
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
कोरोना संपून वेगाने प्रगती करण्याच्या काळात आपले शेजारी अस्वस्थ आणि अशांत असावेत, हे हिंदुस्थानकरिता त्रासदायक आहे. पाकिस्तानातील अस्थैर्य, अफगाणिस्तानात धर्मांध तालिबानी याचा परिणाम कश्मीरवर होतो. श्रीलंकेतील स्थिती हाताबाहेर जात आहे. चीनला हिंदुस्थानी उपखंडातील प्रत्येक देशाला, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान कायमचे अंकित करून हिंदुस्थानला शह द्यायचा आहे. यामुळे हिंदुस्थानसमोर संरक्षणविषयक व आर्थिक आव्हाने उभी आहेत.
गेल्या काही आठवडय़ामध्ये शेजारी राष्ट्रे अस्वस्थ वर्तमान, राजकीय अस्थिरता, आर्थिक डबघाई, अंतर्गत फुटीचे आव्हान, निरनिराळ्या संकटांत सापडली आहेत. या अस्थिर आणि स्पह्टक वातावरणाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकेल, यासंबंधी विचार करणे आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.
पाकिस्तान ः हा देश कायम लष्कराच्या अमलाखाली असतो. तिथे इम्रान खान यांचे सरकार उलथवण्यात आले. त्यामागे लष्कराची खान सरकारवर झालेली नाराजी हे प्रमुख कारण होते. ‘तेहरिक-ए-लब्बैक’ या इस्लामी कट्टर पक्षाचा सरकार आणि लष्कराला असलेला विरोध अधिकाधिक उग्र स्वरूपात पुढे येत आहे. आज अत्यावश्यक अशा इंधन तेलाच्या आयातीसाठीदेखील पुरेसे परकीय चलन उपलब्ध नाही. बेकारीने धोकादायक मर्यादा पार केलेली आहे. ‘सीपेक’ प्रकल्पात चीन, पाकिस्तानचे 67 अब्ज डॉलर्सचे भांडवल अडकलेले आहे. तो प्रकल्प पांढरा हत्ती बनला आहे.
पाकिस्तानातील फुटीर चळवळींमुळे हिंदुस्थानात शरणार्थी येण्याचा धोका आहे. पाकिस्तानातील वरील परिस्थितीस इम्रान सरकार तसेच अफगाणिस्तान तालिबान सरकार जबाबदार आहे. तालिबानकडे प्रचंड आर्थिक तुटवडा आहे. हिंदुस्थानने सध्या त्यांना थोडय़ा प्रमाणात मानवीय मदत करण्याचे धोरण चालविले आहे.
श्रीलंका ः चिनी कर्जाच्या सापळ्यात श्रीलंका अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. महागाईने सामान्य नागरिकांचे जगणेच मुश्कील केले आहे. परकीय चलन संपल्यामुळे इंधन तेल आयात करता येत नाही. त्यामुळे देशांतर्गत वाहतूक ठप्प झाली आहे. श्रीलंकेची मदार चहाचे उत्पादन आणि पर्यटन व्यवसायावर आहे. पर्यटन व्यवसाय ‘कोविड’मुळे कोलमडलेलाच होता. आता इंधनाच्या कमतरतेने चहा आणि इतर उद्योगदेखील संकटात सापडले आहेत. ही वेळ पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचारामुळे आली. त्यांनी हंबनटोटा आणि कोलंबोचे दुसरे बंदर या अनावश्यक प्रकल्पांसाठी चीनकडून कर्ज घेतले. आता ते कर्ज फेडता येत नाही. त्यामुळे चीन श्रीलंका सरकारकडून त्यांच्या भूमी आणि बंदरांचे हक्क 99 वर्षांच्या ‘लीज’वर ताब्यात घेत आहे. राज्यकर्ते भ्रष्टाचार करून मोकळे झाले आणि त्यांच्या या कृत्यांची किंमत जनतेला आपल्या हालअपेष्टा आणि देशाच्या सार्वभौमतेचा सौदा करून चुकवावी लागते आहे.
आता हिंदुस्थान त्यांना मदत करीत आहे. अन्न व औषधे यांच्यासाठी पर्यायी कर्ज व इंधन तेलासाठी परकीय चलनाचे विशेष कर्ज हिंदुस्थानने उपलब्ध करून दिले आहे. त्यायोगे हा देश चीनच्या सापळ्यातून सुटू शकेल. श्रीलंकेतील बौद्ध आणि तामीळ हे आपलेच सांस्कृतिक बांधव आहेत, त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे.
