लेख – परदेशांत जाणाऱ्या भारतीयांची सुरक्षा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

परदेशातील भारतीयांच्या अनेक समस्या असतात. नवा देश, परकी भाषा, वेगळे लोक, वेगळे कायदे, सामाजिक जीवनात शिस्त, आगळी जीवनशैली या गोष्टी भारतीयांना सतावतात. त्यातून मानसिक तणाव वाढतात. प्रत्येकाला तिथले हवामान किंवा अभ्यास पद्धती मानवत नाही. काही चुकीच्या मार्गाला लागून कायद्याच्या कचाटय़ात सापडतात. तिथे पावलापावलावर असे अनेक धोके असतात. ते ओळखता आले पाहिजेत, विविध धोक्यांपासून स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे.

गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणांकरिता गेलेल्या भारतीयांच्या सुरक्षेविषयी एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेमध्ये अनेक विद्यार्थी आणि भारतीय कायदा सुव्यवस्थेमुळे मारले गेले. अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटनमध्ये हिंदूंच्या मंदिरावर अनेक हल्ले झाले. रशियामध्ये काम करण्याकरिता गेलेल्या भारतीयांना रशियन सैन्यात भरती करून रशियन-युव्रेन युद्धभूमीवर पाठवण्यात आले आहे. अनेक भारतीय बेकायदेशीररीत्या अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नामध्ये मेक्सिको सीमेवर बळी पडले आहेत. मात्र सर्वात धक्कादायक बातमी होती ती पंबोडिया, लाओस आणि थायलंडमध्ये गेलेल्या अनेक भारतीयांना बंधक बनवून थायलंड आणि लाओसमध्ये बेकायदा कामे करण्याकरिता तेथील क्राईम सिंडिकेट भाग पाडत आहेत.

शिक्षणासाठी, नोकरी वा उद्योग-व्यवसायासाठी आणि ‘कुंपणापलीकडचे सुंदर जग’ जगण्यासाठी भारतीय विदेशात जातात. विशेषतः अमेरिका, इंग्लंड अशा देशांत जाण्यासाठी अनेक जण एजंटांना पैसे देतात. घर आणि शेत विकून, सर्वस्व पणाला लावून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अवैधपणे, कधी कधी गोठवणाऱ्या थंडीत कित्येक तास ट्रकमध्ये बसून किंवा तासन्तास बर्फात चालून अमेरिकेत वा युरोपात सीमा पार करून घुसण्याचा प्रयत्न करतात. हजारो भारतीय बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले. या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत एकटय़ा अमेरिकेत अशा प्रकारे 12 विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. याची गंभीर दखल घेऊन वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या पुढाकाराने अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांसोबत ऑनलाइन बैठका घेऊन तेथील वास्तव्यात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन केले गेले, पण भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या फक्त अमेरिकेपुरत्या मर्यादित नाहीत. 2021 च्या आकडेवारीनुसार, साधारण एकूण वीस लाख भारतीय विद्यार्थी विदेशी असण्याची शक्यता आहे.

तेथे सुमारे 30 भारतीय तरुण काम करत होते. त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांचा पगार कापण्यात येत होता. जाचाला कंटाळून तरुणांनी तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधून हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांचे मोबाईल काढून घेतले गेले. तसेच भारतीय वकिलातीकडे करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. मोबाईलमधील सर्व तपशीलही डिलिट केला गेला. युवकांकडून 2000 चिनी युआन खंडणी म्हणून काढून घेतले. अडकलेल्या तरुणांनी स्थानिक भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर 1 एप्रिलला सुटका करण्यात आली. मात्र अजून अनेक भारतीय तिथे फसलेले आहेत.

परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तीन महिलांना नुकतीच सहार पोलिसांनी अटक केली. दलालाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडे दिली होती, पण विमानतळावर या महिलांना अडवून अटक करण्यात आली. एका प्रकरणात मुंबईतील 24 वर्षीय तरुणीला हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बहारीनला पाठवण्यात आले होते. तेथे दोन-तीन महिने तिला काम दिल्यानंतर तिचा मोबाईल व पारपत्र काढून घेऊन तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले.

अचानक मुलीचा संपर्क तुटल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिला परदेशात पाठवणाऱया टोळक्याने तिच्या सुटकेसाठी दोन लाख रुपये मागितले. पैसे देऊन कुटुंबीयांनी मुलीची सुटका केल्यानंतर या टोळक्याने नेपाळ व भारतातून 600 मुलींना अशा प्रकारे बहारीनला वेश्या व्यवसायासाठी पाठवल्याचे उघड झाले.

जरी भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे तरी सरकारी आकडय़ाप्रमाणे फक्त पंधरा ते वीस टक्के तरुणांना दरवर्षी नोकऱया मिळतील. बाकीच्यांना दुसरे काहीतरी म्हणजे उद्योगधंदा, शेती, इतर व्यवसाय स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता करावे लागतील. त्याकरिता स्किल इंडियाद्वारे बहुतेक तरुणांना नवीन कौशल्य़े शिकावी लागतील.

अनोळखी व्यक्तीमार्फत परदेशात नोकरीला जाणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दलालांमार्फत परदेशात नोकरीसाठी जाताना पूर्ण पडताळणी करणे आवश्यक आहे. पंपनीची माहिती, तेथे काम करणारे कर्मचारी, संबंधित देशात काम करणारी परिचित व्यक्ती यांच्याकडून पडताळणी करावी. परदेशात फसवणूक झाल्यास तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधावा. परदेशात गेल्यानंतर पारपत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे. भारतातही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रांच्या मूळ प्रती देऊ नयेत. त्या द्यायच्या झाल्यास पूर्ण पडताळणी करावी.

सर्वात महत्त्वाचे- परदेशामध्ये प्रत्येक भारतीय वकिलातीमध्ये त्या देशात राहणाऱया भारतीयांची नोंदणी आवश्यक आहे. तिथे आल्यानंतर त्यांना विविध धोक्यांविषयी प्रबोधन करणे आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याविषयीची माहिती देणे बंधनकारक बनवले जावे.