनी हे केले, पण ते पुन्हा दिसले नाहीत. म्हणजेच त्याचा बंदोबस्त करण्यात आला. शी जिनपिंग हेदेखील तेच धोरण अवलंबत आहे. चीनमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांच्या यादीत अभिनेते, कार्यकर्त्यांपासून खेळाडूंपर्यंत अनेक लोक आहेत.