मालदीव ः मालदीव बेटांवरदेखील काही महिन्यांपूर्वी एक राजकीय अस्थिरतेचे वादळ येऊन गेले. त्यापाठीमागेसुद्धा चीनचाच हात होता, पण हिंदुस्थानच्या सावधगिरीतून तेथील पेचप्रसंग आपल्या बाजूने सुटण्यास मदत झाली. हिंदुस्थान आणि मालदीवने ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट’च्या (जीएमसीपी) करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे मालदीवमधील आपली उपस्थिती वाढवण्याच्या प्रकरणात चीनला मात देत हिंदुस्थान पुढे जात आहे. तरीही आपल्याला या देशावर बारकाईने नजर ठेवणे भाग आहे.
नेपाळ ः नेपाळची आर्थिक स्थिती श्रीलंकेइतकी गंभीर नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने आयातीवर निर्बंध जाहीर केले आहेत. हिंदुस्थान-नेपाळच्या सीमेलगत जिह्यांमध्ये मशिदी, मदरशांची संख्या आश्चर्यकारकरीत्या वाढली असल्याने सशस्त्र्ा सीमा दलाने यासंदर्भात इशारा दिला आहे. नेपाळमध्ये आता आपले मित्र असलेले पंतप्रधान देऊबा यांची सत्ता आहे. त्यामुळे चीनच्या हालचालींना तिथे पायबंद बसला आहे. नेपाळमध्ये हिंदुस्थान अनेक जलविद्युत प्रकल्प बांधून देण्यास उत्सुक आहे आणि सध्याचे राज्यकर्ते या गुंतवणुकीला अनुकूल आहेत, त्यामुळे असे प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतील.
बांगलादेश ः बांगलादेशात सध्याचे शेख हसीना राज्यावर आहेत. त्या ‘हिंदुस्थान मित्र’ म्हणून ओळखल्या जातात. बांगलादेशची अर्थव्यवस्थादेखील सध्या आपल्या शेजारी राष्ट्रातील सर्वात सुदृढ अर्थव्यवस्था आहे. दिल्लीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असलेल्या रोहिंग्यांच्या मोठय़ा समुदायामुळे देशाच्या ऐक्यास धोका निर्माण झाला आहे. जहांगीरपुरीमधील ‘सी ब्लॉक’ आणि ‘एच-2’ झोपडपट्टीमध्ये सर्वात जास्त बांगलादेशी लोकसंख्या आहे. रोहिंग्या शरणार्थींच्या प्रश्नामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव असतो. पूर्वांचलाला उर्वरित हिंदुस्थानशी तसेच बंगालच्या उपसागराशी जोडण्यास बांगलादेशचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
म्यानमार ः काही महिन्यांपूर्वी या देशात अंतर्गत असंतोष वाढीस लागला होता, पण आता सरकार स्थिर आहे. इथेदेखील चीन हस्तक्षेप करून सतत अस्थिरता माजविण्याचा सतत प्रयत्न करत असतो. सत्तेत सैन्याचाच वरचष्मा आहे, पण आपल्या देशाचे या सैनिकी प्रशासनांशीदेखील चांगले संबंध आहेत. म्यानमारमध्ये शांतता राहणे, हे आपल्या हिताचेच आहे.
भूतान ः कोरोनामुळे भूतानची अर्थव्यवस्था गंभीर आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. भूतानसाठी भौगोलिक स्थान पाहता, अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचे कार्य मोठे आव्हान आहे. हिंदुस्थानने भूतानमधील नैसर्गिक जलस्रोतांची ताकद लक्षात घेता तेथे जलविद्युत प्रकल्पही उभारले आहेत. या माध्यमातून भूतानला ‘आत्मनिर्भर’ करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानने केला आहे.
हिंदुस्थानचे धोरण सर्व देशांशी मित्रत्वाने वागण्याचेच आहे. अशा सर्व देशांना एका आघाडीत बांधून त्याने आपल्याला या क्षेत्रातील चीनच्या प्रभावाला यशस्वीपणे तोंड देता येईल. हिंदुस्थानची प्रतिष्ठा मात्र जागतिक स्तरावर चांगलीच उंचावलेली आहे. युरोप, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देश हिंदुस्थानबरोबर उत्तम संबंध वाढवत आहेत. आपण सर्व देशांना सातत्याने आर्थिक, लष्करी आणि वैद्यकीय मदत करीत आहोत. त्याचा परिणाम या भागातून चीनचा प्रभाव कमी होऊन हिंदुस्थानचा प्रभाव वाढेल. यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षेतदेखील वाढ होईल.





























































